World Cup 2011 : रात्री दोन तासांनी गजर लावून... सचिन अन् सेहवागनं सामन्याला मुकावं लागू नये म्हणून काय केलं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

World Cup 2011

World Cup 2011 : रात्री दोन तासांनी गजर लावून... सचिन अन् सेहवागनं सामन्याला मुकावं लागू नये म्हणून काय केलं?

World Cup 2011 : 2011 वर्ल्ड कप भारतीय उपखंडात होता. तो काळ असा होता, की काही शहरात गरम हवा कायम होती; तर उत्तरेच्या भागात थंडीचा कडाका. साहजिकच खेळाडूंच्या प्रकृतीवर याचा परिणाम होत होता. वर्ल्डकपसारखी सर्वात महत्त्वाची स्पर्धा असल्याने सपोर्ट स्टाफ खेळाडूंची काळजी घ्यायला आणि त्यांना प्रत्येक सामन्याकरता तंदुरुस्त ठेवायला जिवाचे रान करत होता.

चेन्नईला वेस्ट इंडीज समोरचा सामना होता ज्यात सेहवाग गुडघादुखीने खेळणार नसल्याची बातमी पसरली होती. चेन्नईच्या आयटीसी अँड हॉटेलात सेहवागला भेटायला गेलो, तेव्हा गुडघ्याच्या दुखापतीबद्दल सेहवागला विचारले असता तो म्हणाला, "काल रात्रभर खूप छान ट्रीटमेंट मला मिळाली आहे. त्यामुळे मी उद्या नक्की खेळणार." मी त्यांतर विचारले, "रात्रभर ट्रीटमेंट कोणी आणि कशी दिली? आणि तुला झोपताना त्रास नाही झाला? सेहवाग उठला आणि त्याने मला कमाल मशिन दाखवले.

हे मशिन अंदाजे कारच्या बॅटरीच्या आकाराचे होते. ज्यात बादलीभर बर्फ मावत होता. त्यातून दोन टयूब थंडगार पाणी पंप करत होत्या. ट्यूबच्या टोकाला गुडघ्याला बांधता येईल असे वीतभर लांबी - रुंदीचे रबर बैंड होते जे सेहवागने गुडघ्याला सैलसर बांधले होते. मशिनला टायमर होता, ज्याने दर १५ मिनिटे गार पाणी पंपाने त्या रबर बँडमधे जात होते आणि सेहवागच्या गुडघ्याला शेक मिळत होता.

१५ मिनिटे झाली की पंप बंद व्हायचा त्यानंतर परत अर्ध्या तासाने चालू व्हायचा. हे सगळे मशिन आपोआप करत होते. परिणामी, सेहवाग गाढ झोपला असतानाही त्याच्या गुडघ्यावर सलग ८ तास उपचार चालू राहिले आणि सकाळी झोप पूर्ण होऊन सेहवाग उठला तेव्हा त्याच्या गुडघ्यावर ना सूज होती ना वेदना. अर्थातच, दुसऱ्या दिवशी वेस्ट इंडीज समोरचा सामना सेहवाग खेळला.

स्पर्धेच्या पुढील टप्प्यात गरम हवा वाढू लागली तशी खेळाडूंना स्थायू आखडण्याची भीती सतावू लागली. क्रॅम्प्स आले की खेळाडू शरीराची पूर्ण हालचाल करू शकत नाहीत. सचिन तेंडुलकरला यावर नामी उपाय सुचवला गेला.

तहान लागल्यावर पाणी पिऊन शरीराला म्हणावा तसा उपयोग होत नसतो. त्याकरता अगोदर भरपूर पाणी पिऊन स्नायू ओल्या मातीसारखे ठेवावे लागतात. असा उपाय करताना झोपण्याअगोदर सचिन अर्धा लीटर पाणी प्यायचा. -नंतर दर दोन तासांनी गजर लावून सचिन उठायचा आणि अर्धा लीटर पाणी पिऊन परत झोपी जायचा.

सकाळी उठण्याअगोदर ३-४ वेळा अर्धा लिटर पाणी पीत राहिल्याने काहीशी झोपमोड झाली खरी; पण मैदानावर त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. अहमदाबादसारख्या प्रचंड गरम हवेतही सचिनला एकदाही क्रॅम्प्स आले नाहीत. खेळाडू मैदानावर खेळताना दिसतात;

पण खेळाडूंना तंदुरुस्त ठेवायला आणि त्यांनी वेदनेतून दुखापतीतून मुक्त करायला सपोर्ट स्टाफ किती कल्पकतेने काम करत असतो, हे आपल्याला समजत नाही म्हणून ही दोन उदाहरणे दिली.

(Sports Latest News)