Father's Day Special I दप्तर हरवलं खरं पण, नानांनी घालून दिलेली शिस्त पुन्हा मोडली नाही

... तेव्हापासून आजपर्यंत मी कुठेही माझी एकही वस्तू हरवलेली नाही, नानांच्या शिस्तीचा दरारा आजही माझ्यावर कायम आहे.
fathers day 2022
fathers day 2022
Summary

... तेव्हापासून आजपर्यंत मी कुठेही माझी एकही वस्तू हरवलेली नाही, नानांच्या शिस्तीचा दरारा आजही माझ्यावर कायम आहे.

- अशोक शंकरराव चव्हाण, (मंत्री, सार्वजनिक बांधकाम, महाराष्ट्र राज्य)

माझे वडील डॉ. शंकरराव चव्हाण यांना आम्ही घरी 'नाना' म्हणायचो. देशातील एक महत्त्वाचे नेते असल्याने त्यांची दैनंदिनी व्यस्त असायची. मात्र तरीही अन्य कोणत्याही कुटुंबातील वडिलांचे जेवढे लक्ष असते, तेवढेच त्यांचे आमच्यावर लक्ष असायचे. (fathers day) आमची शाळा, आमचा अभ्यास, काय हवे-नको, याची ते नियमितपणे माहिती घेत. ते बाहेर जेवढे शिस्तप्रिय होते, तेवढेच घरातही होते. (Minister Ashok Chavan)

घरी जास्त दंगा वगैरे झालेला त्यांना चालायचा नाही. जीवनात शिस्त असली पाहिजे, उठणे, झोपणे, जेवण, अभ्यास सारे वेळच्या वेळी व्हायला हवे, असा त्यांचा दंडक असायचा. कधी काही चुकलो तर मुलगा म्हणून त्यांनी कधी त्याकडे डोळेझाक केली नाही. (Fathers Day Special)

मी शाळेत असताना खेळण्याच्या नादात एकदा माझे दप्तर हरवले. मी खूप शोधाशोध केली. पण ते काही सापडले नाही. दप्तर हरवल्याचे समजल्यावर नाना खूप रागावतील, याची भीती होती. मात्र कशीबशी हिंमत करून मी घरी गेलो आणि त्यांना ते सांगून टाकले. त्यानंतर जवळ-जवळ तासभर त्यांनी माझी चांगलीच परेड घेतली. त्यांच्या त्या रागावण्याचा परिणाम असा झाला की, तेव्हापासून आजपर्यंत मी कुठेही माझी एकही वस्तू हरवलेली नाही. नानांच्या शिस्तीचा दरारा आजही माझ्यावर कायम आहे. (Father’s Day 2022)

fathers day 2022
Photos : 'फादर्स डे' खास बनवायचाय; वन डे ट्रिपसाठी बेस्ट ठिकाणं

मी शाळेत, कॉलेजला असताना नाना मुख्यमंत्री होते. पण शाळा - कॉलेजला जायला आमच्यासाठी कार वगैरे नसायची. दहावीपर्यंत मी स्कूल बसने शाळेत गेलो. कॉलेज सुरू झाले तेव्हा रोज सिटीबसने जायचो. डॉ. शंकरराव चव्हाण हे माझे वडील आहेत, हे मी बराच काळ कॉलेजमध्ये माहिती होऊ दिले नव्हते. कारण मी त्यांचा मुलगा आहे, हे कळाले तर मित्र आणि शिक्षकांच्या वागणुकीत कदाचित कृत्रीमपणा वाढेल, असे मला वाटायचे. मात्र, एक दिवस एका घरगुती कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांना ते कळालेच.

डॉ. शंकरराव चव्हाण यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद सोडले तेव्हा मुंबईत आमचे स्वतःचे घर नव्हते. मुख्यमंत्र्यांच्या भल्या मोठ्या शासकीय निवासस्थानातून आम्ही सगळे आमदार निवासातील दोन खोल्यांमध्ये रहायला गेले. एका प्रशस्त बंगल्यातून दोन छोटेखानी खोल्यांमध्ये रहायला जाण्यात ना आमच्या वडिलांना कमीपणा वाटला ना आईला. आई - वडिलांचा हा साधेपणा माझ्या आयुष्यावर मोठा परिणाम करून गेला. तत्व, मूल्य हे केवळ नानांच्या बोलण्यात नसायचे, तर सार्वजनिक व वैयक्तिक आयुष्यात ते त्यावर काटेकोरपणे आचरण करायचे आणि त्यातूनच मला खुप काही शिकायला मिळाले.

fathers day 2022
Father’s Day 2022 : वडिलांना काही खास गिफ्ट द्यायचंय? हे गॅजेट्स ठरतील परफेक्ट

