महत्त्वाची बातमी: सरळसेवा भरतीचा मार्ग मोकळा; कंपन्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

ब्रिजमोहन पाटील
Friday, 22 January 2021

राज्यभरात सुमारे २७ हजार ५०० सरळसेवेची पदे रिक्त असून, त्यासाठी सुमारे ३२ लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत.

पुणे : गेल्या जवळपास अडीच वर्षांपासून खोळंबलेल्या गट क, गट ड वर्गातील रिक्त पदांची सरळसेवा भरती करण्याचा मार्ग अखेर मोकळा करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने चार कंपन्यांना ‘ओएमआर’ पद्धतीने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी निवड केली आहे. आता अर्ज भरलेल्या उमेदवारांची परीक्षा कधी होते याची प्रतीक्षा आहे.

राज्यात भाजपचे सरकार असताना महापरीक्षा पोर्टलर्फे राज्यात सरळसेवा भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने ही भरती प्रक्रिया वादात सापडली होती. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने सरळसेवा भरतीसाठी महापरीक्षा पोर्टल रद्द करून नव्या कंपन्या नियुक्त करण्याची प्रक्रिया राबविण्यास सुरवात केली. ही निविदा प्रक्रिया राबविताना २५ पेक्षा जास्त वेळा मुदतवाढ देण्यात आली.

Breaking: शिवजयंतीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली महत्वाची घोषणा​

महाआयटी विभागाने डिसेंबर महिन्यात १८ कंपन्यांपैकी चार कंपन्या अंतिम करून याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला सादर केला होता. मात्र, यातील काही कंपन्यांचा कारभार योग्य नसल्याने त्यांना यापूर्वी काळ्या यादीत टाकले होते, त्याच कंपन्यांना पुन्हा काम देऊ नका असा आरोप करण्यात आला होता. तसेच ही भरती ‘एमपीएससी’कडूनच करावी अशी मागणी केली जात होती. अखेर राज्य शासनाने गुरुवारी चार कंपन्या फायनल करून त्याबाबत आदेश काढला आहे.

पुण्यात चाललंय काय? ट्रीपल सीट गाडी अडवली म्हणून पोलिसालाच केली मारहाण​

राज्यभरात सुमारे २७ हजार ५०० सरळसेवेची पदे रिक्त असून, त्यासाठी सुमारे ३२ लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. ही पदे भरण्यासाठी मेसर्स ॲपटेक लिमिटेड, मेसर्स जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि., मेसर्स जींजर वेब्ज प्रा. लि., मेसर्स मेटा-आय टेक्नॉलॉजी प्रा. लि. या चार कंपन्यांना परिक्षेचे काम देण्यात आले आहेत. संबंधित विभागातर्फे परीक्षेचे आयोजन केल्यानंतर ओएमआर पद्धतीने या परीक्षा या संस्थांच्या माध्यमातून घेतल्या जाणार आहेत.

सिंहगड रोडवर मिळत होता फॉरेनचा गांजा; एकाला अटक​

‘सरळसेवा भरतीची परीक्षा घेण्यासाठी कंपन्यांची निवड लवकर करावी, अर्ज भरलेल्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळावा यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू होता. अखेर शासनाने हा निर्णय घेतल्याने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित विभागांनी लवकर वेळापत्रक जाहीर करावे.'
- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, मनविसे

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 4 companies finalized for direct service recruitment declared General Administration Department