Ganesh Chaturthi 2025 :  'गौराईच्या जागराला झाली रातं गं, झाली रातं'; या गाण्यांशिवाय अपूर्ण आहे गौराईचा जागर

Gauri Festival 2025: गौराईच्या आगमनाने घराघरात उत्साह, पारंपरिक गाण्यांनी जागर
gauri ganapati song
gauri ganapati songesakal
Updated on

Gauri Ganpati 2025 :  उद्या मोठ्या उत्साहात गौराईचे घरी आगमन होत आहे. गणेशाच्या पाठोपाठ गौराई आणि शंकरोबा, गंगा यांचेही घरोघरी पूजन केले जाते. राज्यभरात वेगवेगळ्या पद्धती आणि परंपरा जपत गौरीचा सण पार पडतो.

उद्या गौरींचे आगमन होते, परवा त्यांचे जागरण आणि तेरवा दिवशी त्या सासरी परतणार. हे तीन दिवस म्हणजे सासुरवाशीनींसाठी पर्वणीच म्हणावी लागेल. गौराईच्या जागराला गल्लीतील,गावातील महिला एकत्र जमतात आणि गौराईंच्या गाण्यांचा फेर धरतात.

gauri ganapati song
सोनपावलांनी आली गौराई

गौरी ही पार्वतीचे प्रतिक म्हणून पुजली जाते. गौराईच्या रूपात साक्षात पार्वती माताच आपल्या घरी येते. पार्वतीमाता प्रत्येक सासुरवाशीन स्त्रिचे प्रतिनिधित्व करते. ती माहेरी येते, मैत्रिणींच्या मेळ्यात गाणी गाते, गाणी म्हणते. झिम्मा फुगडीचे फेर धरते. आणि माहेरचा मानपान घेऊन प्रेम उराशी घेऊन ती सासरी परतते.

या गाण्यांमधून गौराई प्रत्येक सासुरवाशीन महिलेचे प्रतिनिधित्वच करते. आपली लेक माहेरी आल्या प्रमाणे महिलाही हौस करतात.

गौरी गणपतीची गाणी :

1. गाणे : सूर्य उगवला...

सूर्य उगवला ठाण्याला, चंद्रभागेच्या कोन्याला

मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला

बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला

रजा नाही जायाला, पंचमीच्या सणाला

या घरचा उंबरा गं, कधी मला सुटंल

बाप माझा विठ्ठल गं कधी मला भेटंल- १

मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला

बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला

रजा नाही जायाला, गवरीच्या सणाला

या घरचा उंबरा गं, कधी मला सुटंल

आई माझी रुक्‍मिणी गं, कधी मला भेटंल- २

मी पाहते चंद्राला, पदर माझ्या खांद्याला

बंधू आलेत न्यायला, रजा नाही जायाला

रजा नाही जायाला, दसऱ्याच्या सणाला

या घरचा उंबरा गं कधी मला सुटंल

भाऊ माझा पुंडलिक कधी मला भेटंल- ३

कारल्याच्या वेलाखाली...

कारल्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी

जोडव्याचे जोड सांडलं काय करू मामाजी

सांडलं तर सांडू दे, तुजं न्हवं बापाचं

करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी- १

भोपळ्याच्या वेलाखाली का गौरी उभीशी

पैंजणाचं जोड सांडलं काय करू मामाजी

सांडलं तर सांडू दे, तुजं न्हवं बापाचं

करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी- २

वाळकीच्या वेलाखाली का गौरी उभीशी

पाटल्याचं जोड सांडलं काय करू मामाजी

सांडलं तर सांडू दे, तुजं न्हवं बापाचं

करून देईन लाखाचं, चल गौरी घराशी

gauri ganapati song
Ganeshotsav : फुले व वेलींची गौराई पूजण्याची अनोखी परंपरा,निसर्गपूजेची शिकवण देणारे गौरीपूजन

गौरी तुझं डोहाळं...

गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी

हाय आंब्याच्या घसा गं वरी

आंब्याचा घस खायला बस

ताट केलंया चौरंगी बाई- १

गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी

हाय पेरूच्या घसा गं वरी

पेरूचा घस, खायला बस

ताट केलंया चौरंगी बाई- २

गौरी तुझं डोहाळं, कशा गं वरी

हाय चिक्कूच्या घसा गं वरी

चिक्कूचा घस, खायला बस

ताट केलंया चौरंगी बाई- ३

ऊठ ऊठ माळीदादा...

ऊठ, ऊठ माळीदादा, बैलं जूप रहाटाला

बैलं जूप रहाटालारे, पाणी जाऊ दे पाटाला -धृ

एवढं पाणी कशाला, खारकीच्या देठाला

एवढ्या खारका खारका कशाला, गौरीईच्या वौशाला

गौरीईचा वौसा गं, फुलांनी दरवळला

फुलांनी दरवळळा गं, उदांनी परिमळला-१

उठ, उठ माळीदादा, बैलं जूप रहाटाला

बैलं जूप रहाटाला रे, पाणी जाऊ दे पाटाला

एवढं पाणी कशाला, वाळकीच्या देठाला

एवढी वाळकं कशाला, गौराईच्या वौशाला

गौराईचा वौसा गं, फुलांनी दरवळला

फुलांनी दरवळला गं, उदांनी परिमळला-२

उठ, उठ माळीदादा, बैलं जूप रहाटाला

बैलं जूप रहाटाला रे, पाणी जाऊ दे पाटाला

एवढं पाणी कशाला, बदामाच्या देठाला

एवढं बदाम कशाला, गौराईच्या वौशाला

गौरीईचा वौसा गं, फुलांनी दरवळला

फुलांनी दरवळला गं, उदांनी परिमळला-३

सण आलाया हो...

