
Mother's Day: अनाथांची माय! सिंधूताईंना गरोदरपणात नवऱ्याने घरातून हाकललं होतं; वाचा माईची अंगावर काटा आणणारी कहानी
परमेश्वराला प्रत्येकाच्या घरी जाता आले नाही म्हणून त्याने प्रत्येकाच्या घरी आई दिली. पण ज्यांना आई नसते किंवा जे मुलं अनाथ असतात. अशा मुलांसाठी परमेश्वर कुणा एकाला पाठवतो आज आपण मातृदिनविशेष मालिकेत अशा एका अवलियाबद्दल जाणून घेणार आहोत, जी अख्ख्या महाराष्ट्राची माय होती.
अनाथांची माय, गरीबांची आई, महाराष्ट्राची माई अशा अनेक नावानी ओळखलं जाणारं नाव म्हणजे सिंधूताई सपकाळ. सिंधूताईने अनाथ मुलांचे संगोपन करण्यात आपले संपूर्ण आयुष्य वेचले. समाजाप्रती त्यांनी दिलेल्या योगदानामुळे त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. आज सिंधूताई हयात नाही मात्र त्यांचा जीवन प्रवास कित्येकांना प्रेरित करणारा आहे.
एका व्याख्यानादरम्यान सिंधुताई आपला जीवन संघर्ष सांगतात, त्या दहा वर्षांच्या असताना एका 35 वर्षांच्या व्यक्तीशी त्यांचं लग्न लावून देण्यात आलं होतं. अकराव्या वर्षी त्या सासरी नांदायला गेल्या. त्या 20 वर्षाच्या होत्या जेव्हा गरोदरपणातच त्यांच्या नवऱ्याने पोटावर लाथ घालून त्यांना हाकलून दिलं. त्यावेळी गरोदरपणातही माहेरच्या लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. अशाच अवस्थेत सिंधुताई रेल्वे स्टेशनवर भीक मागून उदरनिर्वाह करू लागल्या. अखेर, त्यांनी आपलं बाळंतपणही रेल्वे स्टेशनवर स्वतःच केलं. नवजात बाळाची नाळही सिंधुताईंनी स्वतःच दगडाने मारुन तोडली. दगडाच्या 16 व्या ठोक्याला ही नाळ तुटल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये केलाय.
त्या दरम्यान त्यांनी रेल्वे स्टेशनवर भिकाऱ्यांची होणारी दयनीय अवस्था पाहिली. त्या भुकेल्याला दोन घास द्यायच्या. तहानलेल्याला पाणी पाजायच्या,दिसेल त्या गरीबाची सेवा करायच्या. त्यांना कित्येक अनाथ मुलं रस्त्यावर दिसले. या अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदनची 1994 साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात या स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.
सिंधुताईंनी आपले संपूर्ण आयुष्य अनाथांसाठी समर्पित केले आहे. त्यामुळेच त्यांना अनाथांची आई म्हणतात. त्यांनी1050 अनाथ मुले दत्तक घेतली. त्या अभिमानाने भाषणात सांगायच्या की त्यांच्या कुटुंबात 207 जावई आणि 36 सूना आहेत. 1000 पेक्षा जास्त नातवंडे आहेत. सिंधूताईंची स्वतःची मुलगी वकील आहे आणि त्यांनी दत्तक घेतलेली अनेक मुले आज डॉक्टर, इंजिनीअर, वकील आहेत आणि त्यातील अनेकजण स्वतःचे अनाथाश्रम देखील चालवतात.
अनाथांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सिंधुताई सपकाळ आज या जगात नाही. पण त्यांनी केलेलं कार्य आज प्रत्येकाला प्रेरित करणारं आहे. त्यांचं वयाच्या 73 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. मात्र त्यांनी मातृत्वला दिलेला खरा अर्थ प्रत्येकाला कायमस्वरुपी स्मरणात राहील. सिंधुताई सपकाळ हा तो तारा होता. ज्या ताराने कित्येकांच्या आयुष्यात तेजोमय प्रकाश दिला. आई या शब्दाला न्याय देणारी अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांचे कार्य कायमस्वरुपी अजरामर राहणार.