U19CWC Final : विजयाचा उन्माद बांगलादेशच्या अंगलट; खेळाडूंना भोगावी लागणार फळं!

टीम ई-सकाळ
Monday, 10 February 2020

व्हिडिओ फुटेज तपासल्यानंतर सदर प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर आयसीसीकडून कडक कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन सामनाधिकाऱ्यांनी दिलं आहे.

INDvsBAN : पोचेस्ट्रुम : येथे अंडर-19 वर्ल्डकप स्पर्धेची फायनल मॅच रविवारी (ता.9) भारत-बांगलादेश या संघांमध्ये झाली. यामध्ये बांगलादेशने भारताला पराभूत करत पहिल्यावहिल्या जेतेपदावर नाव कोरले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मॅचच्या शेवटपर्यंत सगळं व्यवस्थित सुरू असताना बांगलादेशच्या खेळाडूंनी मॅचचा शेवट मात्र निराशाजनक बनवला. भारत-बांगलादेश या दोन्ही टीममधील प्लेअरमध्ये हमरीतुमरी झाल्याचे दिसून आले. विजयाचा आनंद साजरा करताना बांगलादेशच्या खेळाडूंनी आसुरी जल्लोष केल्याने फायनल मॅचला गालबोट लागलं. खेळाडूंमध्ये झालेल्या बाचाबाचीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

बांगलादेश टीममधील एका खेळाडूने आक्षेपार्ह वक्तव्य आणि कृती केल्याने दोन्ही संघातील काही खेळाडूंमध्ये हातघाई झाली. त्यामुळे इतर खेळाडूही त्यांच्यादिशेने सरसावले. तसेच मैदानावर सुरू असलेला हा प्रकार पाहिल्यानंतर टीमचे इतर सदस्यही मैदानावर धावत आले. तोपर्यंत मैदानात उपस्थित असलेल्या दोन्ही अंपायर्सनी खेळाडूंना बाजूला करत वाद थांबवला.  

- U19CWC Final : 'गेम चेंजर' रवी बिष्णोईच्या नावावर नवा विक्रम! 

याबाबत युवा टीम इंडियाचा कॅप्टन प्रीयम गर्ग आणि संघव्यवस्थापक अनिल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया नोंदविल्या. पटेल म्हणाले, ''मॅच संपल्यानंतर काय घडलं ते समजलं नाही. पण आमच्यासाठी हा धक्का होता. मॅच रेफरींनी माझ्याकडे येऊन झाल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. आयसीसी संबंधितांवर कडक कारवाई करेल, याप्रकरणी आयसीसी काय भूमिका घेते, याकडे आमचे लक्ष्य आहे.''

कॅप्टन गर्ग म्हणाला, ''हार-जीत हा खेळाचा भाग आहे. कधी तुम्ही जिंकता, कधी हरता. मॅच गमवावी लागल्याने आम्ही शांत राहिलो होतो, पण बांगलादेशच्या काही खेळाडूंनी किळसवाणं सेलिब्रेशन केलं. ते खूप वाईट होत. त्यांनी असं वागायला नको होतं, पण जे झालं ते ठीक आहे.''

- Bushfire Cricket League : तिच्या विनंतीनंतर क्रिकेटचा देव उतरला मैदानात!

यानंतर युवा बांगलादेश टीमचा कॅप्टन अकबर अलीने झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली. तो म्हणाला, ''मैदानात जे झालं ते वाईट होतं. मॅच जिंकल्यानंतर काय झालं ते मलाही समजलं नाही. पण भावनेच्या भरात काहीजणांनी असं कृत्य केलं. क्रिकेटमध्ये असा प्रकार घडायला नको होता. क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ असून या टीमचा कॅप्टन या नात्याने मी सर्वांची माफी मागतो.''

या प्रकरणी नेटकऱ्यांनीही बांगलादेशवर टीकेची झोड उठवली आहे. तसेच आयसीसीने संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही केली आहे. व्हिडिओ फुटेज तपासल्यानंतर सदर प्रकारात दोषी आढळणाऱ्यांवर आयसीसीकडून कडक कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन सामनाधिकाऱ्यांनी दिलं आहे. 

- U19CWC : टीम इंडियाचा नवा स्टार; जैस्वालची वर्ल्डकपमधील 'यशस्वी' कामगिरी पाहिली का?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India and Bangladesh players involved in ugly fight after U19 World Cup final