esakal | पुन्हा लॉकडाउनमुळे गळाले विडी उद्योगाचे अवसान; काय म्हणतात उद्योजक व कामगार? वाचा 
sakal

बोलून बातमी शोधा

Bidi Industry

विडी उद्योग बंद असल्याने गरीब कामगारांचे बेरोजगारीमुळे अतोनात हाल झाले. कारखानदार व कामगारही प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत आहेत. मात्र काही नियम तोडणाऱ्यांमुळे सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याची शिक्षा या कष्टकऱ्यांना मिळू नये. त्यांना काम न देणे योग्य वाटत नाही. त्यासाठी विडी कामगारांना लॉकडाउनमध्ये सूट द्यायला हवी. त्यासाठी आणखी काही नियम घाला चालेल पण कामगार उपाशी राहणार नाही, यासाठी उपाययोजना करायला हव्यात. 
- नितीन देसाई, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, देसाई ब्रदर्स, पुणे 

पुन्हा लॉकडाउनमुळे गळाले विडी उद्योगाचे अवसान; काय म्हणतात उद्योजक व कामगार? वाचा 

sakal_logo
By
श्रीनिवास दुध्याल

सोलापूर : अडीच महिने लॉकडाउनमुळे रोजीरोटी गमावलेल्या विडी उद्योगातील कामगारांची मोठी उपासमार झाली. अचानक आलेल्या बेरोजगारीच्या संकटामुळे व इतर पर्यायी रोजगार नसल्याने अनेक सामाजिक संस्थांची मदत मिळवण्यासाठी गल्लीबोळात या कामगारांची गर्दी दिसून येत होती. "कोरोनापेक्षा भुकेने मरण्याची तसेच स्वाभिमानाने जगणाऱ्या आमच्यावर या लॉकडाउनमुळे भीक मागण्याची वेळ आली आहे. आम्ही काही नाही मागत विडी कारखाने सुरू करून आमचा रोजगार द्या व स्वाभिमानाने जगू द्या' अशी आर्त मागणी विडी कामगार करत होते. शेवटी 15 जूनपासून महापालिका आयुक्तांनी अनेक नियम व अटी घालून विडी उद्योग सुरू करण्यास परवानगी दिल्याने कामगारांवरील बेरोजगारीचे संकट टळले होते. 

हेही वाचा : धक्कादायक : कोरोनाची भीती नाही, देवी कोपणार म्हणून होतेय "या' परिसरात गर्दी! 

मात्र प्रशासनाचे नियम मोडून विनाकारण फिरणाऱ्या लोकांमुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. जे प्रशासनाच्या नियमांचे पालन करत नाहीत त्यांना कोरोना प्रादुर्भावास कारणीभूत ठरवून त्यांच्यावर अंकुश ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र प्रशासनाने घालून दिलेल्या प्रत्येक नियमाचे काटेकोर पालन केल्याने आज शहरातील 60 हजार कामगार काम करत असलेल्या विडी उद्योगात एकही कोरोनाची एका महिन्यात एकही केस नाही. असे असताना कोरोनाच्या प्रादुर्भावास कारणीभूत लोकांसाठी 16 ते 26 जुलै असे 10 दिवसांचे लॉकडाउन लागू करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयामुळे कष्टकरी विडी कामगारांचे अवसान पुन्हा गळाले आहे. 

हेही वाचा : सोलापुरातील कोरोनाचा तावरेंनी रचला पाया, शिवशंकर चढवू लागले कळस 

विडी उद्योग सुरू करण्यासाठी कामगार संघटनांनी आंदोलनेही केली होती. परिणामी महापालिका आयुक्तांनी विडी कारखानदारांना अनेक नियम व अटी घालून उद्योग सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार कारखान्यात सॅनिटायझर, मास्क, हॅंडग्लोव्ह्‌ज, ऑक्‍सिमीटर, थर्मल स्कॅनर आदी सुरक्षा साधनांनी कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. कामगारांच्या आरोग्यासाठी होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप कारखानदारांमार्फत करण्यात आले. तसेच आजारी कामगारांसाठी ब्रॅंचजवळील डॉक्‍टरांकडून औषधोपचारही केले जात आहेत. एवढ्या उपाययोजना करून आता कुठे विडी उद्योग रुळावर येत आहे, तोच प्रशासनाच्या आदेशाचा धसका कामगारांना बसला आहे. 

लॉकडाउनमध्ये कामगारांना कामे मिळायला हवीत 
विडी उद्योग बंद असल्याने गरीब कामगारांचे बेरोजगारीमुळे अतोनात हाल झाले. कारखानदार व कामगारही प्रशासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करत आहेत. मात्र काही नियम तोडणाऱ्यांमुळे सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याची शिक्षा या कष्टकऱ्यांना मिळू नये. त्यांना काम न देणे योग्य वाटत नाही. त्यासाठी विडी कामगारांना लॉकडाउनमध्ये सूट द्यायला हवी. त्यासाठी आणखी काही नियम घाला चालेल पण कामगार उपाशी राहणार नाही, यासाठी उपाययोजना करायला हव्यात. 
- नितीन देसाई, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, देसाई ब्रदर्स, पुणे 

गरीब कामगारांचा प्रशासनाने विचार करावा 
कोरोनामुळे नव्हे तर बेरोजगारीमुळे उपासमारीने मरण्याची भीती वाटत आहे. अडीच महिन्यांनंतर आता कुठे विडी कारखाने सुरू झाले, रोजगार पुन्हा मिळत आहे, तर पुन्हा दहा दिवसांच्या लॉकडाउनमुळे आमचे खूप मोठे नुकसान होणार आहे. आम्हाला फक्त तयार विड्या कारखान्यात देण्यासाठी व कच्चा माल घेण्यासाठी दिवसातून एकदाच घराबाहेर पडण्याची परवानगी द्यावी. बाकी आमचे काम घरी बसूनच चालते. आमच्या मागण्यांबाबत प्रशासनाने विचार करावा. 
- सावित्रा गुंडला, विडी कामगार 

प्रशासन लॉकडाउनच्या निर्णयावर ठाम 
दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी विडी उद्योग संघाला बैठकीस बोलावून लॉकडाउनसंदर्भात माहिती दिली. सोलापुरातील कोरानाचा वाढता प्रादुर्भाव व वाढत्या मृत्युदराची माहिती देऊन लॉकडाउन किती गरजेचे आहे, हे स्पष्ट केले. तसेच कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विडी उद्योग लॉकडाउनच्या काळात बंद ठेवून प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलिस उपायुक्त बापू बांगर व विडी उद्योग संघाचे पदाधिकारी व उद्योजक उपस्थित होते.