लग्नपत्रिकांचा बदलता ट्रेंड: "आमचे येथे श्रीकृपेकरून’" पासून ते...

आजही पत्रिकांच्या दुकानांमध्ये गेलं की पत्रिकांचे अक्षरशः शेकड्यांनी नमुने पाहायला मिळतात. कितीतरी वेगळीवेगळी डिझाईन आणि स्टाइल.
wedding card
wedding cardesakal

प्रियांका राऊत

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला खास क्षण असतो. लग्न म्हटलं की आपल्याला आठवते ती लग्नघरातली गडबड, लगबग, पाहुणे-रावळे, खरेदी. पण लग्न ठरल्यावर हॉल, जेवणाचे मेन्यू यासोबतच प्लॅनिंगमध्ये असणारी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नाची निमंत्रणपत्रिका.

‘आमचे येथे श्रीकृपेकरून’ पासून सुरुवात होऊन ‘...लग्नाला यायचं हं’ असं अगत्याचं निमंत्रण देणाऱ्या या लग्नपत्रिकाच विवाह आणि त्यासंबंधीत समारंभांच्या तारखा, वेळा, स्थळं आपल्या नातेवाईकांना, इष्टमित्रांना, परिचितांना नेमक्या सांगत असतात.

निमंत्रणपत्रिका कशीही असो, पारंपरिक पद्धतीने छापलेली असो की आताच्या काळाला अनुसरून केलेली ऑडिओ-व्हिज्युअल अनुभव देणारी डिजिटल पत्रिका असो त्यातून अगत्यपूर्ण स्वागताची भावना आणि आपुलकी पोहोचत असते.

लग्न ठरल्यानंतर सर्वात आधी कुलदेवतेसमोर, ग्रामदेवतेसमोर अक्षत ठेवून घरातल्या कार्यासाठी या देवतांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा अगदी पूर्वापारची. आपल्या इष्टदेवतेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून, कार्य सिद्धीस न्या अशी प्रार्थना करायची आणि सग्यासोयऱ्यांना आपल्या आयुष्यातल्या खास क्षणांचे साक्षीदार म्हणून निमंत्रित करायचं.

निमंत्रणांमागचा आपलेपणा तोच असला तरी काळानुसार निमंत्रणांच्या रूपात आणि भाषेतही पुष्कळ बदल होत गेलेले दिसतात. इतिहास काळातल्या हातानी लिहिलेल्या लांबचलांब निमंत्रण पत्रिका आज संग्रहालयांमधून पाहायला मिळतात.

छपाईच्या तंत्राने पुस्तकनिर्मिती जशी बदलली तशाच लग्नपत्रिकांचे स्वरूपही बदलले. गेल्या काही दशकामध्ये बदललेल्या तंत्रज्ञानाने लग्नपत्रिकांमध्ये आणखी कितीतरी बदल घडवून आणले.

आजही पत्रिकांच्या दुकानांमध्ये गेलं की पत्रिकांचे अक्षरशः शेकड्यांनी नमुने पाहायला मिळतात. कितीतरी वेगळीवेगळी डिझाईन आणि स्टाइल.

निमंत्रण पत्रिकेचा मजकूर हा महत्त्वाचा भाग. सगळ्या आवश्यक तपशीलांबरोबर कौटुंबिक मानपान सांभाळणे ही या मजकुराची खासियत.

अर्थात आता पत्रिकांच्या दुकानांमध्ये वेगवेगळ्या मजकुराचे तयार नमुने मिळतात. आपल्याला आवडेल त्या शैलीतली मजकूर निवडायचा, डिझाईन पक्कं करायचं आणि मजकुरातल्या गाळलेल्या जागा नीट भरून द्यायच्या.

wedding card
Viral Wedding Card : लग्नाची ३६ पानी लग्नपत्रिका व्हायरल; इतकं लिहीलंय तरी काय, जाणून घ्या

लग्नपत्रिकांमध्ये अलीकडे विलक्षण वैविध्य पाहायला मिळतं. आकर्षक रंग-रूप तर आहेच, पण कागदांचेही वेगवेगळे प्रकार आहेत.

अगदी पाच रुपयांपासून ते काही हजार रुपयांपर्यंतच्या पत्रिका उपलब्ध असतात. सध्याच्या ट्रेंडचा कानोसा घेतला तेव्हा बॉक्स पत्रिकांना चांगल्या प्रकारे मागणी आहे, अशी माहिती मिळाली.

