झोपेची गोळी

मैत्रिणी, काय गंमत आहे बघ, आपण स्वप्नांविषयी खूप बोलतो, त्यामानानं झोपेविषयी बोलत नाही.
friendship
friendshipsakal

- डॉ. समिरा गुजर

मैत्रिणी, काय गंमत आहे बघ, आपण स्वप्नांविषयी खूप बोलतो, त्यामानानं झोपेविषयी बोलत नाही. तू म्हणशीलच, की अर्थात कौतुक स्वप्नांचंच असणार ना. स्वप्न फार मोजके जण पाहतात आणि त्याहूनही मोजकी माणसं ती सत्यात उतरवतात. झोपेचं कसलं कौतुक? झोपा तर सगळेच काढतात. अगदी बरोबर आहे तुझं.

दिवसा, नको त्या ठिकाणी झोपा काढणाऱ्यांचं कौतुक मलाही नाही; पण रोज वेळच्या वेळी झोपून सात ते आठ तासांची पुरेशी झोप नियमितपणे घेणाऱ्या मंडळींचं आणि त्यांच्या या सवयीचं आवर्जून कौतुक करायला हवं, ते पुरेसं होत नाही असं म्हणायचं आहे मला. झोप ही गोष्ट आणि तिचे आपल्या आरोग्याला असणारे फायदे फार गृहीत धरतो आपण- किंबहुना त्याकडे दुर्लक्ष करतो.

ही गोष्ट माझ्या लक्षात आली, ती नुकत्याच माझ्या डाएटीशिअनशी माझ्या झालेल्या सांभाषणातून. मी तिच्याकडे तक्रार घेऊन गेले होते, की ‘व्यायाम करते आहे, नियमित वेळेवर खाण्याचा प्रयत्न करते आहे, तरी कधी कधी असं ब्लोटेड वाटत राहतं. ते का?’ तिनं माझ्याकडे हसत पाहिलं आणि विचारलं, ‘झोप. झोपेचं काय?’ मीही तिला प्रश्न केला, ‘झोपेचं काय? अगं, एका मुलीची आई आहे मी. शिवाय करिअर.

या सगळ्यामध्ये झोप कॉम्प्रमाइज करावीच लागते. मी पॅशनेटली काम करते. आठ-नऊ तासांची झोप कशी परवडणार मला?’ यावर ती ठामपणे इतकंच म्हणाली, ‘कमी झोपून आपल्या आरोग्याची किंमत मोजते आहेस तू. हा सौदा फायद्याचा की घाट्याचा हे तूच ठरव... आणि झोपेच्या तासांइतकीच झोपेची गुणवत्तासुद्धा महत्त्वाची.’

या संभाषणानं माझे डोळे उघडले. मी स्वतःत काही बदल करण्याचा निश्चित प्रयत्न करते आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोपेची गुणवत्ता कशी सुधारावी याचा विचार मी करू लागले. खूप जणी (जणही!) तक्रार करतात, की मी दहा वाजता झोपायला जाते खरी; पण झोप येत नाही. याचं कारण आपण झोप आपोआप येईल असं गृहीत धरतो; पण आपण झोपायला जातो आणि झोपेला बोलवायला विसरतो.

उलट ती कशी येणार नाही याची तयारी पुरेपूर करतो. अगदी झोपायच्या क्षणापर्यंत सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असतो किंवा दिवसभर बघून झाले नाहीत म्हणून आवडते शोज पाहतो. ओटीटीवरचं नवं काही पहात राहतो. माझंही हे होतंच; पण आता मी यात एक बदल केला आहे वा करू पाहते आहे. एक प्रयोग आहे म्हणा. मी याला नाव दिलं आहे, ‘झोपेची गोळी’. म्हणजे काय, आता मला झोपायचं आहे हे मी स्वतःलाच सांगायला सुरवात करते.

मी सोशल मीडियाला क्वाएट मोड ॲक्टिव्ह केला आहे. त्यामुळे दहा-साडेदहानंतर मला तिथं काही करावंसं वाटलं, तरी माझा फोनच मला करू देत नाही. (हा खरा स्मार्टफोन!) मी टीव्ही वा मोबाइलवर काही पाहत असेन, तर मी झोपण्याआधी १५ मिनिटं ते पूर्ण बंद करते. ती १५ मिनिटं खोलीतला प्रकाशही शक्यतो कमी असेल असं पाहते.

ही पंधरा-वीस मिनिटं मी आणि माझी मुलगी - डेंटल आणि स्कीन केअर रुटीन करतो. (म्हणजे दात घासतो. तोंड धुवून मोश्चरायझर वगैरे लावतो. नाव मोठं दिलं, की उगीच छान वाटतं इतकंच.) या सगळ्यामुळे घरातल्या सगळ्यांसाठीच आता झोपायची वेळ झाली, ही वातावरणनिर्मिती होते. मग मी माझ्यापुरता शोधलेला एक छान उपाय म्हणजे १० मिनिटांचं गायडेड मेडिटेशन अर्थात ध्यान. हा पर्याय उत्तमच आहे.

तेवढा वेळ नसेल तर छान शांत वाटेल असे संगीत लावून मी चक्क आय मास्क लावते. (कॉस्मेटिक आय मास्क नाही. ही झोपण्यासाठी साधी कापडाची पट्टी आहे. तिच्यात जेलपॅड आहे. तो फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करून घ्यायचा आणि कापडी पट्टीच्या आत ठेवायचा. दिवसभर विविध प्रकारची दृश्यं पाहून थकलेले, स्क्रीन टाइमनं त्रासलेले डोळे अक्षरशः निवतात. यामुळे झोप पटकन लागतेही आणि टिकतेही.)

झोपेचे शास्त्रीयदृष्ट्या खूप प्रकार असतात, त्याची चर्चा इथं करत नाही; पण माझ्या मते, झोप कशी झाली हे आपण कसे उठलो यातून कळत असतं. जाग आल्यावर फ्रेश, उत्साही वाटलं, याचा अर्थ झोप उत्तम झाली. पु. ल. देशपांडे यांचं जाग कशी आपोआप यावी याविषयी फार सुंदर वाक्य आहे.

ते म्हणतात, ‘जाग कशी यावी? गजरानं झोपमोड झाली तर काय मजा?! जाग आपोआप यावी. लहान बाळ पाळण्यात झोपलेलं असते. त्याचीच हालचाल होते. पायतले पैंजण- वाळे वाजतात आणि त्या नाजूक आवाजानं जागं होत बाळ हसतहसत उठते. जाग अशी यावी.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com