GT vs CSK IPL 2023 : दोन मराठी पोरं लढली, मात्र अखेरच्या षटकात गुजरातची झाली सरशी

IPL 2023 GT vs CSK
IPL 2023 GT vs CSKesakal

IPL 2023 GT vs CSK : चेन्नई सुपर किंग्जकडून खेळणाऱ्या दोन मराठी पोरांनी गुजरातला त्यांच्याच होम ग्राऊंडवर घाम फोडला होता. मात्र अखेरच्या षटकात गुजरातने चेन्नईचे 179 धावांचे आव्हान 5 विकेट्स आणि 4 चेंडू राखून पार करत IPL 2023 च्या हंगामाची विजयी सुरूवात केली.

चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावांची झुंजार खेळी केली. तर राजवर्धन हंगरगेकरने 4 षटकात 36 धावा देत 3 बळी टिपले. या दोन मराठमोळ्या खेळाडूंनी गुजरातचे तोंडचे पाणी पळवले होते. मात्र गिलने 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर मोक्याच्या क्षणी विजय शंकरने 22 धावांचे योगदान दिले आणि सामन्यावर पकड निर्माण केली.

IPL 2023 GT vs CSK
IPL 2023 GT vs CSK : गतविजेत्या गुजरातची विजयी सुरूवात; चेन्नईची कडवी झुंज मोडून काढत जिंकला सामना

चेन्नई सुपर किंग्जने विजयासाठी ठेवलेल्या 179 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि वृद्धीमान साहा यांनी चांगली सुरूवात करून देण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी गुजरातला 4 षटकात 37 धावांपर्यंत पोहचवले. मात्र पदार्पण करणाऱ्या 20 वर्षाच्या राजवर्धन हंगरगेकरने गुजरातला पहिला धक्का दिला. त्याने साहाला 25 धावांवर बाद केले.

यानंतर साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी गुजरातचा डाव पुढे नेला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी रचत संघाला शतकाच्या जवळ पोहचवले. मात्र हंगरगेकरने साई सुदर्शनला 22 धावांवर बाद करत ही जोडी फोडली. पाठोपाठ रविंद्र जडेजाने कर्णधार हार्दिक पांड्याला 8 धावांवर माघारी धाडत मोठा धक्का दिला.

दरम्यान, शुभमन गिलने आपले अर्धशतक 30 चेंडूत पूर्ण केले. याचबरोबर गुजरातने देखील शतकी मजल मारली होती. मात्र तुषार देशपांडेने धोकादायक गिलला 63 धावांवर बाद करत गुजरातचा सेट झालेला फलंदाज माघारी धाडला. यानंतर चेन्नईने सामना 18 चेंडूत 30 धावा असा आणला.

IPL 2023 GT vs CSK
GT vs CSK IPL 2023 : ऋतुराजच्या 13 चेंडूत 70 धावा! तरी पांड्याच्या गुजरातने चेन्नईच्या मुसक्या आवळल्या

धोनीने 18 वे षटक टाकण्यासाठी युवा पदार्पण करणाऱ्या राजवर्धन हंगरगेकरला पाचारण केले. त्याने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकत गुजरातच्या तेवतियावर दबाव वाढवला. मात्र षटकाच्या चौथ्या चेंडूवर विजय शंकरने हंगरगेकरला षटकार मारला. हंगरगेकरनेही पाचवा चेंडू निर्धाव टाकत पुनरागमन केले. हंगरगेकरने आपल्या स्पेलचा शेवटच्या चेंडूवर विजय शंकरची विकेट घेत गुजरातला मोठा धक्का दिला. शंकरने 20 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. हंगरगेकरची ही तिसरी शिकार होती.

यानंतर सामना 12 चेंडूत 23 धावा असा आला. मात्र दीपक चाहरने 19 व्या षटकात 15 धावा दिल्याने सामना 6 चेंडूत 8 धावा असा आला. राशिद खानने 3 चेंडूत 10 धावा केल्यामुळे तुषारला धावांचे फारसे कुशन मिळाले नाही. अखेर राहुल तेवतियाने तुषारला षटकार मारत धावांची बरोबरी केली. अखेर गुजरातने चेन्नईचा कडवा प्रतिकार मोडून काढत सामना 5 विकेट्स राखून जिंकला.

IPL 2023 GT vs CSK
Ruturaj Gaikwad : दोन षटकात चोपल्या 24 धावा ! संधी नाकारणाऱ्या पांड्याला ऋतुराजने दिले चोख प्रत्युत्तर

तत्पूर्वी, आयपीएल 2023 च्या पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाडने 50 चेंडूत 92 धावा चोपल्या. त्याने 9 षटकार आणि 4 चौकार मारत 13 चेंडूतच 70 धावा ठोकल्या. मात्र चेन्नईच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. दमदार सुरूवात करणाऱ्या चेन्नईच्या गुजरातने नंतर मुसक्या आवळल्या. चेन्नईने 20 षटकात 7 बाद 178 धावा करत गुजरातसमोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले. गुजरात टायटन्सकडून मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि राशिद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगला मारा केला.

(Sports Latest News)

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com