जागतिक कर्करोग दिन : आत्मविश्‍वासाने लढा, लढणारे हरत नसतात!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 February 2020

ज्यांना ज्यांना कर्करोग झालाय, त्यांनी एक मनात ठेवायचे, की हा आजार पाहुणा म्हणून आला आहे.  त्याचा चांगला पाहुणचार करा. त्याला केमोथेरपीच्या बाटल्या द्या. त्याचा कोटा पूर्ण झाला की त्याला ‘गेटआउट’ करा... अत्यंत सकारात्मक राहा. छान पुस्तके वाचा नि निरोगी राहा! सतत सकारात्मक राहा.
- शरद पोंक्षे, प्रसिद्ध अभिनेते

प्रत्येक महिलेने महिन्यातून एकदा तरी स्वतःची तपासणी केली पाहिजे. अशा प्रकारचे आजार लवकर लक्षात येण्यासाठी वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून एकदा मॅमोग्राफी करावी. विशेष म्हणजे सकारात्मक विचार सतत मनात ठेवला पाहिजे. मग तुम्ही नक्कीच या आजारावर मात कराल, ही खात्री आहे.
- मंगल केंकरे, ज्येष्ठ अभिनेत्री

मुंबई - कर्करोग झाल्याचे कळताच अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते. आपले आता काय होणार, या भयानेच ते खचून जातात. मात्र, जे या रोगाशी लढाई करून सहीसलामत बाहेर पडले, त्यांनी ‘कर्करोगाला घाबरू नका, आत्मविश्‍वासने लढा, लढणारे हरत नसतात,’ असा सल्ला जागतिक कर्करोग दिनानिमित्त दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

व्यक्ती कुणीही असो, ज्याला पहिल्यांदा कर्करोग झाल्याचे कळते, त्याच्यासाठी तो एक धक्काच असतो. यातून सावरत ज्यांनी कर्करोगाशी लढाई करून आपले आयुष्य पूर्ववत जगायला सुरुवात केली, त्यात माजी क्रिकेटपटू युवराजसिंग, ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार, ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर, प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि मनीषा कोईराला यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रांतील अनेक मान्यवरांचा समावेश आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाले आणि त्यातून सावरलेल्यांमध्ये प्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे आणि ज्येष्ठ अभिनेत्री मंगल केंकरे यांचाही समावेश आहे.

...म्हणून विधानपरिषद निवडणूक लढविणार : उद्धव ठाकरे

शरद पोंक्षे यांनी कर्करोगाशी लढत असतानाच नवे नाटक करायचे ठरवले आणि तेवढ्याच आत्मविश्‍वासाने ते आता ‘हिमालयाची सावली’ नाटकात भूमिका साकारत आहेत. मंगल केंकरे यांची केमोथेरपी सुरू असताना ‘मुंबई-पुणे-मुंबई ३’ या चित्रपटाचे चित्रीकरण होणार होते. मात्र, दिग्दर्शक सतीश राजवाडे त्यांच्यासाठी सात-आठ महिने थांबले होते. ही उदाहरणे कर्करोगाशी लढताना प्रचंड आत्मविश्‍वास असणाऱ्यांची आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: advice sharad ponkshe and mangal kenkare on cancer