Video:पाकव्याप्त काश्मीर ही नेहरूंचीच चूक : अमित शहा

टीम ई-सकाळ
रविवार, 22 सप्टेंबर 2019

पाकिस्तान व्याप्त काश्मीर ही पंडीत जवाहरलाल नेहरू यांची चूक आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. कलम ३७० हटविण्यामागची भूमिका मांडण्यासाठी मुंबईत गोरेगावमध्ये आज, अमित शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

मुंबई : पाकिस्तान व्याप्त काश्मीर ही पंडीत जवाहरलाल नेहरू यांची चूक आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. कलम ३७० हटविण्यामागची भूमिका मांडण्यासाठी मुंबईत गोरेगावमध्ये आज, अमित शहा यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यात त्यांनी पाक व्याप्त काश्मीरच्या मुद्द्यासह, कलम ३७० हटविणे का गरजेचे होते आणि त्याचे परिणाम कसे सकारात्कम होत आहेत, याची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रमुख उपस्थित होते.

..म्हणून काश्मीरमध्ये तिरंग्याचा सन्मान वाढला : मुख्यमंत्री

शामाप्रसाद मुखर्जींनी दिले पहिले बलिदान
कलम ३७० संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी माहिती देण्यासाठी देशभरात जनजागृती सभांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यातील एक सभा मुंबईत गोरेगाव येथील नेक्सो संकुलात झाली. मुळात कलम ३७० हटविण्याचा प्रस्ताव राज्यसभेत आणि लोकसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला होता. अमित शहा म्हणाले, ‘आज, मी गर्वाने सांगतो की, काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांना कधीच अविभाज्य घटक सांगावे लागत नाही. पण, काश्मीरबाबत सांगावे लागत होते. हे सांगताना सगळ्यांनाच माहिती होते की, कलम ३७० हटविल्याशिवाय काश्मीर भारताचा अविभाज्य घटक होऊ शकत नाही. काश्मीरसाठी पहिले बलिदान शामाप्रसाद मुखर्जी यांनी दिले आहे. तेव्हापासून आम्ही काश्मीरसाठी संघर्ष करत होतो. मुळात नेहरूंच्या चुकीमुळे काश्मीरचा काही भाग पाकिस्तानकडे गेला. भारतीय सैन्य आगेकूच करत असताना नेहरूंनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रांत नेला. शस्त्रसंधी झाली आणि काश्मीरचा एक तुकडा पाकिस्तानकडे गेला.’

फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार : अमित शहा

काश्मीर विकासाच्या वाटेवर जाईल
कलम ३७० मुळे देशात दहशतवाद निर्माण झाला. आता काश्मीर दहशतवादसोडून विकासाच्या मार्गावर जाईल, असा दावा अमित शहा यांनी केला. ते म्हणाले, ‘कलम ३७० रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये एकही गोळी झाडली गेली नाही. पण, आजवर आमच्या ४० हजार जवानांचा गेलेला बळी आम्हाला वेदना देतो. देशाला एकसंघ करण्याचा आमचा प्रयत्न आहेत. त्यात काश्मीरला बाजूला ठेवणे शक्य नव्हते.’

केंद्रीय मंत्रीच म्हणतात, ‘वंदेमातरम म्हणा नाही तर देशाबाहेर व्हा’

अमित शहा काय म्हणाले?

  1. काश्मीरचे कलम ३७० हटवणे मुद्दा राजकीय नाही, तर देशभक्तीचा
  2. काश्मीरची सफरचंदे आता लवकरच मुंबईतही मिळू लागतील
  3. काश्मीरमध्येही दलित, ओबीस समाजाला आता आरक्षण
  4. काश्मीरमध्ये भ्रष्टाचार रोखण्याचा कोणताही कायदा नव्हता
  5. काश्मीरमध्ये आता भ्रष्टाचार विरोधी कायदा लागू; अनेकांना आता घाम फुटला
  6. आता काश्मीरमधील बालविवाहांनाही आळा बसणार आहे; मुलींना कायद्याचे संरक्षण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: home minister amit shah statement about article 370 in mumbai goregaon