जाणून घ्या, वाहनांचा टोल दर! रस्त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष, फक्त टोल वसुलीकडे लक्ष; ‘फास्टॅग’नंतरही टोलवर वाहनांच्या रांगा

सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सहा टोल नाके आहेत. दररोज सरासरी चार लाख वाहने ये-जा करतात. किमान २० ते ३० वर्षांची मुदत टोल नाक्यांची असते आणि त्यातून हजारो कोटी रुपये वसूल करूनही वाहनचालकांचा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे.
sakal exclusive
sakal exclusiveSAKAL

सोलापूर : सोलापूर- विजयपूर, सोलापूर- पुणे व नागपूर- रत्नागिरी या महामार्गांवर सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सहा टोल नाके आहेत. त्याठिकाणाहून दररोज सरासरी चार लाख वाहने ये-जा करतात आणि त्यातून अंदाजे सहा कोटी रुपये वसूल होतात. किमान २० ते ३० वर्षांची मुदत टोल नाक्यांची असते आणि त्यातून हजारो कोटी रुपये वसूल करूनही वाहनचालकांचा खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतोय ही वस्तुस्थिती आहे.

महामार्गांचे जाळे विस्तारले, वाहनांचा वेग वाढला, परंतु विनाअडथळा प्रवास करणे अशक्यच आहे. मोकाट जनावरांचा अडथळा, टोलवर अजूनही वाहनांच्या रांगा, मोठमोठे खड्डे, दबलेली एक लेन, दुभाजक तोडून ये-जा करणारी वाहने, अशी स्थिती आहे. महामार्गांवरील सर्व्हिस रोडची अवस्था खूपच चिंताजनक आहे. टोलचे दर प्रत्येक वर्षी वाढत असतानाही वाहनचालकांना दर्जेदार सुविधा मिळत नाहीत.

अपघातानंतर मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर कॉल करण्याची सुविधा नाही, स्वच्छतागृहे बंद आहेत. अनेक ठिकाणी अपघात होतात, तरीदेखील त्याठिकाणी सुविधा केल्या जात नाहीत. दुसरीकडे ‘टोलमुक्त महाराष्ट्र’च्या घोषणेनंतरही अंमलबजावणी होत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यात ‘टोलमुक्त महाराष्ट्र’साठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली असून टोलचे दर कमी करण्याचीही त्यांची प्रमुख मागणी आहे. दोन-तीन दिवसांत राज्य सरकारच्या अखत्यारित असलेल्या टोलसंदर्भात सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे. मात्र, केंद्र सरकारच्या वतीने उभारण्यात आलेल्या महामार्गांवरील टोलमाफी होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्यात चांगले रस्ते

टोल वसूल करणाऱ्या कंपनीने वाहनचालकांना दर्जेदार सुविधा देणे अपेक्षित असून तशा सूचना वारंवार त्यांना दिलेल्या असतात. सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत सहा टोल नाके असून त्याठिकाणी रस्ते चांगले आहेत.

- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण

टोलचे वाहननिहाय दर

  • वाहन सिंगल रिटर्न

  • कार ७० ११०

  • टेम्पो ११५ १७५

  • ट्रक २४५ ३७०

  • मल्टी ३८५ ५७५

  • बस २४५ ३७०

‘वसुली’ला वैतागला वाहनचालक

वेगवेगळ्या महामार्गांवर काही ठरावीक अंतरावर टोल नाके उभारले आहेत. ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या ‘बीओटी’ तत्त्वावर वाहनचालकांकडून वसुली केली जाते. महागाई निर्देशांकानुसार दरवर्षी १ एप्रिलपासून टोलचे दर पाच ते दहा रुपयांच्या पटीत वाढतात. दुसरीकडे इंधनाचेही दर वाढलेलेच आहेत. तत्पूर्वी, आरटीओ टॅक्स, महामार्ग, स्थानिकचे वाहतूक पोलिस व पुन्हा आरटीओ अधिकाऱ्यांकडूनही कारवाई सुरुच असते. या सर्व पार्श्वभूमीवर प्रत्येक वाहनचालकाला एका ठिकाणाहून निघाल्यानंतर त्याठिकाणी पोचेपर्यंत किमान तीन ते पाच हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होतोय, अशीही उदाहरणे आहेत. तरीदेखील रस्ते दर्जेदार नाहीत, हे विशेष.

सोलापूर-पुणे महामार्गावरील सद्य:स्थिती

  • - सर्व्हिस रोडची दुरवस्था; वाहनचालकांकडून वापर होतच नाही

  • - पाकणी, सावळेश्वर यासह अनेक ठिकाणी दुभाजक तोडून दुचाकीस्वारांची ये-जा

  • - बाळे, कोंडी, यावली, चिखली, वडाचीवाडी या ठिकाणी रस्ता दबलेला अन्‌ खड्डेही

  • - प्रत्येक टोलवर महामार्ग पोलिसांची वसुली; रस्त्यात बंद पडलेल्या वाहनांकडे मात्र दुर्लक्ष

‘फास्टॅग’नंतरही टोलवर वाहनांच्या रांगा

वाहनचालकांचा वेळ वाया जाऊ नये, त्यांना विनाअडथळा ये-जा करता यावे म्हणून केंद्र सरकारच्या पुढाकारातून ‘फास्टॅग’द्वारे ऑनलाइन टोल भरला जात आहे. इंधन बचत हाही त्यामागील हेतू आहे. मात्र, अजूनही टोल नाक्यांवरील अपुरे मनुष्यबळ, फास्टॅग रिड करतानाचा तांत्रिक अडथळा, यामुळे टोल नाक्यांवर वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात ही वस्तुस्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com