नवीन ऑर्केस्ट्राबारला परवानगी नाहीच! ग्रामीण पोलिसांनी नवीन प्रस्ताव नाकारले अन्‌ तीन बारचे नूतनीकरण थांबविले

ऑर्केस्ट्रा बारसाठी पोलिसांकडून परवानगी मिळवायची आणि त्याच्या नावाखाली डान्सबार किंवा अन्य अवैध प्रकार सुरू करायचे, हा पायंडा हेरून पोलिसांनी आता नवीन ऑर्केस्ट्रा बारला परवानगी देणे बंद केले आहे.
 ऑर्केस्ट्रा बार प्रकरण
ऑर्केस्ट्रा बार प्रकरणSakal

सोलापूर : ऑर्केस्ट्रा बारसाठी पोलिसांकडून परवानगी मिळवायची आणि त्याच्या नावाखाली डान्सबार किंवा अन्य अवैध प्रकार सुरू करायचे, हा पायंडा हेरून पोलिसांनी आता नवीन ऑर्केस्ट्रा बारला परवानगी देणे बंद केले आहे. ग्रामीणमधील नव्या एका बारला परवानगी नाकारली असून तीन बारचे नूतनीकरण होऊ नये, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला असून दोन बारच्या नूतनीकरणापूर्वी माहिती मागविली आहे.

शहरात सध्या सहा तर ग्रामीणमध्ये आठ ऑर्केस्ट्रा बार सुरू आहेत. त्यांना प्रत्येक वर्षी नूतनीकरण करून घेणे बंधनकारक आहे. त्यांची वेळ रात्री साडेबारापर्यंतच आहे. ऑर्केस्ट्रा बारमध्ये केवळ गाणीच लावावीत, असा नियम आहे. पण, पहाटे दीड-दोन वाजेपर्यंत काही बार सुरू ठेवले जातात. पोलिसांकडून त्यावर वॉच ठेवून वेळोवेळी कारवाई देखील केली जाते. सोलापूर शहर पोलिसांनी दोन परवाने निलंबित सुद्धा केले आहेत.

आणखी दोन बार बंद झाले आहेत. नूतनीकरणावेळी संबंधित तालुक्याच्या पोलिसांकडून वार्षिक अहवाल मागवून घेतला जातो. त्यानंतर त्या बारला नूतनीकरणाची परवानगी मिळते. अनेकदा गाणे लावून काहीजण तेथील नृत्यांगणांशी लगट करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच भांडण, हाणामारी देखील होते. तसेच काही ठिकाणी अश्लील नृत्य देखील चालते. त्यामुळे पोलिसांचे काम वाढते. त्यामुळे आता यापुढे नवीन ऑर्केस्ट्रा बारला परवानगी द्यायचीच नाही, अशी कठोर भूमिका पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने व पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घेतली आहे.

‘सकाळ’ने सातत्याने मांडली ठोस भूमिका

शहर- जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली त्याठिकाणी अवैध प्रकार सुरू असल्यावर ‘सकाळ’ने सातत्याने रोखठोक भूमिका मांडली होती. अनेक तरुणांचे जीवन त्यातून बरबाद झाल्याची वस्तुस्थिती देखील मांडली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बार चालकांना नियमांचे पालन तंतोतंत करा, अन्यथा परवाना निलंबित करण्याचा इशारा देखील दिला आहे.

नवीन प्रस्तावाला आता परवानगी नाही

सोलापूर शहरातील ऑर्केस्ट्रा बार चालकांना सक्त ताकीद दिली असून, कोणीही नियमांचे उल्लंघन करू नये, अशा सूचनाही केल्या आहेत. आता यापुढे नवीन डान्स बार किंवा ऑकेस्ट्राबारला परवानगी दिली जाणार नाही, अशी आमची भूमिका आहे.

- डॉ. राजेंद्र माने, पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

...अन्यथा परवाना होईल निलंबित

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आता नवीन ऑर्केस्ट्रा बारसाठी परवानगी दिली जात नाही. नवीन बारसाठी एक प्रस्ताव सोलापूर ग्रामीण पोलिसांकडे आला होता, पण त्यास परवानगी दिलेली नाही. सध्या सुरु असलेल्या बार चालकांना नियमांचे काटेकोर पालन करा, अन्यथा परवाने निलंबीत होतील, अशा सक्त सूचना केल्या आहेत.

- शिरीष सरदेशपांडे, पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

नूतनीकरणाचे तीन प्रस्ताव थांबवले तर नवीनला नकार

शहर- जिल्ह्यात सध्या जवळपास १४ ऑर्केस्ट्रा बार सुरु आहेत. त्यांच्याकडून नियमांचे तंतोतंत पालन होते की नाही, याची वारंवार पडताळणी केली जात आहे. दरम्यान, आता सांगोला शहरात एक, सोलापूर तालुका पोलिस ठाण्याअंतर्गत कोंडी (ता. उत्तर सोलापूर) व मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) येथे प्रत्येकी एक नवीन ऑर्केस्ट्रा बारच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांनी थांबविला आहे. तर एका नवीन बारचा परवाना पोलिसांनी नाकारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com