महाराष्ट्राच्या संघाचे आव्हान संपुष्टात; हरियाना, गोवा, उत्तराखंड, राजस्थान उपांत्य फेरीत

महाराष्ट्राच्या किशोरी संघाचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील आव्हान बुधवारी संपुष्टात आले. उत्तर प्रदेशने महाराष्ट्रावर ५९-२८ असा दमदार विजय मिळवला.
maharashtra team of kabaddi lost match
maharashtra team of kabaddi lost matchSakal

मुंबई : महाराष्ट्राच्या किशोरी संघाचे राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेतील आव्हान बुधवारी संपुष्टात आले. उत्तर प्रदेशने महाराष्ट्रावर ५९-२८ असा दमदार विजय मिळवला. या पराभवामुळे महाराष्ट्राचा खेळ खल्लास झाला. हरियाना, गोवा, उत्तराखंड व राजस्थान या संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. हरियाना- गोवा, उत्तराखंड- राजस्थान अशा उपांत्य लढती रंगणार आहेत.

बिहार येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुल येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कबड्डी किशोरी विभाग स्पर्धेत महाराष्ट्राला उप उपांत्यपूर्व फेरीतच बाद व्हावे लागले. महाराष्ट्राने सुरुवात झोकात केली. महाराष्ट्राची कर्णधार बिंदिसा सोनारने सामन्याच्या पहिल्याच चढाईत बोनस गुण घेत खाते खोलले.

काही वेळातच ५ गुणांची आघाडी घेतली, पण ती त्यांना टिकवता आली नाही. या पिछाडीवरून खचून न जाता उत्तर प्रदेशने आपला खेळ गतिमान करीत महाराष्ट्रावर पहिला लोण देत १५-१३ अशी नाममात्र आघाडी घेतली.

पुन्हा खेळाची गती कायम राखत दुसरा लोण देत उत्तर प्रदेशने आपली आघाडी २५-१७ अशी वाढविली. विश्रांतीला २६-१७ अशी आघाडी त्यांच्याकडे होती. उत्तरार्धातदेखील खेळाचा जोश कायम राखत आणखी तीन लोण महाराष्ट्रावर देत उत्तर प्रदेशने गुणांचे अर्धशतक पार केले.

पहिली ५ मिनिटे वगळता पूर्ण डावात महाराष्ट्राचा प्रतिकार जाणवला नाही. पहिला लोण घेतल्यानंतर महाराष्ट्र संघाचा संयम सुटला. त्यांनी झटपट गुण मिळविण्याच्या नादात गुण गमवले. गुणांची पिछाडी वाढत गेल्याने ते गांगरूण गेले.

उत्तर प्रदेशच्या ज्योती व हिमांशी यांना रोखणे महाराष्ट्राला कठीण जात होते. उत्तर प्रदेशचा बचाव भेदने महाराष्ट्राला कठीण जात होते. त्यामुळेच महाराष्ट्राला मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. सुरुवातीला बिंदीसा सोनार, मोनिका पवार यांनी चांगली चमक दाखविली. नंतर मात्र त्यांच्याकडून छान कामगिरी झाली नाही.

उपांत्यपूर्व फेरीच्या लढतींवर दृष्टिक्षेप

हरियाना, पंजाब, गोवा, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड व तमिळनाडू या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. यामध्ये हरियानाने पंजाबला ६४-१९ असे नमवले. गोव्याने उत्तर प्रदेशवर ५१-३३ अशी मात केली. राजस्थानने छत्तीसगडचा ४९-१५ असा धुव्वा उडवला. उत्तराखंडने तमिळनाडूची झुंज ४१-४० अशी मोडून काढली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com