
VIDEO: तेंडुलकरने आजच वनडे क्रिकेटमध्ये द्विशतकाची दारे उघडून दिली होती
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि शतकांचं नातं तसं खास आहे. शतकांच शतक ठोकणारा सचिन तेंडुलकर कायमच येणाऱ्या पिढीसाठी एक मोठं आव्हान ठेवायचा. सचिन तेंडुलकरने असे काही विक्रम (Sachin Tendulkar World Records) केले जे तोडण्यासाठी येणाऱ्या पिढीला त्यांचा खेळ चांगलाच उंचावावा लागला. असाच एक त्या काळी अशक्यप्राय वाटणारा विक्रम सचिन तेंडुलकरने 2010 ला आजच्याच दिवशी म्हणजे 24 फेब्रुवारीला केला.
हेही वाचा: माझ्या निवृत्तीनंतर भारतीय संघ खूप मजबूत असेल : मिताली राज
ग्वाल्हेरच्या कॅप्टन रूपसिंह स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सचिन तेंडुलकरने वनडे क्रिकेटमध्ये (ODI Cricket) सर्वात पहिले द्विशतक झळकावण्याचा (First ODI Double Century) पराक्रम केला. या खेळीत सचिनने 147 चेंडूंचा सामना केला. 25 चौकार मारले आणि 3 षटकारही खेचले.
हेही वाचा: Ranji Trophy: अजिंक्य रहाणे म्हणजे केला तर शंभर नाही तर...
भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सचिन तेंडुलकरच्या या विश्वविक्रमी द्विशतकाच्या जोरावर भारताने 401 धावांचा डोंगर उभारला. सचिन बरोबरच दिनेश कार्तिकने 85 चेंडूत 79 युसूफ पठाणमे 23 चेंडूत 36 तर कर्णधार धोनीने 35 चेंडूत 68 धावांची खेळी केली. भारताचे 402 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेचा डाव 42.5 षटकात 248 धावात संपुष्टात आला होता. दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलियर्सने एकाकी झुंज देत 101 चेंडूत 114 धावांची शतकी खेळी केली होती.
भारताकडून एस श्रीसंतने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या होत्या. श्रीसंत बरोबरच नेहरा, रविंद्र जडेजा, युसूफ पठाणने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या होत्या. प्रविण कुमारने देखील एक बळी टिपला.
Web Title: Sachin Tendulkar Create History Hit First Double Century In Odi History
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..