सण आलाया हो, पंचमीचा मोठ्या आनंदाचा

बाई मी पंचमी पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी

बंधू गेल्याती हो, पंढरीला नेली नाही मला- १

सण आलाया हो, गवरीचा मोठ्या आनंदाचा

बाई मी गवर पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी

बंधू गेल्याती हो, मलयाला नेली न्हाई मला- २

सण आलाया हो, दसऱ्याचा मोठ्या आनंदाचा

बाई मी दसरा पुजला, नाना परी बंधू न्हाईत घरी

बंधू गेल्याती हो, जोतिबाला नेली न्हाई मला- ३

सण आलाया हो, दिवाळीचा मोठ्या आनंदाचा

बाई मी दिवाळी पुजली, नाना परी बंधू न्हाईत घरी

बंधू गेल्याती हो, जेजुरीला नेली नाही मला- ४

gauri ganapati song
Gauri Ganpati 2023 : कुठे सुगडाच्या तर कुठे मुखवट्याच्या असतात गौराई, विशेष आहे तिचे महत्त्व

गण्ण्या गुलाल उधळीतो...

गण्ण्या गुलाल उधळीतो

तुझ्या गुलालाचा भार

माझ्या वेण्या झाल्या लाल

जाऊन यशोदेला सांग. कृष्ण झिम्मा खेळतो

गण्ण्या गुलाल उधळीतो

तुझ्या गुलालाचा भार

माझं पैंजण झालं लाल

जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो

गण्ण्या गुलाल उधळीतो

तुझ्या गुलालाचा भार

माझ्या जोडव्या झाल्या लाल

जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो

गण्ण्या गुलाल उधळीतो

तुझ्या गुलालाचा भार

माझ्या पाटल्या झाल्या लाल

जाऊन यशोदेला सांग, कृष्ण झिम्मा खेळतो

खालच्या आळीला गं...

खालच्या आळीला गं वरच्या आळीला

कशाचा गलबला, कशाचा गलबला

पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला

अंगठी घेऊया, अंगठी घेऊया

अंगठी घेऊया गं, बारशा जाऊया

खालच्या आळीला गं वरच्या आळीला

कशाचा गलबला, कशाचा गलबला

पहाटेच्या वाऱ्यामंदी राम हा जन्मला

तोरड्या घेऊया, तोरड्या घेऊया

तोरड्या घेऊया गं, बारशा जाऊया.

gauri ganapati song
Gauri Ganpati 2023 :  सोन्याच्या पावलांनी गौराई आली अंगणी; जाणून घ्या गौराईच्या आगमनाचे संपूर्ण विधी

पांढरी गं जाई...

पांढरी गं जाई, कातरी गं पानं

गौराई नेसलीया पिवळं पितांबर- धृ

नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला

वारुळाचा नागराजा धरी पदराला

नागराजा-नागराजा आम्ही काय केलं

कुंकवाचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- १

पांढरी गं जाई, कातरी गं पानं

गौराई नेसलीया पिवळं पितांबर

नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला

वारुळाचा नागराजा धरी पदराला

नागराजा-नागराजा आम्ही काय केलं

डोरल्याचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- २

पांढरी गं जाई, कातरी गं पानं

गौराई नेसलीया पिवळं पितांबर

नेसूनी-नेसूनी गेली वारुळाला

वारुळाचा नागराज धरी पदराला

नागराजा-नागराजा आम्ही काय केलं

जोडव्याचं लेणं आम्हा शंकरानं दिलं- ३

देवळामागली तुळस...

देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली

जोडव्याच्या नादी गवर माझी वाकली

देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली

पैंजणाच्या नादी गवर माझी वाकली

देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली

पाटल्याच्या नादी गवर माझी वाकली

देवळामागली तुळस पाना-फुलानं झाकली

बिलवराच्या नादी गवर माझी वाकली

आषाढ मासी...

आषाढ मासी एकादशी, पहिली पंचमी कुण्या दिशी

अगं या पंचमीचा नाग, गणेशाला आली जाग, साजणीबाई.

अगं या गणेशाची खीर, गवरीची भाजी चीर, साजणीबाई.

अगं या गवरीची भाजी, शंकराला पोळी ताजी, साजणीबाई.

अगं या शंकराची पोळी, दसऱ्यानं दिली हाळी, साजणीबाई.

अगं या दसऱ्याची घाटी, शिलंगणाला झाली दाटी, साजणीबाई.

अगं या शिलंगणाचं सोनं, दिवाळीनं केलं येणं, साजणीबाई.

