KSA Football Competition Practice Club Wins
KSA Football Competition Practice Club Wins

केएसए चषक : प्रॅक्टिस क्लब (अ) चा खंडोबा तालीम (अ) वर विजय 

कोल्हापूर  -  केएसए चषक वरिष्ठ साखळी फुटबॉल स्पर्धेत प्रॅक्‍टिस फुटबॉल क्‍लबने (अ) खंडोबा तालीम मंडळाचा (अ) 4-0ने पराभव केला. तत्पूर्वी च्या सामन्यात खंडोबा तालीम मंडळाने (ब) पाटाकडील तालीम मंडळाला (ब) 2 विरूद्ध 1 गोलफरकाने पराभूत केले. केएसएतर्फे छत्रपती शाहू स्टेडियमवर स्पर्धेचे आयोजन केले आहे. 

पाटाकडीलविरूद्धच्या (अ) पराभवानंतर खंडोबाचे खेळाडू सावरतील, अशी अपेक्षा होती. आजच्या सामन्यात त्यांची मात्रा चालली नाही. पूर्वार्धात प्रॅक्‍टिसच्या इंद्रजित चौगुले, कैलास पाटील, ओंकार मोरे, जय कामत, सागर चिले, इम्यॅन्युएल यांनी केलेल्या चढायांना रोखण्यासाठी खंडोबाच्या बचावफळीचा कस लागला. प्रॅक्‍टिसच्या सागर चिलेच्या पासवर ओंकार मोरेने 7, तर इंद्रजित चौगुलेच्या पासवर इम्यॅन्युएलने 19 व्या मिनिटाला गोल नोंदवला. मध्यंतरापर्यंत हीच आघाडी राहिली. दोन गोलचे ओझे खंडोबावर झाल्यानंतर काही प्रेक्षक स्टेडियममधून बाहेर पडले.

प्रॅक्‍टिसची बचावफळी भेदणे अशक्य

उत्तरार्धात प्रॅक्‍टिसच्या कैलास पाटीलने 62 व्या मिनिटाला खंडोबाच्या गोलजाळीसमोर मिळालेला चेंडू गोलरक्षकाला चकवत गोलजाळीत ढकलला. इम्यॅन्यूएलने गोलची सोपी संधी दवडल्यानंतर आकाश माळीने 74 व्या मिनिटाला गोल केला. खंडोबाकडून माणिक पाटील, सागर पोवार, ऋतुराज संकपाळ, कपिल शिंदे, अजिज मोमीन यांनी चढायांचे प्रयत्न केले. परंतु प्रॅक्‍टिसची बचावफळी भेदणे त्यांना जमले नाही. 

खंडोबा (ब) ची पाटाकडील तालीम (ब) वर मात

तत्पूर्वीच्या सामन्यात खंडोबाने (ब) पाटाकडीलवर (ब) मात केली. पूर्वार्धात दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. उत्तरार्धात खंडोबाच्या दिग्विजय आसणेकरने 67 व्या मिनिटाला गोल केला. या गोलची परतफेड पाटाकडीलच्या सार्थक राऊतने 77 व्या मिनिटाला केली. पाटाकडीलच्या समर्थकांच्या उत्साहाला लगेचच खंडोबाच्या अक्षय बोडकेने तडा दिला. त्याने लगेचच 79 व्या मिनिटाला गोल नोंदवून संघाला आघाडी मिळवून दिली. पाटाकडीलकडून प्रथमेश पाटील, ऋषीकेश मोरे, ओंकार देवणे, साईराज पाटील, तर खंडोबाकडून ओंकार चौगुले, सत्यम घाटगे, सूर्यप्रकाश सासने, चेतन डोंगरे यांनी चांगला खेळ केला. 

शनिवारचे सामने असे : 

  1. ऋणमुक्तेश्वर तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ, वेळ - दुपारी 2 वाजता 
  2. शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ (अ), वेळ - दुपारी 4 वाजता. 


शिवाजी तरूण मंडळाला समजपत्र 

फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाविरूद्धच्या सामन्यात शिवाजी तरूण मंडळाच्या समर्थकांनी स्टेडियममधील रेलिंगला फ्लॅग लावला होता. केएसएच्या आचारसंहितेत त्यास मनाई आहे. तरीही फ्लॅग लावल्याने शिवाजी तरूण मंडळाला आज समज पत्र पाठविण्यात आल्याची माहिती केएसएतर्फे देण्यात आली.  

संबंधीत बातम्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com