INDvBAN : '...बस चार कदम'; भारत विजयाच्या उंबरठ्यावर!

IND-BAN-Kolkata
IND-BAN-Kolkata

कोलकाता : कर्णधार विराट कोहलीचे 27 वे कसोटी शतक भारतीय संघाला 241 धावांची आघाडी मिळवायला पुरेसे ठरले. त्यानंतर भारताच्या वेगवान गोलंदाजांनी परत एकदा जोमाने मारा करून दुसऱ्या डावात बांगलादेशची अवस्था 6 बाद 152 अशी केली. अनुभवी मुश्‍फीकूर रहीमने नाबाद अर्धशतक करताना संघाला पराभवापासून निदान सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तरी लांब ठेवले. तरीही बहुचर्चित गुलाबी चेंडू कसोटी सामनाही तिसऱ्या दिवशी संपणार, हे आता नक्की झाले आहे.

दुसऱ्या दिवशीच्या खेळाला मॅग्नस कार्लसन आणि विश्‍वनाथन आनंदने घंटानाद करून सुरुवात केली. विराट कोहली-अजिंक्‍य रहाणेची कप्तान उप कप्तानाची जोडी मैदानात उतरली आणि त्यांनी खूप सहज धावा फटकावल्या. विराट कोहलीने क्षेत्ररक्षक नसलेल्या जागेतून चौकार मारणे चालू केले. आत्मविश्‍वासाने फलंदाजी करणारा अजिंक्‍य रहाणेही मागे राहिला नाही. लवकरच रहाणेचे अर्धशतक फलकावर लागले. चांगला खेळ होत असताना रहाणेने डावखुऱ्या मंदगती गोलंदाजाच्या साध्या चेंडूला आपली विकेट बहाल केली. चांगला खेळ जमत असून रहाणे शतकी मजल गाठू शकत नाही, याचे वाईट वाटले.

विराट कोहलीला कोणताही गोलंदाज त्रास देऊ शकत नव्हता. त्याने 27 व्या कसोटी शतकाकडे 12 चौकारांसह दमदार वाटचाल केली. शतकानंतर विराटने जास्त गाजावाजा केला नाही. उपहारानंतर विराटने धावांचा वेग अचानक वाढवला. बांगलादेशी कर्णधाराने 80 षटके झाल्याक्षणी दुसरा नवा चेंडू घेतला. त्याचे स्वागत करताना अबू जायेदला एकाच षटकात 4 चौकारांसह 19 धावा विराटने काढल्या.

जबरदस्त फलंदाजी करणाऱ्या विराटची घोडदौड इबादत हुसेनने थांबवली, जेव्हा तायजुल इस्लामने त्याचा हवेत झेपावत अफलातून झेल पकडला. विराट कोहलीने 136 धावा केल्या. दुसऱ्या नव्या चेंडूवर बांगलादेशी गोलंदाजांनी चेंडू चांगलाच स्विंग केला. अश्‍विन, उमेश यादव आणि ईशांत शर्माला लवकर बाद करण्यात यश मिळाले. अखेर 4 वाजता 9 बाद 347 धावसंख्येवर विराट कोहलीने डाव घोषित केला. 

बांगलादेश संघाच्या दुसऱ्या डावाची सुरुवातही त्यांच्यासाठी भयावह होती. पहिल्याच षटकात ईशांत शर्माने शादमनला पायचित केले. पुढच्याच षटकात ईशांतने कप्तान मोमीनुल हकला बाद केले. दोनही डावांत शून्यावर बाद होणारा मोमीनुल 23 वा कप्तान ठरला. महंमद मिथुनला ईशांत शर्माचा चेंडू हेल्मेटवर आदळला, त्या धक्‍क्‍यातून तो सावरला नाही आणि चहा-पानानंतर लगेचच त्याने विकेट टाकून दिली. 

4 बाद 13 अशा खराब अवस्थेत संघ असताना मुश्‍फीकूर रहीम आणि मेहमदुल्लाची जोडी मैदानात जमली. दोघांनी धीराने फलंदाजी करताना मोकळ्या जागेत चांगले फटके मारून चौकार वसूल केले. अनुभव कसा कामाला येतो हे दाखवून देत दोघांनी ईडन खेळपट्टीवर तळ ठोकला. अडचणीतून दोघे संघाला सावरायला लागले असताना मेहमदुल्लाच्या मांडीचा स्नायू चोरटी एकेरी धाव घेताना दुखावला. 39 धावांवर झकास फलंदाजी करत असलेला मेहमदुल्ला लंगडत मैदानाबाहेर आला. लढवय्या मुश्‍फीकूरने (59*) कौशल्याने फलंदाजी करत दिवस अखेरीला भारताला अजून यश मिळून दिले नाही. 

संक्षिप्त धावफलक : 

बांगलादेश, पहिला डाव 106 आणि दुसरा डाव 32.3 षटकांत 6 बाद 152 (मुश्‍फीकूर रहिम खेळत आहे 59, मेहमदुल्ला जखमी निवृत्त 39, ईशांत शर्मा 9-1-39-4) 
भारत, पहिला डाव : 89.4 षटकांत 9 बाद 347 घोषित (चेतेश्‍वर पुजारा 44, विराट कोहली 136 -194 चेंडू, 18 चौकार, अजिंक्‍य रहाणे 51, रवींद्र जडेजा 12, वृद्धिमन साहा नाबाद 17, अल अमीन हुसैन 22.4-3-85-3, अबू जायद 21-6-77-2, इदाबत हुसैन 21-3-91-3).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com