esakal | विम्बल्डन विजेत्या बार्टीला धक्का; ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतच बाद
sakal

बोलून बातमी शोधा

विम्बल्डन विजेत्या बार्टीला धक्का; ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतच बाद

जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या बार्टीला या पराभवाने मोठा धक्का बसला आहे.

विम्बल्डन विजेत्या बार्टीला धक्का; ऑलिम्पिकमध्ये पहिल्या फेरीतच बाद

sakal_logo
By
सूरज यादव

टोकियो - जागतिक क्रमवारीत अव्वल असलेली महिला टेनिस स्टार अॅश्ले बार्टीला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारी 48 व्या स्थानी असलेल्या स्पेनच्या एस सोरबेस टोर्मोने बार्टीला पराभूत केलं. विम्बल्डन विजेत्या बार्टीविरोधात तिने 6-4, 6-3 असा सरळ सेटमध्ये विजय मिळवला. विम्बल्डनमध्ये बार्टीने अंतिम सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिनाला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या बार्टीला या पराभवाने मोठा धक्का बसला आहे.

बार्टीने याआधी 2019 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती. आतापर्यंत तिला दोन ग्रँड स्लॅम जिंकता आल्या आहेत. विम्बल्डनमध्ये ज्या पद्धतीने बार्टीने कामगिरी केली होती ते पाहता टोकियोत तिच्याकडून दमदार खेळाची अपेक्षा होती. पदकाची प्रबळ दावेदार म्हणूनही बार्टीच्या नावाची चर्चा होती. मात्र पहिल्याच फेरीतून तिला बाद व्हावं लागलं. स्पेनच्या टेनिस स्टारसमोर बार्टीला तिच्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही.

हेही वाचा: Olympics : तिच्या पिस्टलसह लाखो भारतीयांचे स्वप्न तुटले!

2011 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी बार्टीने ज्यूनिअर चॅम्पियनशिप जिंकली होती. तेव्हा बार्टी ज्यूनिअर सर्किटमध्ये आघाडीच्या खेळाडूंमध्ये होती. मात्र 2014 मध्ये टेनिस सोडून तिने क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्यात ऑस्ट्रेलियात घरेलू क्रिकेट आणि बिग बॅश टी20 लीगमध्येही ती सहभागी झाली होती.

2016 मध्ये तिने टेनिसमध्ये पुनरागमन केलं. त्यानंतर मात्र बार्टीने मागे वळून पाहिलं नाही. 2019 मध्ये फ्रेंच ओपन जिंकलेल्या बार्टीने जून 2019 मध्ये जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं. तेव्हापासून तिने पहिलं स्थान अबाधित ठेवलं आहे.

loading image
go to top