Wrestlers Protest : गंगेच्या काठावरून कुस्तीपटू माघारी; नरेश टिकैत यांनी काढली समजूत; पदके नदीत न टाकण्याचा निर्णय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

naresh tikait stops wrestlers from immersing their medals into ganga athletes return from haridwar

Wrestlers Protest : गंगेच्या काठावरून कुस्तीपटू माघारी; नरेश टिकैत यांनी काढली समजूत; पदके नदीत न टाकण्याचा निर्णय

नवी दिल्ली- हरिद्वार : भारतीय कुस्ती महासंघाचे (डब्लूएफआय) अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आज थेट हरिद्वार येथे गंगा नदीमध्येच पदके विसर्जित करण्याचा निर्धार केला होता पण भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) अध्यक्ष नरेश टिकैत यांनी समजूत काढल्यानंतर त्यांनी माघार घेतली.

आता या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्यावरील कारवाईसाठी केंद्र सरकारला पाच दिवसांची मुदत दिली असून या काळात कारवाई केली नाही तर पदके गंगार्पण केली जातील असे त्यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारच्या भूमिकेवर टीका करताना नरेश टिकैत म्हणाले की,‘‘ ही मान- सन्मानाची गोष्ट असून हे प्रकरण लैंगिक शोषणाशी संबंधित आहे. सरकार एका व्यक्तीला वाचविण्यासाठी प्रयत्न करत असेल तर ती शरमेची बाब आहे असे म्हणावे लागेल. आम्ही खेळाडूंची मान शरमेने खाली झुकू देणार नाहीत.’’

दरम्यान या कुस्तीपटूंनी त्यांची पदके गंगेत टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसनेही त्यांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. तत्पूर्वी दिल्लीतील जंतरमंतर येथे शांततेत आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना हटविण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला होता. या कारवाईनंतर संतापलेल्या कुस्तीपटूंनी आपली पदके गंगेमध्ये फेकून देण्याची घोषणा केली होती.

‘‘ पदके आमची जीव की प्राण आहेत. आम्ही त्यांना गंगेमध्ये टाकणार आहोत. आता पदकेच गेल्यानंतर आम्ही जिवंत राहण्याचे काही कारण दिसत नाही त्यामुळे आम्ही इंडिया गेट येथे आमरण उपोषण करणार आहोत.’’ असे साक्षी मलिकने म्हटले होते. विनेश फोगटनेही त्याचे समर्थन केले होते. दिल्ली पोलिसांनी मात्र त्याला विरोध केला होता.

दिवसभरात

  • खेळाडूंना न रोखण्याची यूपी पोलिसांची भूमिका

  • गंगेच्या काठी पोचताच खेळाडूंना अश्रू अनावर

  • गंगा सभेकडून खेळाडूंच्या पदक विसर्जनाला विरोध

  • ‘इंडिया गेट’वर आमरण उपोषणाचा खेळाडूंचा इशारा

  • ‘इंडिया गेट’वर आंदोलनास पोलिसांची परवानगी नाही

  • शेतकरी नेते नरेश टिकैत यांनी खेळाडूंची समजूत काढली

  • खेळाडूंनी त्यांची पदके टिकैत यांच्याकडे सोपविली

  • सरकारला खेळाडूंकडून पाच दिवसांची डेडलाईन