ये दिवार तुटती क्यू नही..? असं विचारण्याची वेळ विरोधकांवर येणार : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

'ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी क्यु नही..?असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडेल. अशा शब्दात महाविकास आघाडी सरकार  पाडणार असे कायम भाकित करणार्‍या भाजपाला  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.

मुंबई : 'ये महाविकास आघाडी की दिवार तुटेगी क्यु नही..?असा प्रश्न भारतीय जनता पक्षाला पडेल.  अशा शब्दात महाविकास आघाडी सरकार  पाडणार असे कायम भाकित करणार्‍या भाजपाला  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबई विभागीय राष्ट्रवादी कार्यकर्ता मार्गदर्शन एक दिवसाच्या शिबिराचे  आज सोमय्या मैदानात आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून अजित पवार बोलत होते. मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी या शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मुंबई ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. याला धक्का लावण्याचे काम भाजपाने पाच वर्षात केले. मुंबईत येणारे  प्रकल्प राज्याबाहेर नेले. विकासाला खीळ घातली. हे लोकांना पटवून दिले पाहिजे आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या आड येणाऱ्या लोकांना आडवं पाडून पुढे जायचं आहे असा संदेश देत मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग अजित पवार यांनी यावेळी फुंकले.

बाळासाहेबांनी भाजपला पाठींबा दिला होता, पण... : शरद पवार

सरकार सत्तेत आल्यावर पहिल्यांदा शिबीर आयोजित करण्यात आले आहे त्याबद्दल मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे अजित पवार यांनी यावेळी अभिनंदन केले. आपले सरकार जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला दोन महिने झाले शपथ घेऊन. शाळांमध्ये मराठी विषय घेण्यात यावा असा कायदा केला. शिवभोजन थाळी  सुरु केली. असे स्पष्ट करत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीत प्रत्येक वार्ड मधे महाविकास आघाडीचाच नगरसेवक विजयी होतील यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले. 

शिवसेना महानगरपालिकेत एक नंबरवर आहे ती राहिली पाहिजेच परंतु राष्ट्रवादी काँग्रेसही दुसर्‍या क्रमांकावर राहिली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले. महाराष्ट्रातील माझ्या कार्यकर्त्याला कोणताही त्रास होणार नाही याची खात्री बाळगा. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपापसात संघर्ष न करता पक्षाचे काम कसे वाढेल याकडे लक्ष द्या. तुम्ही चांगले वागलात तर ते तुमच्याशी चांगले वागतील असा सल्ला अजित पवार यांनी दिला.

कोरोनामुळे अमेरिकेत एकाचा मृत्यू; लागण झाली कोठून?

आपल्या विचाराचं सरकार आलं आहे तसं आपल्या विचाराची महानगरपालिका आली पाहिजे त्यासाठी नगरसेवक निवडून आणा असे आवाहन अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म मुंबईतून झाला आहे. मात्र पक्षाच्या प्रगतीकडे दुर्लक्ष केलं गेले आहे. देशात आणि राज्यात पवार साहेबांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यांची लोकप्रियता वाढत आहे तशी काम करण्याची त्यांची तरुणांसारखी उमेदही वाढत आहे. मात्र आपण कार्यकर्ते कमी पडत आहोत अशी खंत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केली. मुंबई महापालिकेच्या 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीला आतापासूनच कामाला लागलो तर 50 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येवू शकतात असा विश्वासही प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केला. 

मुंबईत कोण उपाशी मरत नाही. ही आपली मुंबई आपल्याला जगायला शिकवते. चाळ, झोपडपट्टीमधील शौचालय सुधारण्याचे काम येत्या काळात करणार आहे. या गोरगरीब लोकांना हक्काचं घर देण्याचे काम मला करायचं आहे. मुंबईच्या कुठल्याही कामासाठी मला हाताला धरुन घेवून जा ते काम मी करेन असा विश्वास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. मुंबई महानगरपालिकेत महापौर बसवण्यासाठी राष्ट्रवादीचा हातभार लागला पाहिजे हे पवारसाहेबांचे स्वप्न आहे यासाठी कामाला लागा असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. मी अंगावर घ्यायला कुणालाही घाबरत नाही. आला अंगावर घेतला शिंगावर हा माझा स्वभाव आहे असेही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar criticism on BJP in Karyakarta melava mumbai