esakal | ...हा तर विकसनशील सोलापूरवर अन्यायच!
sakal

बोलून बातमी शोधा

Mahavikas Aghadi

एकेकाळी सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या रूपाने याच जिल्ह्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपद भोगले आहे. आता मात्र एकही मंत्रिपद सोलापूर जिल्ह्याला मिळाले नसल्याची खंत वाटते. राष्ट्रवादीचे तीन, समर्थक अपक्ष एक, शिवसेनेचा एक, कॉंग्रेसचा एक सदस्य असतानाही महाविकास आघाडीने सोलापूरकडे दुर्लक्षच केले आहे, असे म्हणावे लागेल.

...हा तर विकसनशील सोलापूरवर अन्यायच!

sakal_logo
By
अभय दिवाणजी

सोलापूर : महाराष्ट्रात विकासाच्या दिशेने झेपावणाऱ्या सोलापूर जिल्ह्यावर महाविकास आघाडीने मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने मोठा अन्याय झाला आहे. विकासाच्या विविध योजनांच्या पूर्ततेसाठी स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची खरी गरज होती. भविष्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल कधी आणि सोलापूरचा विचार होईल कधी, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : आदर्शवत...! लग्नाच्या वाढदिवसाच्या रकमेतून उभारला संसार

...तरच मोठे काम उभारणे सहजशक्‍य
जात-धर्म, प्रादेशिक समतोल राखताना आणि वेगवेगळी समीकरणे जुळवताना महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षांनी सोलापूर जिल्ह्याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले आहे. सोलापूरमध्ये सतत पाठपुरावा करूनही मार्गी न लागलेल्या बोरामणी विमानतळाचा प्रश्‍न, होटगी रस्त्यावरील विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणात अडथळा ठरलेल्या चिमणीचा प्रश्‍न, महामार्गांची कामे सुरू आहेतच, परंतु त्यातील काही मार्गांवरील अडथळे, केंद्राच्या स्मार्ट सिटीच्या पहिल्या यादीत सोलापूरचा क्रमांक लागूनही अजूनही विकासकामांनी म्हणावी तशी गती घेतलेली नाही. नमामी चंद्रभागा (प्रदूषणविरहित भीमा नदी) योजना, डाळिंब, बोर, ज्वारी, द्राक्ष, ऊस अशा वेगवेगळ्या उत्पादनांत आघाडी मिळवूनही शेतकऱ्यांचे प्रश्‍न, साखर कारखान्यांसमोरील प्रश्‍न, शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्‍न, बाह्यवळण रस्ता, आरोग्यसेवा अशी रखडलेल्या विकासकामांची यादीच तयार होईल. यासाठी सत्ताधारी आमदार प्रयत्न करतील, परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळाले तर त्यावर मोठे काम उभे करणे सहजशक्‍य असते.

हेही वाचा : मंत्रिमंडळ विस्तारानंतर "या' जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी

महाविकास आघाडीचे सोलापूरकडे दुर्लक्षच
एकेकाळी सुशीलकुमार शिंदे व विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या रूपाने याच जिल्ह्याने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपद भोगले आहे. आता मात्र एकही मंत्रिपद सोलापूर जिल्ह्याला मिळाले नसल्याची खंत वाटते. राष्ट्रवादीचे तीन, समर्थक अपक्ष एक, शिवसेनेचा एक, कॉंग्रेसचा एक सदस्य असतानाही महाविकास आघाडीने सोलापूरकडे दुर्लक्षच केले आहे, असे म्हणावे लागेल. इतिहासात एकवेळचा अपवाद वगळता कायमच सत्तेत मंत्रिपदावर सोलापूरचे नाव कोरलेले होते. युतीच्या मंत्रिमंडळात सुभाष देशमुख व विजयकुमार देशमुख यांच्या रूपाने दोन मंत्रिपदे होती. सोलापूर जिल्ह्यात छाप पाडण्यासारखे काम झाले नसले तरी आपापल्या मतदारसंघात केलेल्या विकासकामांनी मात्र या दोघांनी आपली प्रतिमा उंचावली होती, हे निश्‍चित!

हेही वाचा : सोलापुरातील कार्यकर्ते मुंबईत पोचले, पण...

कारणे गुलदस्त्यातच!
राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालके, बबनदादा शिंदे, संजय शिंदे यांची तर कॉंग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांचे नाव चर्चेत होते. परांडा (जि. उस्मानाबाद) येथून निवडून आलेले शिवसेनेचे आमदार प्रा. तानाजी सावंत (सोलापूरकर) यांची तरी वर्णी लागेल असे वाटले होते; परंतु सत्तासुंदरीने त्यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ घातलेली दिसत नाही. सोलापूर जिल्ह्याला या मंत्रिमंडळातून का वगळले गेले, याची कारणे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. गेल्यावेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे संख्याबळ घटलेले असतानाही, जिल्ह्यात पक्षसंघटना बळकट होण्यासाठी मंत्रिपदाची गरज असतानाही पक्षश्रेष्ठींनी मात्र सोलापूरकडे वक्रदृष्टीच केल्याचे जाणवते.

loading image