सिडकोच्या 15 हजार घरांचा मुहूर्त हुकला; बांधकामे अपूर्ण, विजेत्‍यांमध्ये नाराजी

सिडकोच्या 15 हजार घरांचा मुहूर्त हुकला
सिडकोच्या 15 हजार घरांचा मुहूर्त हुकला

नवी मुंबई : कोरोनामुळे व्यवहार मंदावले आहेत. सिडकोच्या नवी मुंबईतील महा गृहप्रकल्पालाही या संकटाचा फटका बसला असून नवीन घरांचा ताबा मुदतीत (ऑक्‍टोबर 2020) मिळण्याची शक्‍यता मावळली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील तब्बल 11 हजारपेक्षा अधिक विजेते वेळेत घर देता का घर, अशी आळवणी सिडकोला करत आहेत. 

स्वप्नपूर्ती आणि व्हॅलीशिल्प या गृहप्रकल्पांच्या यशानंतर सिडकोने तब्बल 14 हजार 838 घरांचा महा गृहप्रकल्प राबवला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. त्याला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. कागदपत्रांच्या छाननीनंतर सिडकोने हप्ते भरण्याची मुदत दिल्यावर आयुष्याची जमापुंजी एकत्र करून अनेक ग्राहकांनी हप्त्यात घरांची रक्कम भरली आहे. 

घणसोली, तळोजा, कळंबोली, द्रोणागिरी या चार ठिकाणी या प्रकल्पांतील इमारतींचे बांधकाम सुरू आहे. बहुतांश भूखंडांवर 14 माळ्यांचे उंच टॉवर उभे राहिले आहेत; मात्र अंतर्गत सजावट, विजेची कामे, अंतर्गत रस्ते, बगिचे, लिप्ट आदी महत्त्वाची कामे अद्याप झाली नाहीत. बांधकामे अर्धवट अवस्थेत असल्यामुळे त्या मालमत्तांचा ताबा अद्याप अभियांत्रिकी विभागाकडेच आहे. ही घरे पणन विभागाकडे हस्तांतरित झाल्याशिवाय त्याचा ताबा देता येणार नाही. बांधकामेच अर्धवट अवस्थेत असल्यामुळे घरांचा ताबा देण्याच्या हालचाली सुरू झालेल्या नाहीत. 

...म्हणून कामे रखडली 
2018 मध्ये सिडकोतर्फे महा गृहप्रकल्पाची योजना जाहीर झाली. तेव्हा सिडकोतर्फे सर्व नियम, हप्ते आणि मुदतीबाबत माहिती देण्यासाठी एक माहिती पुस्तिका देण्यात आली होती. त्यानुसार ग्राहकांना पहिल्या टप्प्यात 11 हजार 178 घरे ऑक्‍टोबर 2020 मध्ये, दुसऱ्या टप्प्यात दोन हजार 796 घरे डिसेंबर 2020 आणि तिसऱ्या टप्प्यात 864 घरे मार्च 2021 मध्ये ताबा देण्यात येणार होता, परंतु कोरोनामुळे या प्रकल्पांवर काम करणारे कामगार गावी गेल्याने कामे पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे मुदतीत घरे तयार न झाल्याने विजेत्यांना प्रत्यक्ष घराचा ताबा मिळण्यासाठी मे महिन्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागेल असे दिसते. 

पूर्ण हप्ते भरणाऱ्यासाठी कसरत 
सिडकोच्या महा गृहप्रकल्पातील घरे खरेदी करणारे बहुतांश ग्राहक हे भाड्याच्या घरांमध्ये राहतात. त्यांनी बॅंकांकडून कर्ज घेऊन हप्ते भरले आहेत. बॅंकांनी हप्ते दिल्यामुळे आता ग्राहकांना महिन्याचा हप्ता भरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना एकीकडे पगारातून कपात होणारा बॅंकेचा हप्ता; तर दुसरीकडे घराचे भाडे भरायचे आहे. त्यातच कोरोनामुळे पगार कपात होत असल्याने बॅंकेचे हप्ते आणि घराचे भाडे भरताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. 

रेराकडून सिडकोला मुदतवाढ 
कोरोनामुळे सिडकोच्या इमारती उभारण्याच्या कामाला जोरदार फटका बसला आहे. कंत्राटदार कंपन्यांचा कामगार गावी निघून गेल्यामुळे सहा महिने बांधकाम पूर्णपणे थांबले होते. अशा परिस्थितीत ग्राहकांना दिलेल्या मुदतीत घर देण्यास जमणार नसल्याने सिडकोने आधीच महारेराकडून घर ताब्यात देण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ करून घेतल्याचे सिडकोतर्फे सांगण्यात आले आहे. 

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com