Love Matters: आंतरधर्मीय विवाहातून आदर्श घालून देणारं वकील जोडपं; दिलशाद-संजय यांची अनोखी जोडी

dillshad muzawar.
dillshad muzawar.

Valentine Week Special : असं म्हणतात, की प्रेमाला वयाचं, जातीचं, धर्माचं, लिंगाचं असं कशाचंही बंधन नसतं. या विचारांप्रमाणेच साधारण 18 वर्षांपूवी मी आणि माझा जोडीदार ऍड. संजय मुंगळे आम्ही आंतरधर्मीय - जातीय विवाह केला. आम्ही दोघेही पेशाने वकील आणि दोघांचीही पहिली भेट अर्थातच कोर्टात झाली. मी 'क्रिमिनल' विषयांत आणि संजय हा 'सिव्हिल' विषयात तज्ञ असल्याने कधी कधी तर कोर्टात आमोरासमोर आमची भेट व्हायची. नुसता भेटच नाही तर भरकोर्टात काहीवेळेस खडाजंगीही व्हायची. इथूनच आमची ओळख वाढली आणि मग पुढं ओळखीचं रूपांतर मैत्री आणि प्रेमात झालं. माझा जन्म मुस्लिम कुटूंबात झालेला. घरचे लोक फार धार्मिक नव्हते. माझ्या वडिलांकडूनच परिवर्तनवादी विचारांची शिदोरी मला मिळाली होती. शिवाय मी सुरूवातीपासूनच म्हणजे अगदी शाळा-कॉलेजमध्ये असल्यापासूनच विविध सामाजिक चळवळीशी जोडले गेले होते. इकडे माझा जोडीदार संजय याची कौटुंबिक पार्श्‍वभूमी विशेष अशी नव्हती. पण त्याच्या जडणघडणीत अनेक अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्यासोबतच त्याने विविध विषयांवर वाचलेली पुस्तके यातूनच त्याचा एक वैचारिक पाया तयार झालेला होता. दोघेही एकाच कोर्टात शिवाय कामाच्या मोकळ्या वेळेत आमच्यात होणाऱ्या गप्पा, मस्ती इतकंच नव्हे तर अगदी भांडणातूनही आम्ही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत राहिलो आणि पुढे जाऊन आम्ही लग्नाचा विचार केला.

अर्थातच दोघांचीही कौटुंबिक पार्श्‍वभूमी दोघांनाही पाठिंबा देणारी असल्याने आमच्या प्रेमाला घरातून फारसा विरोध झाला नाही. आणि दोघेही त्या काळात इतर मुला - मुलींचे विवाह लावणे, त्यांचे वैवाहिक प्रॉब्लेम सोडवणे हा सगळा भाग आमच्या कामात येत असल्याने आम्हालाही आमच्या आंतरधर्मीय विवाहाबद्दल विशेष असं वाटत नव्हतं. पण तरीही काहीतरी वेगळं करतोय, याची जाणीव मात्र मनात होती. आम्ही आंतरधर्मीय विवाहाच्या निर्णयाबरोबरच लग्नात अशी एक गोष्ट केली, की ती समाजापुढे आदर्श म्हणून उभी राहिली. सतत परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या आम्ही दोघांनीही अमावस्येदिवशी विवाह करत अंधश्रद्धेला फाटा देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न केला.

आपल्या समाजात आजही बहुतांश कुटुंबात लग्न झालेल्या मुलीचे नाव हमखास बदललं जातं. पण दिलशाद मुजावर या नावाची ओळख मला माझ्या कामामुळे मिळाली होती. त्यामुळेच संजयने आणि त्याच्या कुटुंबियांनीही माझ्याकडे नाव बदलण्याचा अट्टाहास केला नाही. मी आजही माझं नाव ऍड. दिलशाद मुजावर असंच लावते. ही अतिशय छोटी गोष्ट वाटत असली तरी मला असं वाटतं, की या छोट्या छोट्या दिसणाऱ्या रूढी परंपरांना नाकारतच आपण मोठ्या बदलांकडे पाऊल टाकत असतो.

