राज्यातील प्रवासी वाहतूकदार संघटनांचे गुरुवारपासूनचे आंदोलन स्थगित  

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

गुरुवारपासूनचे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे बस आेनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजन जुनवणे,  पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनचे बाळासाहेब खेडेकर यांनी दिली.  

पुणे -  प्रवासी वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सचा अहवाल दहा दिवसांत येणार आहे. त्यातून निश्चितच मार्ग काढू, असे आश्वासन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी दिल्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतूक संघटनांकडून गुरुवारपासून (ता. 25) करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. 

आमदार पडळकरांच्या वक्तव्याबद्दल फडणवीस म्हणाले; जेष्ठ नेत्यांबद्दल बोलणे योग्य नाही

प्रवासी वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी आणि बस, कार ऑपरेटर्स कॉन्फड्रेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्ध तसेच हर्ष कोटक, मोहन गोयल यांनी मुंबईत शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. त्यावेळी प्रवासी वाहतूकदारांच्या समस्यांची माहिती पवार यांना दिली. त्यावेळी पवार यांनी टास्क फोर्सचा अहवाल दहा दिवसांत येणार असून त्यातून निश्चितच मार्ग काढू, असे आश्वासन दिले. या बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही चर्चा करणार असल्याचे पवार यांनी  सांगितले. तसेच अजित पवार, परब यांनी सहकार्य करून प्रवासी वाहतूकदारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यामुळे गुरुवारपासूनचे आंदोलन स्थगित करण्यात येत आहे, अशी माहिती पुणे बस आेनर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष राजन जुनवणे, पुणे डिस्ट्रिक्ट लक्झरी बस असोसिएशनचे बाळासाहेब खेडेकर यांनी दिली. 

बारामतीतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक, जाळले पडळकरांचे पोस्टर 

प्रवासी वाहतूक करणाऱया वाहनांचा एक वर्षांचा कर रद्द करा, कर्जाच्या थकीत हप्त्यांवरील व्याज रद्द करा, थर्ड पार्टी विम्याचे दोन -तीन महिने वाढवा, विद्यार्थी वाहतूक करणाऱया बसचे आयुर्मान 20 वर्षे करा, एसटी महामंडळाचे काही मार्ग पीपीपी (खासगी-सार्वजनिक भागीत) तत्त्वावर चालवावेत, मॅक्सी कॅबला परवानगी द्यावी आदी प्रवासी वाहतूक करणाऱया व्यावसायिकांच्या मागण्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्यांनी गुरुवारपासून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: agitation of passenger transporters associations in the state has been suspended