आमच्या ‘ह्यां’ना चहाही येत नाही!

आमच्या ‘ह्यां’ना चहाही येत नाही!

पुरुष आणि पाककला या विषयावर कोरोनामुळं लागलेल्या लॉकडाउनच्या आधी चर्चा केली असती, तर तुम्ही नक्कीच नाकं मुरडली असती. ‘पुरुषांचा स्वयंपाकाशी काय संबंध,’ असाही सूर आळवला असता. मात्र, गेल्या पाच महिन्यांत परिस्थिती बदलली आहे. पुरुषांना काही ना काही कारणास्तव स्वयंपाकघरात पत्नीला, आईला मदतीचा हात देणं भागच पडतंय. हा हातभार कांदा कापून देण्यापासून भाजी करण्यापर्यंत काहीही असू शकतो. पुरुष पाककलेचे तीन टप्पे असतात, ते कोणते आणि कसे याच्या काही भन्नाट किस्से... पुरुषांच्या स्टोव्ह पेटवायला शिकण्यापासून सुगरणच बनवू शकेल, असे सर्व पदार्थ बनवण्यापर्यंतचा लेखाजोखा..

भारतातील बहुतांश पुरुषांचं (म्हणजे मुलांचं) बालपण आईच्या हातचे पदार्थ खाण्यात, तिच्या हातून आपल्या आवडी-निवडी पूर्ण करून घेण्यात जातं. तरुणपणात घराबाहेर राहावं लागलं (तरच) मेसचा, हातानं करून खाण्याचा अनुभव त्याला मिळतो. माझ्यासारख्या अगदी थोड्यांना अगदी टिनएजर असल्यापासूनच हॉस्टेल आणि मेसचा अनुभव घ्यावा लागतो आणि तो खरंच समृद्ध करणारा, बरंच काही शिकवणारा ठरतो. वाढत्या अंगाला चांगल्या-चुंगल्या खाण्याची गरज असते, मात्र मेसमध्ये सकाळी मटकी, रात्री चवळी, दुसऱ्या दिवशी सकाळी मटकी अधिक चवळी, रात्री पुन्हा मटकी अधिक चवळी अधिक हरभरा, अशी डिशची व्हरायटी मिळायला सुरुवात झाल्यावर घरच्या खाण्याची अगदी मनपासून आठवण येऊ लागते.

मग मेसमध्ये त्यातल्या त्यात वरण-भात खाऊन पोट भरायचं किंवा रस्त्यावरच्या गाडीवर जाऊन वडा-पाव, अंडा भूर्जीसारखे पदार्थ खाऊन कुपोषित होण्यापासून वाचणं मुलांच्या हातात राहतं. या सर्वांचा कडेलोट होतो जेव्हा बाहेरचं खाऊन आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. मला आठवतं, पुणे विद्यापीठातील फिजिक्स डिपार्टमेंटच्या आम्हा अनेक विद्यार्थ्यांना गॅस्ट्रोचा त्रास झाला. मेसमधल्या अन्नातून ही बाधा झाली असणार. आम्हा चार-पाच जणांना रात्री विद्यापीठाच्या गाडीत घालून फर्ग्युसन रस्त्यावरील एका  हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची वेळ आली. मला पूर्ण बरं व्हायला चार महिने लागले होते...तर असा कडेलोट झाल्यावर मग तुम्ही मित्र मिळून वेगळी खोली घेण्याचा व तिथंच स्वयंपाक करून खाण्याचा विचार शेवटचा पर्याय म्हणून सुरू करता.

केल्याने होते आहे रे...

आम्ही तिघा मित्रांनी अशीच विद्यापीठ रस्त्यावरील एका बंगल्याच्या वरील मजल्यावर दोन खोल्या भाड्यानं घेतल्या आणि काही दिवसांतच स्टोव्ह आणून स्वयंपाकाचे प्रयोग सुरू केले. पदार्थ करपत, हात भाजत आमची पाकसिद्धी आकार घेत होती आणि काही दिवसांतच पदार्थांवर हात बसू लागला. आधी भाकरी करणं सोप्पं वाटायचं, पण नंतर लक्षात आलं त्यापेक्षा पोळ्या सोप्या. प्रत्येक भाकरी वेगळ्या आकाराची, वेगळी भाजलेली...त्यापेक्षा कणिक नीट तिंबली गेल्यास सर्वच पोळ्या व्यवस्थित होतात, असाही शोध लागला. बंगल्यांच्या मालकीणीची एक सून आमच्याच मजल्यावर राहायची. तिनं आमच्या पोळ्या फुकताना पाहिल्या आणि खचलीच! ती म्हणाली, ‘‘अहो, माझी एकही पोळी फुगत नाही आणि तुमच्या सगळ्याच्या सगळ्या फुगतात! माझ्या सासुबाईंनी पाहिलं तर इज्जत काढतील माझी...’’ तर अशी ही पुरुषांची स्वयंपाकाची खासियत. स्वयंपाक करताना विज्ञानाचा आधार घेणार... पोळी का फुगते, तर लाटताना छोटा गोल करून झाल्यावर त्यात तेल व पीठ टाकायचं, लाटताना सगळीकडून नीट ‘लॉक’ करायची...बघा करून, नक्की फुगते.

