औरंगाबादेत होणारे क्रीडा विद्यापीठ आता पुण्यात; देवेंद्र फडणवीस, प्रशांत बंब, बागडेंनी केला विरोध

गणेश पिटेकर
Tuesday, 15 December 2020

विधानसभेत आज मंगळवारी (ता.१५) महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे विधेयक पारित करण्यात आले आहे.

औरंगाबाद : विधानसभेत आज मंगळवारी (ता.१५) महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचे विधेयक पारित करण्यात आले आहे. सदरील हे विद्यापीठ पुणे येथे होणार आहे. यावर विधानसभेत चर्चा रंगली. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे औरंगाबादमध्ये प्रस्तावित असताना विद्यापीठ पुण्याला कशाला असा प्रश्‍न मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी उपस्थित केला आहे.

या प्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादजवळ करोडी येथे मंजूर झाले होते. गंगापूर तालुक्यातील वाळूज येथे क्रीडा सुविधा उभारल्या जाणार होत्या. जे औरंगाबादला मंजूर केले होते ते पुण्याला चालले आहे. विद्यापीठ औरंगाबाद येथे व्हायला पाहिजे. तसेच नागपूरला क्रीडांगण हवे. गंगापूर-खुलताबादचे आमदार प्रशांत बंब विधेयकावर म्हणाले, की  चार वर्षे पाठपुरावा करुन करोडी येथे जागा फायनल करण्यात आली आहे. मराठवाड्याचे सर्व कार्यालये इतरत्र हलवले जात आहे. क्रीडा विद्यापीठाबाबत होऊ नये. सरकारला विनंती आहे, की हे विद्यापीठ होताना औरंगाबादेत झाले पाहिजेच.

उपकेंद्र होऊ नये. पुण्यातही क्रीडा विद्यापीठ व्हावे. तसेच ते औरंगाबादेत व्हावे असे बंब म्हणाले. हरिभाऊ बागडे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ औरंगाबादला ठरले होते. जागाही उपलब्ध आहे. विद्यापीठ हे औरंगाबादला करावे अशी आग्रहाची मागणी बागडे यांनी केली. विरोधकांचे म्हणणे ऐकल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा मानस आहे. ते मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. तेथे ते होणार आहे.        

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sport University To Be Set Up In Pune Instated Of Aurangabad