Loksabha Election 2024 : लोकसभेच्या मैदानात शेतकरी नेत्यांचा स्वबळावर संघर्ष ; शेट्टी, तुपकर स्वतंत्रपणे, कडू स्वपक्षातर्फे

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गावागावापर्यंत पक्षाची यंत्रणा लागते, कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करावे लागते. पाच-सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये संपर्क असावा लागतो.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 sakal

मुंबई : लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी गावागावापर्यंत पक्षाची यंत्रणा लागते, कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करावे लागते. पाच-सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये संपर्क असावा लागतो. आता तर पक्षाच्या यंत्रणेच्या पलीकडे मित्रपक्षांचे सहकार्यसुद्धा आवश्यक असते. अशा परिस्थितीमध्ये दोन एकांड्या शिलेदारांनी महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे, त्यापैकी एक आहेत राजू शेट्टी आणि दुसरे रविकांत तुपकर. दोघेही शेतक-यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे आणि महायुती किंवा महाविकास आघाडीपासून वेगळे राहून स्वतंत्रपणे ते लढत आहेत.

बुलढाणा मतदारसंघातून रविकांत तुपकर हे अपक्ष लढत आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी यांच्यासोबत त्यांच्यातील कार्यकर्त्याची जडणघडण झाली आणि प्रभावी वक्तृत्व आणि मुद्देसूद आक्रमक मांडणीमुळे ते राज्यभर लोकप्रियही झाले. शेतकरी संघटनेच्या परंपरेप्रमाणे शेट्टी आणि तुपकर यांच्यात मतभेद होऊन तुपकर राजू शेट्टी यांच्यापासून वेगळे झाले. बुलढाणा मतदारसंघात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते नरेंद्र खेडेकर समोरासमोर आहेत.

दोघांनाही महायुती आणि महाविकास आघाडीतील तीन तीन पक्ष तसेच त्यांच्या राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांच्या प्रचारसभांची मदत झाली. याउलट तुपकर कोणत्याही पक्ष आणि नेत्यांच्या मदतीशिवाय एकांड्या शिलेदाराप्रमाणे लढले आणि मतदारसंघात उत्तम वातावरण निर्मिती केली. केवळ शेतक-यांच्या प्रश्नांसाठी केलेले लढे एवढ्याच भांडवलावर सामान्य शेतकरी कुटुंबातील हा तरूण मैदानात उतरला आहे. २०२१ मध्ये त्यांनी सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी केलेले अन्नत्याग आंदोलन राज्यभर गाजले.

कृषी कायद्यांविरोधात रेल्वे रोको, कर्जमाफीसाठी पुणे-मुंबई आत्मक्लेश पदयात्रा तसेच अलीकडेच मंत्रालय ताब्यात घेण्यासाठीचे आंदोलन अशी अनेक आंदोलने त्यांच्या नावावर आहेत. गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळावे, म्हणून वयाच्या अवघ्या सोळाव्या-सतराव्या वर्षी विहिरीत केलेल्या आंदोलनापासून सुरू झालेला हा प्रवास लोकसभेच्या रणांगणापर्यंत पोहोचला आहे. मतदार त्याला कसा प्रतिसाद देतात, हे पाहावे लागणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी हे आणखी एक एकांडे शिलेदार मैदानात आहेत. दोन वेळा खासदार झालेल्या शेट्टी यांना २०१९ च्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ मध्ये भारतीय जनता पक्षासोबत राहून त्यांनी निवडणूक लढवली. परंतु भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करून एनडीएमधून बाहेर पडणारे ते पहिले खासदार होते.

Loksabha Election 2024
Loksabha Election : मुख्यमंत्री शिंदे आक्रमक, महायुतीत पेच ;भाजप आणि शिवसेनेतील चार जागांचा तिढा कायम

भाजपसोबत गेल्याबद्दल त्यांनी आत्मक्लेश आंदोलनही केले. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत ते महाविकास आघाडीसोबत होते, परंतु शेतकरी प्रश्नांसंदर्भात आघाडीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आघाडीची साथ सोडली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी त्यांच्यासाठी जागा सोडणार होती. हातकणंगलेची जागा शिवसेनेकडे असल्याने शेट्टी यांनी मशाल चिन्हावर लढावे, असा आग्रह उद्धव ठाकरे यांनी धरला, तो मान्य नसल्याने वेगळी वाट चोखाळताना त्यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. शेतक-यांसाठी गेल्या वीस वर्षांहून अधिक काळ केलेला संघर्षाची शिदोरी घेऊन ते मैदानात उतरले असून शेतक-यांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. २०१९च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता तर महायुती, महाविकास आघाडी व ‘वंचित’चीही ताकद त्यांच्याविरोधात मैदानात आहे.

जानकरांची यंदा परभणीतून ‘शिट्टी’

राज्याच्या राजकारणात स्वतंत्र लढणाऱ्यांत बच्चू कडू, रवी राणा, महादेव जानकर यांचाही उल्लेख करावा लागतो. पैकी महादेव जानकर महायुतीच्या पाठिंब्यावर परभणीतून उभे आहेत. सध्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी महायुतीकडून परभणीची उमेदवारी मिळवली असली तरी ते त्यांचे राजकारण राष्ट्रीय समाज पक्षांच्या माध्यमातून स्वतंत्रपणे होत असते. त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात कांशिराम यांच्या बहुजन समाज पक्षातून केली. त्यानंतर माढा, बारामती या पश्चिम महाराष्ट्रातील पट्ट्यात यशवंत सेनेच्या माध्यमातून धनगर समाजाचे राजकारण केले. त्यानंतर स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.

अमरावतीत राणा, कडू यांची खडाखडी

अमरावतीच्या बडनेराचे आमदार रवी राणा यांनीही महायुतीच्या पाठिंब्यावर त्यांच्या पत्नी व विद्यमान खासदार नवनीत राणा यांना भाजपकडून मैदानात उतरवले आहे. या जिल्ह्यात त्यांचे राजकारण युवा स्वाभिमान पक्ष या नावाने स्वतंत्रपणे केले जाते. यंदा निवडणुकीच्या तोंडावर नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याच जिल्ह्यातील प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनीही पक्षातर्फे दिनेश बूब यांना नवनीत राणा यांच्याविरोधात उभे केले आहे. राजकीय पक्षांच्या प्रचंड ताकदीपुढे हे सगळे एकांडे शिलेदार आपापल्या ठिकाणी लढून राज्याचे लक्ष वेधून घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com