
मुंबई ः कोरोनाच्या आक्रमणातून सावरताना अनेक क्रीडा प्रकारांत बदल होत आहेत. खेळ कसा सुरक्षित करता येईल, याचा विचार होत आहे; पण कमालीचा संपर्क असलेल्या कुस्तीचे पुनरागमन अवघड आहे. त्यातच मास्कसह कुस्ती अशक्यच असल्यामुळे नजीकच्या कालावधीत राज्यातच नव्हे, तर देशात तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होणे अवघडच असल्याचे स्वीकारले जात आहे.
कुस्तीत कमालीचा संपर्क असतो. त्याशिवाय हा खेळच होणार नाही. तो सुरक्षित करण्यासाठी मास्कचा पर्यायच होऊ शकत नाही. त्यासह कुस्ती खेळताच येणार नाही. मॅटचे निर्जंतुकीकरण करण्याचा विचार होऊ शकेल. स्पर्धक लढतीपूर्वी आपले हात पूर्ण स्वच्छ करून येऊ शकतील; पण मास्क घालून कुस्ती अशक्यच असल्याचे आंतरराष्ट्रीय कुस्ती पंच दिनेश गुंड यांनी सांगितले.
केवळ कुस्तीगीरच नव्हे, तर मॅटवरील पंचांनाही मास्क वापरता येणार नाही. या पंचांनी मास्क घातला, तर ते शिट्टी कशी वाजवणार. त्याचबरोबर स्पर्धकांना सूचना देता येणार नाहीत. मास्क असताना या सूचना स्पष्टपणे कशा जाणार. एकवेळ या सूचना मास्क असतानाही देता येतील, पण आंतरराष्ट्रीय लढतीच्या वेळी पंचांचे उच्चार भिन्न असू शकतात. मास्क असल्यास हा प्रश्न जास्तच बिकट होईल. अर्थात शिट्टी वाजवण्याचा प्रश्न आहेच, याकडे गुंड यांनी लक्ष वेधले.
कुस्तीगीर मास्क घालण्याचा विचारही करू शकत नाहीत. कुस्तीत झटापट होताना चेहऱ्यावरही हात लागतो. तसाच तो मानेवरही जातो. या झटापटीत मास्क निघू शकतो. अनेकदा कुस्तीगीर कानाला पकडतात. हा कानावर घातलेला मास्क निघेलही. त्याचबरोबर कुस्तीगीरांना लढतीच्या वेळी तोंडानेही श्वास घेतात. त्यातही त्यांना अडथळा येणार. मुळात कमालीचा शारीरिक संपर्क असलेल्या या झटापटीच्या खेळात मास्कसह खेळणे अवघडच नाही, तर अशक्य आहे, असेही त्यांनी सांगितले.
डमीसह सराव कायम ...
अर्थात हा दूरचा विचार झाला. जोपर्यंत सरकार मंजुरी देत नाही, तोपर्यंत सराव किंवा स्पर्धेबाबत काहीच चर्चा करता येत नाही. सध्या कुस्तीगीरांचा वैयक्तिक सराव सुरू आहे. त्यातही वैयक्तिक प्रशिक्षणच सुरू आहे. डमीबरोबर सराव करणे सुरू आहे. अर्थातच या पुतळ्याला प्रतिस्पर्धी मानून डावपेच आखण्याचा सराव करता येतो. हा पुतळा निर्जीव असल्याने सुरक्षित अंतराचे संकेत त्या वेळी काही अमलात येत नाहीत. रोप क्लायबिंग, डंबेल्स, फ्री वेट, टायरचा उपयोग करून ताकद वाढवणे, हे सर्व सुरू आहे, असे गुंड यांनी सांगितले. या डमीबाबतचा सराव नवीन नाही. अनेक स्पर्धकांकडे ते असतात. त्याची किंमतही जास्त नसते. ते आठ ते बारा हजारांना मिळतात. स्पर्धक आपल्या वजनाच्या निम्म्या वजनाच्या डमीसह सराव करतात, असेही त्यांनी लक्ष वेधले.
स्पर्धा डिसेंबरपर्यंत सुरू होण्याची आशा
अनेक गोष्टी खुल्या आहेत, परवानगी मिळत आहे तशीच कुस्तीलाही मिळेल, अशी आशा आहे. आता स्पर्धकांना सराव करताना त्यांच्याच गटातील, त्यांच्यापेक्षा जास्त तसेच कमी वजनी गटातील स्पर्धकांबरोबर डाव लढता येतात, याची उणीव सध्या भासत आहे. रोजच्या सरावाची ही उणीव भासत आहे, असे सांगताना गुंड यांनी कोरोनाची तीव्रता कमी होत आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. सर्व काही अनुकूल घडले तर कदाचित सप्टेंबरमध्ये कुस्तीचा थेट सराव होईल आणि नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये स्पर्धा होतील, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.