
Umpire Marais Erasmus Video : मी पाहिलंच नाही! अंपायर इरासमुस यांनी केली मोठी चूक; चक्क पाठ फिरवली
Umpire Marais Erasmus Video RSA vs ENG : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिला वनडे सामना हा काही चांगल्या खेळींनी गाजला. मात्र सामन्यात सर्वाधिक लक्षेवेधी ठरला तो दक्षिण आफ्रिकेच्या नॉर्त्जेचा स्पेल. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. मात्र असे असले तरी नॉर्त्जेच्या बॉलिंपेक्षा अंपायर माराईस इरासमुस यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
या व्हिडिओत इंग्लंडचा फलंदाज जेसन रॉय हा नॉर्त्जेचा एक वेगवान चेंडू खेळताना दिसतोय. रॉयने हा चेंडू यशस्वीरित्या कव्हर्सच्या दिशेने टोलवला. मात्र रॉयच्या मागे स्क्वेअर लेगला उभे असलेल्या उरासमुसकडे पाहणाऱ्यांचे लक्ष लगेचच जाते. कारण रॉय चेंडू खेळत होता त्यावेळी ते रॉयकडे पाठ करून उभे होते. याचाच अर्थ की त्यांना महितीच नव्हते की चेंडू टाकला जातोय. रॉयने चेंडू खेळून झाल्यावर त्यांच्या ध्यानात आले की आपण हा चेंडू मिस केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज सिसांदा मागाला, नॉर्त्जे आणि कसिगो रबाडा यांनी दक्षिण आफ्रिकेला 27 धावांनी विजय मिळवून दिला. इंग्लंड विरूद्धचा हा पहिला वनडे सामना मानगाऊंग ओव्हल येथे झाला. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 7 विकेट्सच्या मोबदल्या 298 धावा केल्या होत्या.
आफ्रिकेच्या या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने 146 धावांची दमदार सलामी दिली होती. इंग्लंडच्या डावाच्या पहिल्या 20 षटकात सामना इंग्लंड जिंकणार असे वाटत होते. रॉयने 91 चेंडूत 113 धावांची खेळी केली. मात्र त्यानंतर इंग्लंडची फलंदाजी ढासळली.
मागालाने मोक्याच्या क्षणी इंग्लंडला धक्के दिले. मलान 59 धावांवर बाद झाला. त्यानंतर हॅरी ब्रुक्स देखील पायचीत झाला. मागालाने 46 धावात 3 विकेट्स घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देखील देण्यात आला. तर नॉर्त्जेने 62 धावात 4 तर रबाडाने 46 धावात 2 विकेट्स घेतल्या.