...तर मग मनसे आमदाराने पक्षासह इंजिन चिन्हावर दावा करावा का? अजित पवारांनी डिवचलं - Ajit Pawar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : ...तर मग मनसे आमदाराने पक्षासह इंजिन चिन्हावर दावा करावा का? अजित पवारांनी डिवचलं

मुंबई : राज्यात उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी बैठक आयोजित केली. या बैठकीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राज्यातील विविध प्रश्नांवर शिंदे सरकारवर निशाणा साधला. तसेच सरकारच्या चहापाणावर बहिष्कार टाकला. यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा चांगलाचा समाचार घेतला. 

अजित पवार यांनी निवडणूक आयोगाने शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयावर देखील मिश्किल सवाल उपस्थित केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयावर भाष्य करताना अजित पवार म्हणाले, "ज्या पक्षाचे एक आणि दोन आमदार आहेत, त्यांचं काय? मनसेचा एक आमदार आहे, त्यांनी म्हणावं का? पक्ष आमचा इंजिन देखील माझंच आहे." 

चहापानांच्या निमंत्रणावर बहिष्कार -

तसेच, विकासकामांमध्ये राजकारण होत असल्याने विकासाच्या प्रक्रियेला फटका बसला आहे. अर्थसंकल्पात मागे मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे विकासकामे ठप्प पडली आहेत. एक महिना तीन दिवसांनी आर्थिक वर्ष संपणार आहे. जिल्हा वर्षिक योजनेचे किती पैसे खर्च झाले, याची माहिती काढावी. अजिबात पैसे खर्च झालेले नाहीत. निधीचे वितरण नाहीये. सरकार तिथे लक्ष देण्यास कमी पडले आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला आहे.

यासोबत अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेल्या चहापानांच निमंत्रणाला नकार दिला आहे. विरोधकांकडून चहापानांच्या निमंत्रणावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

चहामध्ये सोन्याचं पाणी घातलं होत का? -

वर्षा बंगल्यावरील खानपानाचं चार महिन्याचं बिल २ कोटी ३८ लाख इतकं आहे. मी पण मुख्यमंत्री होतो. माझेही सहकारी मित्र मुख्यमंत्री होते. काय या चहामध्ये सोन्याचं पाणी घातलं होत का? असा सवाल उपस्थित करत हे कळायला मार्ग नाही. असे पवार म्हणाले.

गेल्या ८ महिन्यात जाहिरातींवर सरकारकडून ५० कोटी खर्च करण्यात आला आहे. आणि मुंबई महापालिकेकडून माहिती घेतली तर तिथून १७ कोटी रुपयेंपेक्षा जाहिरातींवर खर्च केला आहे. जाहिराती देऊन स्वतःचा टेंबा मिळवण्याचं काम सुरु आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे.