ऑस्ट्रेलियावरील विजयाने भारतीयांचा आत्मविश्‍वास भक्कम होईल - मिताली 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

सलामीलाच बलाढ्य ऑस्ट्रेलियाला गारद केल्यामुळे महिला टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीयांचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढला आहे, असे मत व्यक्त करणाऱ्या माजी कर्णधार मिताली राजने पूनम यादवचेही कौतुक केले.

सिडनी - सलामीलाच बलाढ्य ऑस्ट्रेलियाला गारद केल्यामुळे महिला टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीयांचा आत्मविश्‍वास कमालीचा वाढला आहे, असे मत व्यक्त करणाऱ्या माजी कर्णधार मिताली राजने पूनम यादवचेही कौतुक केले. भारताच्या या सनसनाटी विजयात लेगस्पिनर पूनमने 19 धावांत चार विकेट मिळवल्या. 

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

सर्वच जण ऑस्ट्रेलियाकडे असलेल्या खोलवर फलंदाजीबाबत बोलत असतात, पण एवढा बलाढ्य संघ 132 धावांचा पाठलाग करू शकला नाही, असे मितालीने सांगितले. या शानदार कामगिरीमुळे भारतीयांचा आत्मविश्‍वास वाढणार हे निश्‍चित आहे. ही स्पर्धी किती आव्हानात्मक आहे हे सिद्ध होते. आयसीसी मानांकनात तुम्ही कोणत्या स्थानी आहात हे महत्त्वाचे नसते हे स्पष्ट होते, असेही मितालीने मत मांडले. 

असे धक्कादायक निकाल पुढेही लागू शकतात. भारताच्या अशा कामगिरीमुळे इतर संघांच्याही आत्मविश्‍वासाला बळ मिळेल; परंतु सलामीलाच लागलेल्या अशा मोठ्या निकालामुळे स्पर्धेची उत्सुकता वाढलेली आहे, असे मिताली म्हणते. 

पूनम यादवचे कौतुक करताना मिताली म्हणाली, गेल्या काही वर्षांपासून ती भारताची प्रमुख फिरकी गोलंदाज राहिलेली आहे. तिच्या शैलीमुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाज संभ्रमात पडल्या. यजमान संघाच्या मधल्या फळीला तिने खिंडार पाडले. त्यानंतर भारतीयांनी पकड घट्ट केली. मितालीने नवोदित शेफालीचेही कौतुक केले. विश्‍वकरंडकातील पदार्पणाच्या लढतीत तिने प्रभावित केले आहे. मधल्या फळीवरचे दडपण ती कमी करू शकते. तिच्याकडे आक्रमक फटके मारण्याची चांगली क्षमता आहे, असे मितालीने सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Victory over Australia will strengthen Indians confidence says Mithali