

Rudrankksh Patil
esakal
मुंबई : ज्युनियरपासून वरिष्ठ स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटीलने सोमवारी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये एकाच दिवशी दोन पदके पटकावत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला.
याप्रसंगी ‘सकाळ’ने जपानमध्ये प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होत असलेल्या ठाण्यातील या मराठमोळ्या नेमबाजाशी संवाद साधला. या वेळी त्याने भावुक प्रतिक्रिया देताना म्हटले, की आशियाई क्रीडा स्पर्धेत मागील वेळी सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावता आले होते; मात्र वैयक्तिक प्रकारात पदक जिंकता आले नाही. यंदा वैयक्तिक प्रकारात ब्राँझपदक पटकावता आले, याचा आनंद मोठा आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीबाबत विचारले असता त्याने आवर्जून नमूद केले, की मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात विश्व अजिंक्यपद स्पर्धा आटोपल्यानंतर जपानमधील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा श्रीगणेशा केला. आशियाई स्पर्धेसाठी कसून सराव केला. आता एकाच दिवशी दोन पदके पटकावता आली, हे खरोखरच अभिमानास्पद आहे. देशासाठी मौल्यवान कामगिरी करता आली हेदेखील अत्यंत आनंद देणारे आहे.
मागील आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय नेमबाजांनी सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. यंदा मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याबाबत त्याने स्पष्ट मत व्यक्त करताना म्हटले, की मागील वेळेस आमच्या संघामध्ये माझ्यासह ऐश्वर्य व दिव्यांश हे दोन अनुभवी खेळाडू होते. ऑलिंपिकमधील सहभागाचा अनुभवही होता. यंदा माझ्यासह भारतीय संघामध्ये युवा खेळाडूंचा सहभाग होता, ही बाबदेखील विचारात घेण्यासारखी आहे. त्यामुळे रौप्यपदकही नसे थोडके. पदक जिंकल्याची भावनाही मोठी आहे.
रुद्रांक्ष हा गेल्या काही काळापासून १० मीटर एअर रायफल आणि ५० मीटर रायफल थ्री पोझिशन या दोन प्रकारांमध्ये हात आजमावत आहे. यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे. वैयक्तिक प्रशिक्षक अजित पाटील, सर्बीयाचे प्रशिक्षक मिलेंको सेबिक, भारतीय नेमबाजी प्रशिक्षक थॉमस फारनिक, राष्ट्रीय प्रशिक्षक मनोजकुमार या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तो नेमबाजीचे धडे गिरवत आहे. येत्या २५ सप्टेंबरला तो ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारातील स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे. आपल्या तसेच देशाच्या पदकसंख्येत वाढ करण्याची आशा त्याच्याकडून बाळगता येणार आहे.
रुद्रांक्ष दोन प्रकारांमध्ये खेळत असल्यामुळे सराव करतानाही कस लागतो. तो दररोज सकाळच्या सत्रामध्ये रायफल थ्री पोझिशन प्रकाराचा सराव करतो. तीन ते चार तास सराव केल्यानंतर दुपारी एक ते दोन तास तो १० मीटर एअर रायफलचा सराव करतो. तसेच संध्याकाळी वर्कआऊटला प्राधान्य देतो.
मुंबईतील कीर्ती महाविद्यालयामधून बीए (जिऑग्राफी) पदवी मिळवल्यानंतर रुद्रांक्षला एमएचे शिक्षण पूर्ण करायचे आहे. बालेवाडीत क्रीडाप्रमुख म्हणून त्याची निवड झाली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा आटोपल्यानंतर घरी जाऊन काही काळ विश्रांती घेऊन तो आपल्या टीमसोबत पुढील स्पर्धांबाबत विचार करणार आहे.
क्रीडा पुरस्कारासाठी निवड न झाल्याबाबत रुद्रांक्ष म्हणाला, की मी देशासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवत आहे. पुरस्काराचा विषय हा माझ्या हातामध्ये नाही. पदक जिंकण्यासाठी मी सर्वस्व पणाला लावेन. जगज्जेतेपद मिळवणाऱ्या खेळाडूचा अर्जुन पुरस्कारासाठीही विचार न होणे ही बाब दु:ख देणारी आहे. मी तीन वर्षे यासाठी अर्ज करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.