एकदा हा कॉन्फिडन्स आला की थालपीठं, पुऱ्या, पराठे काहीही बनवा, डरने का नही. एकदा आमच्या आसाममध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीसह चार-पाच जणांना जेवायला बोलावलं. मस्तपैकी पुरी, बटाट्याची भाजी आणि श्रीखंड असा बेत. श्रीखंड चितळेंचच होतं, पण बटाट्याची छानपैकी भाजी बनवली. पोळ्या लाटून त्यावर मोठ्या वाटीनं गोल कापत पुऱ्या बनवल्या. टोपलीभर एकाच आकाराच्या छान फुगलेल्या पुऱ्या पाहून आमची मैत्रीण चाटच पडली. ये सब पुरी एकजैसी कैसे...हा प्रश्‍न तिनं अनेकदा विचारला, बिचारीला वाटीची आयडिया काही माहिती नव्हती. शेवटी ती सांगितल्यावर ती भयंकर इम्प्रेस झाली!  असो. तर या टप्प्यावर पुरूषांची पाककलेशी ओळख होते किंवा मग मेसच्या खाण्याला नावं ठेवत कधी एकदा घरचं खायला मिळतं (किंवा लग्न होतं.) याची वाट पाहण्याशिवाय पर्यायच उरत नाही.

बॅचलर असताना स्वयंपाक करणं हे तसं कष्टाचं काम. घरात सगळ्या वस्तू असणं आणि संपलेल्या वस्तू लक्षात ठेऊन घेऊन येणं तसं अवघड काम. हा खरंतर महिलांचा प्रांत म्हणायचा. मग स्वयंपाक करताना भन्नाट गमती-जमती होतात. खिचडीसाठी आधण टाकल्यावर तांदूळच नसल्याचा साक्षात्कारही होतो...एकदा उलटं झालं. कणिक तिंबल्यावर भाजीसाठी काहीच नसल्याचं लक्षात आलं. मग काय, कणक थोडी लाटून त्यात तिखट, मीठ, ओवा घातला आणि गोळे करून खिचडीत टाकले. मस्त ‘बट्ट्याची खिचडी’ तय्यार! तर, अशा पद्धतीनं गरजेतून काही रेसिपीही जन्माला घातल्या आणि हा दुसरा टप्पाही पूर्ण झाला.

स्वयंपाक, महिला आणि असुरक्षितता..

पुरुष स्वयंपाक कलेचा तिसरा टप्पा सुरू होतो लग्नानंतर. एक निरिक्षण, ज्या महिलांच्या नवऱ्यांना स्वयंपाक येतो, त्यांना आपला नवरा आपल्यावर विसंबून नाही, याचा खरंतर मनातून रागच येतो...आमच्या यांना साधा चहाही येत नाही, असं सांगणाऱ्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिलाय का तुम्ही कधी? या तिसऱ्या टप्प्यात काहीही न येणाऱ्यालाही बोलणी खावी लागतात आणि थोडं फार येणाऱ्यालाही. ‘काही नको तुमचं स्वयंपाक करणं, माझं सगळं स्वयंपाकघर पसरवून ठेवता आणि ते आवरायलाच माझा दुप्पट वेळ जातो,’ ही सामान्यपणे येणारी प्रतिक्रिया.

अर्थात, लॉकडाउनमुळं यात थोडा बदल झाला आहे. घरात धुणी-भांडी, फरशी पुसणं आणि स्वयंपाकाला असलेल्या बायका सोसायटीमध्ये प्रवेश करू शकत नाही. त्यामुळं दिवसभर ऑफिसचं काम, मुलांचं आवरणं व त्याच्या जो़डीला पूर्णवेळ स्वयंपाकघर यामुळं महिला वैतागल्या आहेत. त्यात नवऱ्यानं अगदी थोडी मदत केली तरी त्यांना त्याचं अप्रूप वाटणं साहजिकच...त्यात चहा करणारा, कुकर लावणारा, भाज्या चिरून देणारा, त्या फोडणीला टाकणारा, कणिक तिंबून देणार नवरा मिळाल्यास सोन्याहून पिवळंच म्हणायचं. पुरुषांच्या पाककलेच्या आयुष्यातलाही हा सोन्याचाच काळ म्हणायचा. कधी नव्हे स्वयंपाक करू शकणाऱ्या पुरुषांना बायका महत्त्व देऊ लागल्या आहेत.
थोडक्यात, मनुष्याच्या आयुष्याचे ब्रह्मचर्य ते वानप्रस्थाश्रम हे टप्पे असतात, तसेच त्याच्या पोटभरण्याचेही असतातच. तुम्ही आता कोणत्या टप्प्यावर आहात, ते पाहा आणि तसे वागा... शेवटी हृदयापर्यंतचा मार्ग पोटातूनच जातो हे कोणत्याही टप्प्यावर महत्त्वाचंच...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com