तुळशीचं आटोपलं; आता लग्नसराईची धूम | Wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

wedding

वाजंत्री, मंडप, कॅटरिंग व्यवसाय गतिमान होत आहे. एकंदरीत सर्वत्र चैतन्यदायी वातावरण आहे.

तुळशीचं आटोपलं; आता लग्नसराईची धूम | Wedding

sakal_logo
By
मनोहर घोळसे : सकाळ वृत्तसेवा

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होत असल्याने खोल गाळात रुतलेले अर्थचक्र पुन्हा गतिमान होत आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून अतिशय मर्यादित वऱ्हाडी मंडळीत होणाऱ्या लग्नातील गलका वाढला आहे. वाजंत्री, मंडप, कॅटरिंग व्यवसाय गतिमान होत आहे. एकंदरीत सर्वत्र चैतन्यदायी वातावरण आहे.

हेही वाचा: घोडा ना वराती..साध्या पद्धतीने का होईना लग्नसराई जोरात..आता डिजिटलच लग्नपत्रिका

दिवाळीनंतर सर्वांनाच प्रतीक्षा असते तुळशी विवाहाची. भारतीय संस्कृतीत मांगल्याचे प्रतीक मानली जाणारी तुळस प्रत्येक घराच्या अंगणात डोलत असते. स्त्रिया दररोज तिची आराधना करतात. या तुळशीला घरातील ज्येष्ठ कन्याही समजले जाते. तिच्या विवाहानंतरच घरातील शुभकार्याला सुरुवात होते. दिवाळीनंतर घरोघरी साजरे होणारे पहिले शुभकार्य म्हणजे तुळशी विवाह. त्यानंतर लग्नाचे मुहूर्त काढले जातात. तुळशीच्या विवाहानंतरच विवाह सुरू होण्याची परंपरा आजही जपली जाते. विवाह समारंभाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व असलेले तुळशी विवाह नुकतेच घरोघरी संपन्न झाल्याने त्यापाठोपाठ लग्नाची धूम सुरू झाली आहे.

हेही वाचा: ग्रामीण भागात लग्नसराई धुमधडाक्यात! मंडप, बँडबाजा, आचारी, मंगल कार्यालयं बुक

कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुलशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने एकादशीला सर्व मंगल कार्याची सुरुवात केली जाते. विवाहाच्या आदल्या दिवशी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. गोरज मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडतो. अगदी घरच्या विवाह समारंभाप्रमाणेच अंगणातील तुळशीचा विवाह केला जातो. त्यानंतर लग्नाच्या मुहूर्तांना सुरुवात होते. आता तुळशीचे लग्न आटोपल्याने घरच्या विवाह समारंभाची लगबग सुरू झाली आहे. लग्नसराईनिमित्त बाजारपेठेत गर्दी वाढत आहे. कोरोना महामारीमुळे सर्वकाही थांबले होते. त्याला लग्नसमारंभही अपवाद नव्हते.

हेही वाचा: लग्नसराई ठरतेय दुष्काळात आधार

पावणेदोन वर्षांपासून ब्रेक लागलेली लग्नसराई मोठ्या धामधुमीत सुरू झाली आहे. मंडप, डेकोरेशन, लॉन, वाजत्री, फुलवाले आदींच्या व्यवसायावरही संकट ओढवले होते. शुभमंगल सावधान निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी घरोघरी तयारी सुरू झाली आहे. उपवर वधू-वरांच्या घरात विवाह जमविण्यासाठी उठ बैसदेखील वाढली आहे. बाजारात लग्नसराईनिमित्त खरेदी सुरू झाली आहे. कपडे, दागिने, फर्निच,र किराणा खरेदी टप्प्याटप्प्याने सुरू आहे. उपवर-वधूच्या पालकांची पावले वर-वधू सूचक मंडळाकडे वळली आहेत.

loading image
go to top