माझ्या कारकिर्दीत मलाही अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळण्याची संधी मिळाली. अनेक वर्षे मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, दोन वेळा खासदार राहिलो, काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष झालो. बहुतांश लोकांसाठी माझी ओळख याच पदांमुळे आहे. पण अपवादाने कधी असेही लोक भेटतात, ज्यांच्यासाठी माझी ओळख डॉ. शंकरराव चव्हाणांचा मुलगा अशी असते. ही ओळख मला सर्वाधिक आवडणारी ओळख आहे. मीच काय पण प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या वडिलांच्या नावाने ओळखले जाणे आवडत असेल. वडिलांच्या नावाने मिळणारी ओळख हा एक अभिमानाचा आणि तेवढाच भावनिक क्षण असतो.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष असताना एक दिवस कुटुंबाला घेऊन मी दक्षिण मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो होतो. जेवण झाल्यावर माझ्या दोन्ही मुलींनी आईस्क्रिमचा आग्रह धरला आणि शेजारच्याच एका दुकानात त्या आईस्क्रिम आणायला गेल्या. मुलींची वाट बघत असताना माझी नजर फुटपाथवर पुस्तक विक्री करणाऱ्या एका वयोवृद्ध नागरिकावर पडली. सहज म्हणून पुस्तके बघायला मी तिथे गेलो. दोन क्षण मला निरखून पाहत ते उच्चारले, आपण शंकरराव चव्हाणांचे चिरंजीव ना? क्षणभर मला आश्चर्य वाटले.

fathers day 2022
Fathers Day: आपल्या आईवडिलांना द्या असंही अनोखं 'गिफ्ट'

इतके वर्ष सार्वजनिक जीवनात राहिल्यानंतरही त्या विक्रेत्यासाठी माझी ओळख डॉ. शंकरराव चव्हाण यांचा मुलगा अशीच होती. मी त्यांना होकार दिला. त्यांच्याबद्दल विचारपूस केली. त्यांना तीन मुली होत्या. तिघींनाही शिकवून त्यांनी डॉक्टर केले होते. पुस्तकांची आवड असल्याने फावल्या वेळेत ते पुस्तक विक्रीचा व्यवसाय करायचे. त्यांच्याकडून मी काही पुस्तके खरेदी केली आणि त्यांचा निरोप घेतला.

असाच प्रकार एकदा काश्मिरात घडला. तीन वर्षांपूर्वी मी सहकुटूंब काश्मीरला गेलो होतो. श्रीनगरचा फेरफटका मारत असताना आमचा गाईड आम्हाला पश्मिना शालींच्या एका दुकानात घेऊन गेला. त्या दुकानदारानेही मला वडिलांच्याच नावाने ओळखले. सुमारे तीन दशकांपूर्वी डॉ. शंकरराव चव्हाण आमच्या दुकानात आले होते आणि आज त्यांचा मुलगा सुद्धा आला, याबद्दल त्याने आनंद व्यक्त केला. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतरही देशाच्या एका कोपऱ्यात आजही डॉ. शंकरराव चव्हाण यांची आठवण जीवंत असणे आणि त्यांचा मुलगा म्हणून माझेही स्वागत होणे, हा अनुभव शब्दांत व्यक्त करण्याच्या पलिकडचा होता.

नानांच्या समकालीन मंडळींसाठी सुद्धा माझी ओळख शंकररावांचा मुलगा अशीच असते. राज्यभर फिरताना अनेकदा त्यांच्या सहकाऱ्यांची भेट होते. तेव्हा त्यांच्यासाठी मी केवळ अशोक चव्हाण नसतो, तर अशोक शंकरराव चव्हाण असतो. सिंचन क्षेत्रात नानांनी केलेल्या कार्यामुळे अनेक भागातील जीवनमान बदलले आहे.

fathers day 2022
वडिलांना पाठवा Father's Day च्या हटके शुभेच्छा, वाचा एकापेक्षा एक भारी Quotes

अनेकांच्या आयुष्याचा कायपालट झाला आहे. त्या मंडळींचे सुद्धा मला मिळणारे प्रेम हे वैयक्तिक कमी आणि शंकरराव चव्हाणांचा मुलगा म्हणूनच अधिक असते. वडिलांमुळे मिळणारी ही ओळख सुखावणारी असते व तितकीच नैतिक जबाबदारीची भावना वाढवणारी असते.

डॉ. शंकरराव चव्हाणांचा मुलगा म्हणून त्यांच्या पदांचा किंवा यशाचा वारसा मिळावा, असे मला कधीही वाटले नाही. मुलगा म्हणून वारसा मिळायचा असेल तर त्यांच्यातील सद्गगुणांचा वारसा मिळावा आणि त्यांच्यासारखी कर्तबगारी करण्याइतके सामर्थ्य मिळावे, एवढीच मनीषा मी कायम बाळगली आहे.

(शब्दांकन ः अभय कुळकजाईकर, नांदेड.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com