 हेही वाचा - Love Matters: आम्हाला सावित्री-ज्योतिबांच्या वाटेवरचं सहजीवन हवंय; श्वेता-मंगेश सांगताहेत आपली लव्हस्टोरी
अर्थातच आम्हां दोघांचही प्रेम मॅच्युअर होतं. म्हणजे हल्ली किंवा अगदी त्या काळात प्रेमात असणाऱ्या जोडप्यांचा जो विचार, उद्देश असायचा, तो आमच्यात नव्हता. म्हणजे तशी आम्ही थोडीफार मजा-मस्तीदेखील केली. अगदी रेनकोटचा कलर मॅच करण्यापासून ते शेजारी-शेजारी स्कूटर लावून एकमेकांवर इंप्रेशन पाडायचे प्रयत्नही आम्ही केले. कधी कधी चोरून चोरून सिनेमेदेखील पाहिले. आम्ही दोघेही ज्या कोर्टात काम करायचो तिथून जवळच्या अंतरावरच कोल्ड्रिंकचं एक दुकान होतं. तिथेच आम्ही बऱ्याचदा भेटून गप्पा मारायचो. अशा बऱ्याच गोष्टी आम्हीही केल्या. माझा स्वभाव थोडासा डॅशिंग असल्याने आणि क्रिमिनल विषयांत माझा हातखंडा असल्याने सुरूवातीपासूनच मला अन्यायाविरोधात आवाज उठवून लढा देण्याची सवय होती. संजयला मी आवडण्याचं हे एक कारण होतं. आणि संजय माझ्या अगदी विरूद्ध स्वभावाचा होता. त्याचा हळवेपणा, इतरांबद्दलची त्याची असणारी काळजी त्याच्यातल्या या गुणाने मी इंप्रेस झालेले. केवळ इतकंच न करता जाणीवपूर्वक एकमेकांच्या आवडी - निवडी, गुण - दोष याचा विचार करत, दोघांनीही अगदी विचारपूर्वक आमच्या लग्नाचा निर्णय घेतला. दोघांचीही वैचारिक बैठक पक्की होती. 

प्रेमाबद्दल आम्हा दोघांचही हेच मत आहे, की प्रेम ही जबाबदारी पार पाडण्याची गोष्ट आहे. ती एक लाँग टर्म प्रोसेस आहे. आपलं वय वाढतं तसं आपले हार्मोन्स चेंज होतात. आणि या काळात साहजिकच आपल्याला परलिंगाबद्दल आकर्षण वाटू लागतं. मुलांना बाह्य सौंदर्याचं आकर्षण वाटू लागतं आणि मुल यालाच प्रेम समजून बसतात. पण असं न करता प्रेम आणि आकर्षण यातला फरक, प्रेमाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. शिवाय एकमेकांच्या आवडी - निवडी, गुण - दोष याची पडताळणी केली पाहिजे. पण हे सगळं करताना आपण आपल्या करियर कडेही तितकंच लक्ष द्यावं. या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून युवा पिढीने प्रेम केलं पाहिजे. 

हेही वाचा - Love Matters : म्हणून मला स्वत:ची नसबंदी अधिक योग्य वाटली; कृष्णात-स्वातीचं समतेच्या वाटेवरील सहजीवन
गेल्या अठरा वर्षांतल्या आमच्या सहजीवनातल्या प्रवासात आम्ही दोघेही आजवर माणूस म्हणून जगत आलोय. आम्हाला भेटणाऱ्या प्रत्येक माणसाकडे त्याच्या जाती-धर्मानुसार न ओळखता ती समोरील व्यक्तीही आपल्यासारखाच माणूस आहे अशीच त्याला ओळख देत आलेलो आहे. त्याच्याशी वागताना आपण माणूस म्हणूनच वागलं पाहिजे. याच विचाराला सोबत घेऊन आम्ही आमच्या सहजीवनाची वाट आजही तितक्याच आनंदाने चालतोय!

- शब्दांकन : सौरभ पोवार, इचलकरंजी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com