अगं या दिवाळीचा दिवा, संक्रांतीनं केला धावा, साजणीबाई.

अगं या संक्रांतीचा वौसा, शिमगा राहिला दोन मासा, साजणीबाई.

अगं या शिमग्याची होळी, पाडव्यानं दिली हाळी, साजणीबाई.

अगं या पाडव्याची गुडी, आक्कीतीनं टाकली उडी, साजणीबाई.

अगं या आक्कीतीचं आळं, बेंदराला खावी फळं, साजणीबाई.

अगं या बेंदराचा बैल, पंचमीला माहेरी येणं होईल, साजणीबाई.

gauri ganapati song
Gouri Pujan 2023 : यंदाची गौर होणार एकदम झकास, मैत्रिणींना शेअर करा हे मेसेज खास

अगं या गवरीच्या महिन्यात...

अगं या गवरीच्या महिन्यात, लागली गवर, गवर फुलायला.

बंधू लागला लागला बोलायला, जातो बहिणीला बहिणीला आणायला

कर शिदोरी शिदोरी भरपेट, भर शिदोरी शिदोरी काठोकाठ

गेला बहिणीला बहिणीला आणायला, आडव्या नदीला नदीला आला पूर

पाच फुलांची फुलांची केली नाव, त्यात बसले बसले बहीण भाऊ

वल्हं मारतो मारतो नामदेव, नामदेवाच्या देवाच्या एकादशी

भावजं तळती तळती अनारस, आला बहिणीला बहिणीला घेऊईनी

वाढ बहिणीला बहिणीला दूध-भात, रात्री म्हशीनं म्हशीनं दिली लाथ

तांब्या पडला पडला गोरणीत, कुठला वाढू मी वाढू मी दूध-भात

वाढ बहिणीला बहिणीला दही-भात, त्याही दह्याचं दह्याचं केलं ताक

कुठला वाढू मी वाढू मी दही-भात.

वाढ बहिणीला बहिणीला ताक-भात, त्याही ताकाची ताकाची केली कढी

त्याही कढीचा कढीचा नाश झाला.

कुठला वाढू मी वाढू मी कढी-भात.

साथी शंकर बनामधी...

साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी

गणूनं काय हरवलं, गणूनं तोंड हरवलं

हरवलं तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या- १

साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी

गणूनं काय हरवलं, गणूनं पैंजण हरवलं

हरवलं तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या- २

साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी

गणूनं काय हरवलं, गणूनं साखळी हरवली

हरवली तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या- ३

साथी शंकर बनामधी, एकलाच गणू माझा वनामधी

गणूनं काय हरवलं, गणूनं तोरड्या हरवलं

हरवलं तर हरवू द्या गं, गणूला घरला घेऊन या- ४

झिम्मा घालू झिम्मा...

झिम्मा घालू झिम्मा, एवढ्या का राती

माझ्या झिम्म्याला झाली रात गं झाली रात

महादेवाच्या देवळात गं देवळात

असा महादेव नखरेदार गं नखरेदार

त्याच्या रथाला चक्र चार-चक्र चार

चारी चाकाला ऐंशी मोती गं ऐंशी मोती

ऐंशी मोत्याला नऊशे नाक गं नऊशे नाक

पोरी झिम्म्याला खाली वाक गं खाली वाक

(टीप : या गाण्यात ‘महादेवा’च्या ठिकाणी अन्य देवांची नावे घालून तीच ती कडवी पुन्हा गायली जातात.)

gauri ganapati song
Chaitra Gouri 2023 : चैत्र नवरात्रीच्या उपवासाला काय चालतं काय नाही?

सूर्या चमक चमक...

सूर्या चमक; चमक माझं घर, मी का लोटतो, लोटतो दार-घर

अंगी चोळी ही चोळी हिरवीगार, ठस्याठस्यांचं नेसलं पीतांबर

पायी जोडवी, जोडवी झणकार, पायी मासोळ्या; मासोळ्या किनकारी

पायी पैंजण, पैंजण वंजभार, कमरपट्टीला, पट्टीला कुलपं चार

हाती पाटल्या पाटल्या नक्षीदार, पुढं बांगड्या बांगड्या हिरव्यागार

गळ्यात चिताक-चिताक शोभेदार, गळ्यात डोरलं डोरलं पाच पदर

चार तोळ्यांची तोळ्याची बोरमाळ, नाकी नथ ही नथ ही चमकीदार

कपाळी कुंकू हे कुंकू झळके लाल

लेक कुणाची, कुणाची तालेबार.

अंगणी साखळी...

अंगणी साखळी उभी गं

तिकडून आली सासू गं

जाच करती मला गं

पांगळी करावी तिला गं

अंगणी साखळी उभी गं

तिकडून आला सासरा गं

जाच करतो मला गं

आंधळा करावा त्याला गं

अंगणी साखळी उभी गं

तिकडून आली नणंद गं

जाच करती मला गं

नांदाय धाडा तिला गं

अंगणी साखळी उभी गं

तिकडून आला नवरा गं

गोड बोलतो मला गं

जेवायला वाढा त्याला गं

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com