
पती-पत्नीच्या या चार सवयी वाढवतात भांडण... सुधारल्यास होईल वैवाहिक जीवन सुखी
मुंबई : काही वेळा पती-पत्नी अशा काही चुका सतत करत असतात ज्यामुळे त्यांचे वैवाहिक आयुष्य खराब होते. काही चुकांकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते; पण काही चुका अशा असतात की त्यांची पुनरावृत्ती नात्यात दुरावा निर्माण करू शकते.
गोष्टी समजून न घेता विनाकारण एकमेकांवर ओरडणे
काही जोडप्यांना भांडण झालं की एकमेकांवर ओरडण्याची सवय असते. यामुळे समस्या सुटण्याऐवजी वाढतच जाते. त्यामुळे वाद झाल्यावर ओरडण्याऐवजी शांतपणे बोलावे. आरडाओरडा करून बोलताना आपण अशा काही शब्दांचा वापर करतो की त्यामुळे जोडीदाराचे मन कायमचे दुखावले जाते.
जोडीदार जणू काही शत्रूच आहे
काही वेळा आपल्या जोडीदाराला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातो. वैवाहिक आयुष्यात जोडीदारांनी सोबत चालणे अपेक्षित असते, एकमेकांच्या विरोधात उभे राहाणे अपेक्षित नसते. एकमेकांना कमी लेखण्यामुळे नात्यांची वीण कमकुवत होते.
आर्थिक गुप्तता बाळगणे
आपले उत्पन्न आणि आर्थिक गुंतवणुकीची माहिती जोडीदारापासून दडवल्यास दोघांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक नियोजन करताना जोडीदाराला सोबत घेऊन वैवाहिक आयुष्याशी सुसंगत असे नियोजन करावे.
तिसऱ्या व्यक्तीला अतिमहत्त्व देणे
तुमच्या नात्यात काही अडचण असेल तर बाहेरच्या व्यक्तीशी त्याविषयी चर्चा करणे टाळा. बऱ्याचदा नवरा-बायकोच्या भांडणात सासू-सासरे हस्तक्षेप करतात. ही गोष्ट पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकते. तिसऱ्या व्यक्तीच्या सल्ल्याच्या प्रभावाने तुमच्या नात्यात दुरावा येऊ शकतो. त्यामुळे असे न करता एकत्र येऊन प्रश्न सोडवा.