Ganesh Chaturthi 2023 : वेंगुर्ल्याचा बाप्पा नवसाला पावला अन् सुनिल गावस्करने पिचवर धुरळा उडवला | Ganesh Chaturthi 2023 :  Sunil Gavaskar and vengurla village ganesha story discover psk95 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh Chaturthi 2023

Ganesh Chaturthi 2023 : वेंगुर्ल्याचा बाप्पा नवसाला पावला अन् सुनिल गावस्करने पिचवर धुरळा उडवला

Ganesh Chaturthi 2023 :भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांना ओळखत नाही असा कोणीच नसेल. क्रिकेटविश्वात 'लिटिल मास्टर' नावाने प्रसिद्ध असणारे सुनील गावस्कर यांनी अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावे केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा आणि 34 शतकं ठोकणारे जगातील ते पहिले फलंदाज होते.

गावस्कर यांनी अनेक मोठ्या खेळी खेळल्या आहेत, ज्या आजही क्रिकेट रसिकांच्या लक्षात आहेत. पण, अशी एक वेळ होती जेव्हा त्यांना केलेल्या नवसाला गणपती बाप्पा पावला होता. तो नक्की काय प्रसंग होता, याबदद्ल जाणून घेऊयात.  

कोकणातील वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणीचे गणेश मंदिर वेंगुर्ला परिसरात फारच प्रसिद्ध आहे. वेंगुर्ल्याहून आठ किलोमीटर वर अगदी एकाकी केवळ वीस घरांच्या गणेशवाडीत सागरी महामार्गाला लागूनच आहे. हा सागरी महामार्ग असला तरी यावर विशेष वर्दळ नाही.

१४ मे १९७५ मध्ये अक्षय्य तृतियेच्या शुभमुहूर्तावर श्री गणेशांच्या मूर्तिची स्थापना झाली. दत्तात्रेय निलकंठ तथा दादा नाईक हे या मंदिराचे निर्माते आहेत. श्रीगणेशोपासक असलेल्या या घराण्याकडे २१ दिवसांच्या भाद्रपदी गणेशोत्सवाची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. हा गणपती उत्सव वायंगणी येथून १ किलोमीटर आडवाटेला असलेल्या नाईकवाडीत आजही साजरा केला जातो.  

हिच श्रींची इच्छा

सध्याच्या वाणीच्या गणेश मंदिराचे प्रतिष्ठापक दादा नाईक गणेशमंदिराच्या भागात पूर्वी ग्रामपंचायतीची इमारत होती. स्थानिक जमीनदार असलेल्या या घराण्याचीच ही जागा होती. त्याच भागात भाद्रपदातल्या उत्सवासाठी लागणान्या पार्थिव गणेश मूर्तिचाही एक कारखाना होता. कालांतराने नाईक यांच्या असे लक्षात आले की किमान एक श्रीमूर्ती गणपतीशाळेत बाकी राहायची. वर्षभर तिथेच असायची.

पुढे नाईक यांनी ग्रामपंचायतीला त्यांच्या स्वतः च्या इमारतीसाठी आपली दुसरी एक जागा दिली व या जागेत नेहमी राहणाऱ्या पार्थिव गणेशाऐवजी संगमरवरी गणेशाची स्थापना करावी, असा निर्धार केला. त्याचवेळी अमरेंद गाडगीळ यांचा श्रीगणेश कोश वाचून त्यांना सार्वजनिक स्वरूपातील श्रीगणेश मंदिर उभारण्याची प्रेरणा अधिकत्वाने मिळाली. त्यानुसार जयपूर येथून संगमरवरी मूर्ती आणली. श्रीगणेश प्रतिष्ठापना विधीवेळी श्रीगणेशाथर्वशीर्ष सहस्वारांना येवून जव कार्यक्रमही झाले. (Ganesh Temple)

वेंगुर्ल्यातील श्रीगणेश मंदिर

वेंगुर्ल्यातील श्रीगणेश मंदिर

मंदिर पूजा व्यवस्था

सकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर खुले असते. मंदिरातील श्रींची सकाळची पूजा सकाळी आठ वाजता केली जाते. नवसाचा गणपती - बऱ्याच श्रीगणेशोपासकांचा या मोरयापुढे नैवेद्य असतो.

गावस्करांच्या काकांनी घातले होते गणेशाला साकडे

क्रिकेट विश्वाचे लिटल मास्टर सुनील गावसकर हे मुळचे वेंगुर्ल्याचे आहेत. एकोणीसाव्या शतकाच्या दरम्यान गावसकर यांचा क्रिकेट विश्वातील परफॉर्मन्स ठिकच होता. त्याची काळजी वाटत होती म्हणून त्यांचे काका बबन गावसकर यांनी या गणेशाला नवस केला. (Ganesh Chaturthi 2023)

सुनिल गावसकर यांचे काका बबन गावस्कर वेंगुर्ल्यातील उभादांडा येथे राहतात. त्यांनी सुनिलजींच्या विक्रमाआड येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी बाप्पाला साकडं घातलं. त्यानंतर लगेचच सुनील गावसकर यांचा विक्रमाला गवसणी घालण्याचा वेग वाढला, होता.

तेव्हा बबन गावस्कर यांनी सपत्नीक येवून नवस फेडला होता, अशी माहिती संयज वेंगुर्लेकर यांच्या आडवाटेचे गणपती या पुस्तकात देण्यात आली आहे.