... तर आपलं अंगण सोडून पाकला दुसऱ्याच्या दारात 'नाचावं' लागेल! | Champions Trophy IND vs PAK | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pakistan Cricket Team
... तर आपलं अंगण सोडून पाकला दुसऱ्याच्या दारात 'नाचावं' लागेल!

... तर आपलं अंगण सोडून पाकला दुसऱ्याच्या दारात 'नाचावं' लागेल!

sakal_logo
By
सुशांत जाधव

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आगामी दहा वर्षांचा मास्टर प्लॅन जाहीर केल्यानंतर भारत-पाकिस्तान क्रिकेटची पुन्हा एकदा चर्चा सुरु झालीये. 2024 ते 2031 या कालाधवीत आयसीसी स्पर्धेच्या यजमानपदाचे वाटप करताना आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीची मेजवाणी करण्याची संधी पाकिस्तानला दिलीये. 2017 नंतर ही स्पर्धा होणार की नाही असा संभ्रम होता. आयसीसीच्या खंडीभर स्पर्धांमुळे द्विपक्षीय मालिकांवर परिणाम होईल, हा विषय देखील चर्चेचा ठरला. पण अखेर आयसीसीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 2025 पासून पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात होत आहे. पाकिस्तानकडे याचे यजमानपद देण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार का? असा प्रश्न क्रिकेटमधील तमाम चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. हा मुद्दा केवळ क्रिकेटपूरता मर्यादित नाही. तर याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचीही किनार आहे. त्यामुळे केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर अनुराग ठाकूर यांनी सावध पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला आहे. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीत सहभागी व्हावे किंवा नाही हा निर्णय भारत सरकार आणि केंद्रीय गृहमंत्रालय यांच्या निर्णयावर अवलंबून असेल, असे त्यांनी म्हटले आहे. योग्य वेळी या विषयावर निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: राहुल, रोहितची क्रमवारीत घसरण; गोलंदाजांच्या यादीतही नाचक्की

काय म्हणाले अनुराग ठाकूर

आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेसंदर्भात निर्णय घेताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. भारत सरकार आणि गृहमंत्रालय एकत्रित विचार करुन यासंदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल. आतापर्यंत अनेक देशांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आहे. पाकिस्तानमध्ये खेळाडूंवर हल्ला झाल्याचा दाखला देत या प्रकरणात भारत पाकिस्तानची कोंडी करणार असल्याचे संकेतच त्यांनी दिले. 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने फायनल लढतीत भारतीय संघाला पराभूत करत ट्रॉफी उंचावली होती. या स्पर्धेत आठ संघ सहभागी असतील. जर सुरक्षिततेचा मुद्दा तापला तर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चिंता वाढू शकते. भारतासह अन्य देश पाकिस्तानमध्ये खेळण्यास तयार झाले नाही तर ही स्पर्धा त्रयस्त ठिकाणी खेळवण्याचा निर्णय पाकिस्तानला घ्यावा लागू शकतो.

हेही वाचा: भारतीय संघ पाकिस्तानात जाणार? अनुराग ठाकूरांनी दिले हे संकेत

2009 मध्ये श्रीलंकन संघावर झाला होता दहशतवादी हल्ला

2009 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या घटनेमुळे क्रिकेट जगतात पाकिस्तानची नाचक्की झाली. या घटनेनंतर 2015 मध्ये झिम्बाब्वे संघाने पाकिस्तानचा दौरा केल्याचे पाहायला मिळाले. वर्ल्ड XI संघ पाकिस्तानात खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला पुन्हा पाकिस्तानात अच्छे दिन आले. ज्या श्रीलंकन टीमवर दहशतवादी हल्ला झाला होता त्यांनी 2017 मध्ये पाकिस्तान दौरा केला. 2018 मध्ये वेस्ट इंडीज, 2020 मध्ये बांगलादेश आणि 2021 मध्ये दक्षिण आफ्रिकेनंही पाकिस्तानचा दौरा केला. पण टी-20 वर्ल्ड कपपूर्वी न्यूझीलंडने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात जाऊन माघार घेतली. त्यांच्यापाठोपाठ इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानमध्ये खेळणं असुरक्षित असल्याची भूमिका घेतली. त्यामुळे आगामी काळात पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होणार का? याबद्दल संभ्रमच आहे.

यजमानपद झाले पण स्थळ निश्चती बाकी

आयसीसीच्या बैठकीत केवळ कोणता देश कोणती स्पर्धा आयोजित करणार याची घोषणा करण्यात आली आहे. त्याचे वेळापत्रक आणि ठिकाण अद्याप निश्चित नाही. ज्याच्याकडे यजमानपद असते त्याच देशात सामने घ्यावे असे बंधन नसते. परिस्थितीनुसार ठिकाण बदलू शकते. भारतासह इतर देशांनी एकमताने पाकमध्ये खेळण्यास नकार दिला तर पाकिस्तानचे यजमानपद धोक्यात येण्याचा काहीच प्रश्न उद्भवत नाही. या परिस्थिती तोडगा काढण्यासाठी पाकिस्तान अन्य ठिकाणी स्पर्धेची मेजवाणी करु शकेल. यात त्यांचे माहेर घर असलेल्या युएईत त्यांना स्पर्धा पार पाडता येईल.

loading image
go to top