
Mother’s Day: का साजरा केला जातो 'मदर्स डे'? जाणून घ्या रंजक इतिहास
Mother's Day 2022, History and Significance: आज मे महिन्याच्या दुसरा रविवार म्हणजे मातृदिवस.पण तुम्हाला माहिती का मातृदिवसाची सुरुवात कशी झाली? त्यामागे एक गोष्ट आहे. तिच गोष्ट आज आपण समजून घेणार आहोत.
नेमकी कशी झाली मातृदिवसाची सुरुवात-
अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरु व्हायच्या आधी ‘रिव्हीस जर्विस’ या बाईने अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतात ‘मदर्स डे वर्क' नावाने तेथील स्थानिक महिलांचा एक क्लब स्थापन केला. यामध्ये त्यांनी आईने आपल्या मुलांची काळजी कशी घ्यावी? याची सखोल माहिती देऊन प्रात्यक्षिके दाखवून तेथील महिलांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आणि मग पुढे जागोजागी असे अनेक क्लब सुरू झाले.
तिच्याबरोबर हे काम करायला ‘जुलिया वॉर्ड हावे’ देखील होत्या. त्यांचं काम सुरुच होतं. पुढे अमेरिकेत सिव्हिल वॉर सुरू झालं, गृहयुद्धाचा अमेरिकेत भडका उडाला. आपल्या देशातील अशांतता थांबवण्यासाठी या क्लबमधील सगळ्या माताच एकत्र आल्या. त्यांनी त्यांच्या परीने अमेरिकेतलं सिव्हिल वॉर थांबवण्यासाठी प्रयत्न केले पुढे युध्द संपलं. परंतु मदर्स क्लब काम मात्र अजून जोमाने चालू राहिलं. या सगळ्या एकत्र आलेल्या मातांसाठी असा एखादा दिवस असावा अशी कल्पना 'ऍना जर्विस' (Anna Jarvis) या रिव्हिस जार्विस यांच्या मुलीच्या कल्पनेतून पुढे आली.
ऍना जर्विस ही आपल्या आईचं काम आणि तिच्या सोबत काम करणाऱ्या इतर महिलेचं काम बघतं होती. या सगळ्या माताविषयी कृतज्ञता व्यक्त केली जावी, अशी तिच्या मनात इच्छा निर्माण झाली. पुढे 1905 ला दुदैवाने तिच्या आईचं निधन झालं आणि आईच्या सामाजिक कामाचा वसा ती पुढे चालवू लागली. ती काम करत असताना 1908 मध्ये फिलाडेल्फिया मध्ये मधील एका डिपार्टमेंटल स्टोअरचे मालक जॉन वनामेकर यांनी ऍनाच्या मदर्स क्लबला आर्थिक मदत केली.
मिळाले त्या आर्थिक मदतीतून तिच्या मनातील मदर्स डे ची संकल्पना प्रत्यक्षात उतरून तिने पहिल्यांदा मदर्स डे सेलिब्रेशन केलं. हा पहिला मातृदिवस अमेरिकेतील वेस्ट व्हर्जिनिया मधील ग्राफ्टन येथील एका चर्चमध्ये पहिल्यांदा मदर्स डे साजरा करण्यात आला.पहिला 'मदर्स डे' अशा प्रकारे यशस्वी झाल्यानंतर ऍना जर्विस हिने मदर्स डे हा संपूर्ण देशभर साजरा केला जावा अशी मागणी लावून धरली. कारण हे होतं की अमेरिकेत बर्याचशा सुट्ट्या ह्या केवळ पुरुषांशी निगडित असून एकाही स्त्रीसाठी कुठलीही सुट्टी दिलेली नाही, अशी क्लबमधील काही महिलांची तक्रार होती.
म्हणूनच मग संपूर्ण देशात मदर्स डे साजरा केला जावा यासाठी तिने सह्यांची मोहीम सुरु केली. आणि कितीतरी लोकांच्या सह्या येत आहेत, हे पेपर मध्ये छापून आणायला सुरुवात केली. पुढे 1912 ला तिच्या या लढ्याला यश आलं आणि अमेरिकेत अनेक चर्चमध्ये, राज्यांमध्ये, शहरांमध्ये मदर्स डे साजरा केला जाऊ लागला.पण वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जाऊ लागला.
कालांतराने पुढच्या दोनच वर्षात म्हणजे 1914 ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी मे मधला दुसरा रविवार हा अमेरिकेत “मदर्स डे” म्हणून साजरा केला जाईल असे जाहीर केले. पुढे वेगवेगळ्या देशात मातृदिवस साजरा होऊ लागला आणि तसाच आपल्या भारतातही मातृदिवस साजरा होऊ लागला या दिवसाला आपल्याला मातृसत्ताक संस्कृती इतिहासाची जोड भेटली आणि आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोक पुढं येऊ लागले.