esakal | बारावीच्या परीक्षेबाबत उत्सुकता; वेळापत्रक कधी येणार?

बोलून बातमी शोधा

timetable

बारावीच्या परीक्षेबाबत उत्सुकता; वेळापत्रक कधी येणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल-मेमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. बारावीची परीक्षा मे अखेरीस होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता एप्रिल संपत आला, तरीही बारावीच्या परीक्षेबाबत अनिश्चितता कायम आहे. परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक गोंधळात पडले आहेत.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने हा संभ्रम वाढत आहे. यापूर्वी २३ एप्रिल ते २१ मे २०२१ दरम्यान ही परीक्षा घेण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र, राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने बारावीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आता ही परीक्षा मे अखेरीस होईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २० एप्रिल रोजी जाहीर केले होते. बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेसाठी यंदा जवळपास १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

बारावीनंतरच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बारावीचे गुण आणि प्रवेश परीक्षेचे गुण दोन्ही महत्त्वाचे असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा ही होणे गरजेचे आहे, अशी मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकार असो वा बोर्ड यांनी बारावीची परीक्षा होणार की नाही, होणार असेल तर ती कशा पद्धतीने होणार, कधी होणार, याबाबत कोणतीही माहिती अद्याप दिलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली जात असतानाही, कोणतेही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: नागपुरात कोरोनाग्रस्तांची संख्या तब्बल ४ लाख पार; आज नव्या ७,४९६ रुग्णांची भर

लवकरच निर्णय जाहीर

बारावीच्या परीक्षेबाबत शालेय शिक्षण विभाग, राज्य शिक्षण मंडळ यांच्यात वारंवार बैठका होत आहेत. राज्य शिक्षण मंडळामार्फत परीक्षेचे नियोजन करण्यात येते, परीक्षा घेतली जाते, निकाल लावले जातात. परंतु, परीक्षा घ्यायची की नाही, हा निर्णय मात्र राज्य सरकार घेईल. त्यामुळे बारावीच्या परीक्षेबाबतचा निर्णय देखील राज्य सरकारमार्फत जाहीर करण्यात येईल. राज्य सरकारमार्फत आलेल्या आदेशाचे पालन मंडळाच्यावतीने करण्यात येईल, असे अधिकृत सूत्रांनी नाव न घेण्याच्या अटीवरून सांगितले.