Coffee with Ravi Shastri : 'आता योग्य वेळी हवी नशिबाची थोडी साथ...' कॉफी विथ रवी शास्त्री अन् मराठीत गप्पा...

Coffee with Ravi Shastri
Coffee with Ravi Shastri

Coffee with Ravi Shastri : ‘ए पुणेरी कॉफी पिणार का’, लखनौ विमानतळावर मुंबईला जायचे विमान पकडायला आलो असताना मागून ओळखीचा आणि भारदस्त आवाज आला. सकाळच्या वेळी कॉफीची ऑफर आणि तीही रवी शास्त्रीकडून? नाही म्हणणे शक्यच नव्हते. मग कॉफीचा आस्वाद घेत आजूबाजूच्या लोकांना पटकन समजू नये म्हणून चक्क मराठीत गप्पा रंगल्या...

खूप समाधान मिळते आपली टीम असा दर्जेदार खेळ करते ते बघून, रवी बोलू लागला. कालच्या सामन्यासाठी लखनौच्या मैदानाचे वातावरण पेटलेले होते. मस्त स्टेडियम उभारले आहे. सगळ्या सुविधा चांगल्या आहेत. सामना बघायला प्रेक्षकांना जसा आनंद मिळतो, तसा आम्हाला समालोचन करताना मिळाला. त्यातून भारतीय संघाने केलेला खेळ अजून खूश करून गेला.

दुखापतीतून बाहेर काढण्याची यंत्रणा

भारतीय संघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाजांत जी गुंतवणूक केली, त्यांच्यावर लक्ष दिले, सुनियोजित मेहनत करून घेतली त्याचे फळ मिळते आहे हे बघून मला खूप आनंद मिळतो आहे. क्रिकेट मग ते कोणत्याही प्रकारचे असो, वेगवान गोलंदाज चांगले असल्याशिवाय यश मिळणे कठीण असते. म्हणून गेली काही वर्षे भारतीय वेगवान गोलंदाजांवर काळजीपूर्वक लक्ष दिले गेले. समर्थ पर्याय उभे करायला शोध घेतला गेला.

गुणवान तरुण वेगवान गोलंदाजांकडून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत योग्य मेहनत करून घेतली गेली. तसेच वेगवान गोलंदाजांना दुखापती होतातच, पण दुखापतीतून खेळाडूला बाहेर काढायला एक यंत्रणा लागते ती बरोबर तयार केली गेली. मला वाटते त्याचाही चांगला परिणाम झालेला बघायला मिळतोय. जसप्रीत बुमराला दुखापत झाली आणि तो संघात नव्हता, तर काय परिणाम झाला हे आपण बघितले. आता तो तंदुरुस्त होऊन संघात परतला आणि त्याच्या पूर्वीच्या ताकदीने मारा करू शकतो आहे याचा चांगला परिणाम बघतोय आपण. झालेली प्रगती बघून वेगळे समाधान मिळत आहे.

स्टोक्सची शमीसमोर पळापळ

इंग्लंडविरुद्ध मोहम्मद शमीने केलेल्या गोलंदाजीवर रवी शास्त्री विशेष खूश होता. बेन स्टोक्स सारख्या दादा फलंदाजाला मनातून अगदी हलवले शमीने! काय नियंत्रण होते शमीचे गोलंदाजी टाकताना. एकाच टप्प्यावरून त्याने दोनही बाजूला चेंडू स्विंग केले. बेन स्टोक्सला काहीच अंदाज लागत नव्हता. नुसता शोधत होता तो चेंडू आणि नंतर यष्टी उखडताना टाकलेला चेंडू केवळ भेदक होता. मजा आली बघताना आणि समालोचन करताना, रवीने शमीचे तोंडभरून कौतुक केले.

रोहितची ‘चाबूक बॅटिंग’

शेवटी रवीने रोहित शर्माच्या खेळाचे वर्णन खास त्याच्या शैलीत केले. कालच्या सामन्यात बाकी फलंदाज लटकत खेळत असताना रोहितने काय भन्नाट बॅटिंग केली... चाबूक !! मला तर वाटले की तो वेगळ्याच खेळपट्टीवर बॅटिंग करतोय. त्याने चांगले चेंडू खेळून काढले आणि गोलंदाज जरा चुकला की त्याला फटकारले. मजा आली बघताना. तसेच रोहित खूप प्रगल्भ कप्तानी करतोय असे मला वाटते. एकदिवसीय क्रिकेटचे सामन्यातील चढ-उतार तपासून त्यावर शांतपणे रोहित उपाय शोधतो आहे. मला रोहितमधला हुशार कप्तान दिसतो आहे. खरे सांगू, आताच्या भारतीय संघात वर्ल्डकप जिंकायचे सगळे गुण आहेत. दोन वेळा आपण फक्त शेवटच्या टप्प्यात जरा कमी पडलो. यंदाच्या स्पर्धेत तसे होणार नाही असे मला आतून वाटते आहे. फक्त थोडी नशिबाची साथ हवीय योग्य वेळी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com