या जिल्ह्यातील शिक्षकांना मिळतेय ऑनलाईन प्रशिक्षण; शिक्षकांची डिजिटल साक्षरतेकडे वाटचाल

शिक्षकांना डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण
शिक्षकांना डिजिटल साक्षरतेचे प्रशिक्षण

माणगाव : जिल्हा शिक्षण संस्था पनवेल यांच्या माध्यमातून प्राचार्य चंद्रकला ठोके यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी डिजिटल साक्षरतेचे ऑनलाईन प्रशिक्षण सुरू झाले आहे. लाईव्ह प्रशिक्षणाचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असून, यामध्ये 500 शिक्षकांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती प्रशिक्षणाचे तज्ज्ञ मार्गदर्शक आणि गो. म. वेदक विद्यामंदिर, तळाचे शिक्षक विठ्ठल रेणूकर यांनी दिली. 

कोव्हिड -19 मुळे शाळा बंद असल्याने सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षण मुलांपर्यंत पोहोचवत असताना शिक्षकांना अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते. नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी त्यांना एका माध्यमाची गरज होती. म्हणून ऑनलाईन शिक्षणातील समस्या/अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आणि शिक्षक सक्षमीकरणासाठी; तसेच नवीन शैक्षणिक धोरण समोर ठेवून महाराष्ट्रातील पहिले गूगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन 10 दिवसीय प्रशिक्षण रायगड जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी सुरू केले आहे. रोज दोन तासांचे हे प्रशिक्षण आहे. गूगल मीटच्या माध्यमातून स्क्रीन शेअरिंग करून त्यांना इमेज, व्हिडीओ, पीपीटी शेअर करता येते. तसेच, त्यांना येणाऱ्या समस्या या व्हॉट्‌सअपच्या माध्यमातून सोडवल्या जात आहेत. यामध्ये त्यांना तांत्रिकदृष्ट्या मदत मिळते. याशिवाय, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रोज एक कार्यही दिले जाते. शिक्षकांच्या मूल्यमापनासाठी सर्वांत शेवटी ऑनलाईन परीक्षाही घेतली जाणार आहे. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे. मुंबई

हे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी डायट पनवेलचे प्राचार्या चंद्रकला ठोके, अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ, अधिव्याख्याता राजेंद्र लठ्ठे, प्रशिक्षणाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक विठ्ठल रेणूकर हे कार्यरत आहेत. त्यांच्या उपक्रमाबद्दल तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत रोडे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे, सचिव मंगेशशेठ देशमुख, शाळा समिती अध्यक्ष महेंद्र कजबजे, मुख्याध्यापक बाळासाहेब धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, राज्यातील विविध भागांतील शिक्षकांची प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी विचारणा होत आहे. 

असा आहे अभ्यासक्रम 
या 10 दिवसीय प्रशिक्षणामध्ये शिक्षकांना हार्डवेअर सॉफ्टवेअरची ओळख, इंटरनेट व त्याचे काम, झूम-गूगल मीट वापराची माहिती, ऑनलाईन परीक्षा घेणे, यू-ट्युबवर शैक्षणिक व्हिडीओ बनवणे, डेटा सायन्स मशीन शिकणे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स इंटरनेट ऑफ थिंग्स सायबर सिक्‍युरिटी अशा नवीन तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात येणार आहे. तसेच, वर्ड, एक्‍सेल, पॉवर पॉईंट याचा शैक्षणिक वापरही शिकवला जाणार आहे. 

नवीन शैक्षणिक धोरण डोळ्यासमोर ठेवून जास्त शिक्षकांनी तंत्रस्नेही व्हावे. त्याचा वापर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन माध्यमातून शिक्षण पोहोचावे, या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबवत आहे. 
- चंद्रकला ठोके, प्राचार्य, डायट पनवेल 

गेल्या 10 वर्षांचा तंत्रज्ञानाचा अभ्यास व अनुभव असल्याने जास्त शिक्षकांना तंत्रस्नेही बनवून त्यांच्यामध्ये कौशल्य विकसित करण्याच्या हेतूने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हा हेतू साध्य होईल. 
- विठ्ठल रेणूकर, प्रशिक्षणाचे तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षक, 
गो. म. वेदक विद्यामंदिर, तळा 

ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी येतात. या अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला हे चांगले माध्यम उपलब्ध करून दिलेले आहे. या प्रशिक्षणा मधून शिकून विद्यार्थ्यांना झूम द्वारे क्‍लास घेऊन त्यांच्या टेस्ट घेणे सोपे वाटू लागले आहे. 
- लक्ष्मण वालगुडे, प्रशिक्षणार्थी शिक्षक 

(संपादन : उमा शिंदे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com