विवाहाच्या निमंत्रणाबरोबर गिफ्ट किंवा आहेर म्हणून ड्रायफ्रूट, श्रीगणेशाची मूर्ती किंवा आपल्या पसंतीनुसार किंवा ट्रेंडनुसार काहीही वस्तू यात ठेवता येते. किमान दीडशे रुपयांपासून पुढे तुमच्या हौसेप्रमाणे या बॉक्स पत्रिकांच्या किमती वाढत जातात.

हौसेला मोल नसतं असं म्हणतात, याचं प्रत्यंतर विवाह समारंभांमध्ये येत असतं. आपल्या घरातलं कार्य स्मरणात राहिलं पाहिजे म्हणून जे जे केलं जातं त्यात ‘देखण्या’ निमंत्रणपत्रिकाही महत्त्वाच्या असतात.

कोविड महासाथीच्या काळात लग्नसमारंभांवर आलेल्या मर्यादांमुळे त्याकाळात लग्नपत्रिकांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला होता. त्यानंतर मात्र आता पुन्हा हा व्यवसाय नव्या काळातल्या डिजिटायझेशनच्या साथीनं स्वरूपात उभारी धरतो आहे.

wedding card
Ram Mandir Invitation Card: अयोध्येतील उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेची पहिली झलक, कशी आहे राम मंदिराची निमंत्रण पत्रिका? पहा व्हिडिओ

डिजिटायझेशनमुळे पत्रिकांच्या व्यवसायावर काही प्रमाणात परिणाम झाल्याचं या क्षेत्रातले जाणकार सांगतात.

हल्ली तर व्हॉट्सॲपवर निमंत्रणं पाठवण्याची पद्धतच पडून गेली आहे. लग्नपत्रिका वाटपासाठी वधू-वरांच्या कुटुंबीयांची होणारी पळापळ, हाताशी असणारे मनुष्यबळ, पोस्टाने; हस्ते-परहस्ते पत्रिका पाठविल्यावर ती वेळेत मिळेल की नाही याची काळजी, लांबलांबची अंतरं, वेळेचा अभाव अशा अनेक कारणांमुळे डिजिटाइझ पत्रिका आता स्थिरावत आहेत.

मोबाईल आणि समाजमाध्यमांचा वापर जसा वाढतो आहे, तशी निमंत्रणांची ही नवी पद्धतही लोकांच्या पचनी पडते आहे.

मात्र इमेल, व्हॉट्सॲपवर पत्रिका पाठवण्याचे काही फायदे नक्की असले तरी त्यातून निमंत्रणामागचे अगत्य किती पोहोचते याबद्दल वेगवेगळी मते ऐकायला मिळाली.

अर्थात निमंत्रणे डिजिटाइझ झाली तरी आजही कुटुंबातल्या जवळच्या व्यक्तींसाठी पत्रिका छापून घेतल्या जातातच आणि यापुढेही त्यात खंड पडणार नाही, असा विश्वासही लग्नपत्रिका व्यावसायिकांना आहे. त्यांच्या मते लग्नसराईत पत्रिकांच्या दुकानांमध्ये दिसणारी गर्दी हाच विश्वास दाखवते.

wedding card
Kiara's Wedding Card : सिड- कियाराच्या लग्नाची पत्रिका बघितलीत का?

शिवाय या बदलत्या ट्रेंडमुळे ग्राफिक डिझायनिंग वगैरेंसारखे नवे व्यवसायही निर्माण होत असल्याने पारंपरिक पत्रिका व्यावसायिकांना डायव्हर्सिफिकेशनलाही वाव आहे.

तंत्रज्ञानाने आता ऑडिओ-व्हिज्युअल पत्रिका करणे अगदी सोपे केल्यामुळे निमंत्रणपत्रिकांना एक आगळेच रूप मिळते आहे.

वधू-वरांचे फोटो, साजेसे बॅकग्राउंड म्युझिक यामुळे पत्रिका हटके होतेच शिवाय लग्नसोहोळ्याचा भाग म्हणून होणाऱ्या वेगवेगळ्या समारंभांकरता निमंत्रित करायच्या पाहुण्यासाठी थोड्या थोड्या संख्येने पत्रिका छापायचा व्यापही वाचतो.

प्री-वेडिंग शूट करणारे छायाचित्रकारच आता डिजिटल पत्रिकाही तयार करून देतात. अर्थात त्यासाठीही तुमच्या हौसेला साजेशी किंमत मोजावी लागते.

------------------------

wedding card
Wedding Card Tips : लग्नपत्रिका नक्की कशी असावी? ज्योतिषशास्त्र सांगतं की...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com