फॅन्सनी 'लॉर्ड ठाकूर' म्हटल्यावर कसं वाटतं? शार्दूल म्हणतो.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lord-Shardul-Thakur

शार्दूलने इंग्लंडविरूद्ध चौथ्या कसोटीत केली धडाकेबाज खेळी

फॅन्सनी 'लॉर्ड ठाकूर' म्हटल्यावर कसं वाटतं? शार्दूल म्हणतो..

Ind vs Eng Test: भारतीय संघाला इंग्लंड दौरा कोरोनामुळे अर्ध्यातच सोडावा लागला. या दौऱ्यावर विशेष आकर्षण ठरलं ते शार्दूल ठाकूरची बॅटिंग.. शार्दूल ठाकूरला संघात अष्टपैलू म्हणून समाविष्ट करण्यात आलं होतं. पण असं असलं तरी त्याच्या बॅटिंगबद्दल फारसं कोणी बोलत नव्हतं. ब्रिसबेनला शार्दूल आणि वॉशिंग्टन सुंदर जोडीने दमदार फलंदाजी केली होती. पण इंग्लंडमध्ये शार्दूलने जोरदार कामगिरी केली. गरजेच्या वेळी त्याने भारताकडून अर्धशतक ठोकले. इतकेच नव्हे तर दोन्ही डावांमध्ये अर्धशतक ठोकत त्या आपल्या संघाला विजय मिळवून दिला. त्यामुळे, त्याला नेटकऱ्यांनी 'लॉर्ड ठाकूर' असं टोपणानाव बहाल केलं. त्यावर शार्दूलने उत्तर दिलं.

"सोशल मिडियावर मीदेखील सर्व मीम्स आणि फोटो पाहिले. मी त्या मीम्सचा छान आनंद घेतला. मला नेटकऱ्यांनी दिलेली नावं मी चांगल्या अर्थाने घेतो, कारण त्यातून तुम्हाला हे दिसून येतं की चाहते तुमच्यावर किती प्रेम करतात. मी स्वत: आता फार काही साध्य केलेलं नाही. मला संघासाठी अजून खूप काही करायचंय. मी असेही दिवस पाहिले आहेत, जेव्हा मला संघात घेतल्याने याच सोशल मिडियाने माझ्यावर टीका केली होती. त्यामुळे आता मी माझी स्तुती एन्जॉय करतो", असं शार्दूल म्हणाला.

"मला माझ्यावर विश्वास होता की मी फलंदाजी करू शकतो. फक्त योग्य वेळी मला मैदानात उतरून ते इतरांना दाखवून द्यायचं होतं. कारण पिचवर तुम्ही काय करता हे महत्त्वाचं असतं. मैदानात कोणत्या ठिकाणी धावा करता येतील आणि कोणत्या जागी धावा करता येणार नाहीत, त्याचा मी आधीच अभ्यास करतो. ब्रिसबेनला माझ्या अर्धशतकानंतर माझ्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. माझा आत्मविश्वास तर वाढलाच, पण आता मला नेट प्रॅक्टिसमध्येही नियमितपणे फलंदाजीचा सराव करायला दिला जातो. याचा अर्थ संघातील इतरांनाही माझ्या फलंदाजीवर विश्वास आहे", असं मतदेखील शार्दूलने व्यक्त केलं.