कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका; दिल्लीतील रुग्णालयात दाखल

सकाळ वृत्तसेवा
Friday, 23 October 2020

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली - भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हृदयात ब्लॉकेज असल्यानं त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सध्या ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून प्रकृती स्थिर आहे. 

भारताने आयसीसीचा पहिला वर्ल्ड कप कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघाला नमवून 1983 मध्ये कपिल देव यांच्या संघाने इतिहास रचला होता. त्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताने फक्त 183 धावा केल्या होत्या. तरीही विंडिजला 140 धावांवर रोखून 43 धावांनी विजय नोंदवला होता. 

क्रीडा विश्वातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

कपिल देव यांनी 1978 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल टाकलं होतं. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 131 कसोटी सामने खेळले. कपिल देव यांनी न्यूझीलंडच्या रिचर्ड हेडली यांचा सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम मोडला होता. त्यांनी एकूण 434 विकेट घेतल्या आहेत. भारताकडून कसोटी सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत अनिल कुंबळे यांच्यानंतर कपिल देव यांचे नाव आहे. कसोटीत त्यांच्या नावावर 5 हजारांहून जास्त धावा आहेत. यात 8 शतकांचा समावेश आहेत .तसंच 225 एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळताना कपिल देव यांनी 253 गडी बाद केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kapil dev suffers heart attack admitted in hospital