काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसंदर्भात शरद पवारांनी मोठी घोषणा; मनसे कुठंय?

टीम ई-सकाळ
Monday, 16 September 2019

आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसह शेतकरी कामगार पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पक्षाचा समावेश आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे, आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेण्यात आलेले नाही.

नाशिक : उदयनराजे भोसले यांनी सातारच्या जाहीर सभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर नाव न घेता टीका केली. त्याला आज, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. उदयनराजे भोसले यांना १५ वर्षे हे आरोप का सुचले नाहीत? अशा शब्दांत पवार यांनी उदयनराजेंवर निशाणा साधला आहे. आघाडीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीसह शेतकरी कामगार पक्ष, राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पक्षाचा समावेश आहे. सर्वांत धक्कादायक म्हणजे, आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेण्यात आलेले नाही. आघाडी संदर्भात राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली असून, निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची त्यांची भूमिका आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

युती लटकली; आघाडीचं ठरलं, लढवणार समान जागा!

दोन्ही पक्षांना समान जागा
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये प्रत्येकी 125 जागा लढवण्यावर एकमत झाले आहे. याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील घोषणा केली असून,  उर्वरित 38 जागा मित्रपक्षांना देण्यात येणार आहेत. नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांनी मतदारसंघ निहाय नेत्यांच्या बैठका घेतल्या. त्यानंतर पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन, संवाद साधला. त्यात पवार म्हणाले, ‘काँग्रेस-राष्ट्रवादी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. संयुक्त प्रचार मोहीम राबवण्याचा आमचा विचार आहे. पंतप्रधान यांची नाशिकमधील सभा झाल्यानंतर निवडणूक जाहीर होईल, अशी अपेक्षा आहे. दिवाळीच्या अगोदर आठवडाभर मतदान होईल असा अंदाज आहे.’

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर सोडल्या कडकनाथ कोंबड्या (व्हिडिओ)

मेगा भरतीचं लोकांना समाधान नाही
सध्या भाजप आणि शिवसेना पक्षात मेगा भरती सुरू आहे. त्यावर पवार म्हणाले, ‘असा मेगाभरती प्रकार 1957 आणि 1962 मध्येही झाला होता. मात्र, सध्याचा वेग आणि प्रमाण जास्त आहे. माझ्या अनेक सहकाऱ्यांना ईडीच्या नोटीस दाखवून धमकी देण्यात आली. मी त्यांची नावं जाहीर करणार नाही. राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांनीच मला सांगितलं. या मेगाभरतीचं लोकांना काही समाधान नाही. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणाऱ्यांबाबत राष्ट्रवादीत येणाऱ्यांबाबत समिती निर्णय घेणार आहे.’

‘जयंत पाटीलांना अमोल कोल्हेंचा आधार’; इस्लामपुरात मुख्यमंत्र्यांचा टोला

मुख्यमंत्री माहिती घेऊन बोला
उदयनराजे भोसले यांच्या आरोपांवर काही बोलणार नाही. पण, 15 वर्षांनंतर त्यांना हे आरोप का सुचले?, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला आहे. पाकिस्तान विषयीच्या वक्तव्यावर पवार म्हणाले, ‘मी पाकिस्तान बद्दल काहीही बोललो नाही. मित्रांशी बोलताना मी माझा अनुभव सांगितला होता. क्रिकेट टीम गेली होती तेव्हाचा तो अनुभव होता. मुख्यमंत्र्यांनी नीट माहिती घेऊन बोलले पाहिजे.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vidhan Sabha 2019 congress ncp announcement coalition sharad pawar press conference nashik