रेशनिंग तांदळाचा या खंडात होतोय काळाबाजार; तब्बल 33 हजार मेट्रिक टन धान्य 13 देशांत निर्यात

रेशनिंग तांदळाचा होतोय काळाबाजार
रेशनिंग तांदळाचा होतोय काळाबाजार

नवी मुंबई : सर्वसामान्य गोरगरिबांना पुरवण्यात येणारा रेशनिंगवरील तांदळाचा साठा गैरमार्गाने मिळवणाऱ्या टोळीने आठ महिन्यांमध्ये तब्बल 80 कोटी रुपये किमतीचा 33 हजार मेट्रिक टन तांदूळ आफ्रिकेच्या 13 देशांत निर्यात केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात कर्नाटकातील ज्या रेशनिंगच्या दुकानातील तांदळाचा काळाबाजार करण्यात आला, त्या तीन दुकानदारांना अटक केली असून, उर्वरित 15 आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिली. 

पनवेल शहर पोलिसांनी गेल्या महिन्यामध्ये पळस्पे येथील पलक रेशन गोडाऊनवर छापा मारून काळ्याबाजारात विक्रीसाठी साठवणूक करून ठेवलेला तब्बल 33 लाख रुपये किमतीचा 110 टन तांदळाचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी विशेष तपास पथक स्थापन केले होते. त्यानंतर या पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून सार्वजनिक वितरणासाठी असलेला एकूण 270 मेट्रिक टन तांदूळ साठा जप्त केला. 

जप्त केलेला तांदळाचा हा साठा कर्नाटकातील विविध रेशन दुकानांतून आणल्याचे निष्पन्न झाल्याने पथक तेथे रवाना झाले. कर्नाटकातील तीन रेशन दुकानदारांना पथकाने अटक केली असून, नवनाथ लोकु राठोड (25), सत्तार चांदसाहब सय्यद (25) आणि कृष्णा दामो पवार (45) अशी त्यांची नावे आहेत. हे तिघेही कर्नाटकातील विजापूर भागातील आहेत. 

या तिघांची अधिक चौकशी केली असता, रेशनिंगच्या तांदळाच्या काळाबाजारात आणखी 15 आरोपींचा सहभाग असल्याचे पुढे आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. या काळाबाजारात सहभागी असलेल्या आरोपींनी विविध कंपन्यांमार्फत भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) ओएमएसएसमधील तांदूळ ई-लिलावाद्वारे घेतला. तसेच, लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने गोरगरीब नागरिकांसाठी दिलेला तांदूळही त्यांनी गैरमार्गाने मिळवला. त्यानंतर तांदळाच्या निर्यातीवर बंदी असतानाही त्यांनी आठ महिन्यांमध्ये सुमारे 33 हजार मेट्रिक टन तांदूळ आफ्रिकेच्या 13 देशांमध्ये काल्कन फुड्‌स या कंपनीमार्फत निर्यात केल्याचे आढळून आले आहे. या तांदळाची किंमत भारतीय बाजारपेठेत सुमारे 80 कोटी रुपये असल्याचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. 

इतर राज्यांतील धान्यही काळाबाजारात? 
या काळाबाजारात कर्नाटकातील सात, तर सोलापूरमधील एका एजंटचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्या खात्यामध्ये 47 लाख रुपये गेल्याचेही तपासात उघडकीस आले. या कारवाईत जप्त केलेल्या तांदळाबरोबरच पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, चंदिगड आदी राज्यांतील गोण्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे या राज्यांतूनही तांदूळ व गव्हाचे काळाबाजार केला असण्याची शक्‍यता संजय कुमार यांनी व्यक्त केली. 

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com