Anil Jaisinghani : फडणवीसांनी विधानसभेत नाव घेतलं तो अनिल जयसिंघानी आहे तरी कोण? जाणून घ्या प्रकरण | Amruta Fadnavis Blackmail Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

amruta fadnavis blackmail case- Who is Anil Jaisinghani  named by Devendra Fadnavis in maharashtra Assembly

Anil Jaisinghani : फडणवीसांनी विधानसभेत नाव घेतलं तो अनिल जयसिंघानी आहे तरी कोण? जाणून घ्या प्रकरण

Amruta Fadnavis Blackmail Case : देवेंद्र फडणवीस यांनी आज त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एका महिला डिझायनर आणि तिच्या वडिलांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत महाराष्ट्र विधानसभेत माहिती दिली. या प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी उल्हासनगरमधील प्रसिद्ध बुकी अनिल जयसिंघानी यांचे नाव घेतले.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले की, अनिल जयसिंघानी गेल्या सात ते आठ वर्षांपासून फरार होता. त्याच्यावर 14-15 गुन्हे दाखल आहेत. त्याला एक मुलगी आहे जी हुशार आणि सुशिक्षित आहे. ती 2015-2016 मध्ये अमृताच्या संपर्कात आली, पण त्यानंतर तिने सर्व संपर्क बंद केला. पण 2021 मध्ये तिने पुन्हा माझ्या पत्नीशी संपर्क साधला.

कोण आहे अनिल जयसिंघानी?

जयसिंघानी, ज्यांच्यावर 17 गुन्हे दाखल आहेत, त्याला सट्टेबाजीच्या प्रकरणात तीनदा अटक करण्यात आली होती आणि पाच राज्यांतील सात प्रकरणांमध्ये तो हवा आहे.

मे 2015 मध्ये, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) गुजरात युनिटने जयसिंघानी यांच्या दोन घरांवर छापे टाकले आणि मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पण खराब प्रकृतीचे कारण देत तो फरार राहिला आणि आठ महिन्यांनंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झिट जामिनासाठी अर्ज केला.

तसेच मुंबईतील आझाद मैदान आणि साकीनाका या दोन पोलिस ठाण्यांमध्ये 2016 मध्ये त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावटगिरीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

हेही वाचा - हिंडेनबर्ग अहवालात तथ्य की ते भारताविरुद्धचे कारस्थान?

इंडीयन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टनुसार, मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अहमदाबाद सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. आजारी असल्याचे भासवत, तो रुग्णालयात दाखल झाला परंतु नंतर त्यांनी बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. ज्यामध्ये दावा केला होता की त्याची पत्नी करिश्माची शस्त्रक्रियेसाठी चाचणी करायची आहे.

आझाद मैदान पोलिसांना नंतर माहिती मिळाली की त्यांनी लीलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरची बनावट सही केली होती. त्यानंतर 1 मे 2016 रोजी जयसिंघानी यांच्याविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तीन वर्षात पोलीस त्याला शोधू न शकल्याने उच्च न्यायालयाने त्याला गेल्या वर्षी घोषित गुन्हेगार जाहीर केले.

जयसिंघानी हे प्रामुख्याने उल्हासनगरमध्ये राहतो आणि सर्वजण त्यांना ओळखतात. सप्टेंबर 2018 मध्ये हायकोर्टाने जाहीर नोटीस जारी केल्यानंतर, कोणीतरी आम्हाला त्याच्या ठिकाण्याबद्दल माहिती देईल या आशेने आम्ही बॅनर लावले. पण आम्ही अजूनही त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. ईडीचे अधिकारी तसेच मुंबई, ठाणे, गोवा , आसाम आणि मध्य प्रदेशातील पोलीस जयसिंघानीचा शोध घेत आहेत.

नेमकं प्रकरण काय आहे?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एका डिझायनर विरोधात गुन्हा दाखल केली आहे. डिझायरने अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच ऑफर केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर मलबार हिल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृता फडणवीसांनी अनिक्षा या नावाच्या डिझायनर विरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. यामध्ये धमकावणे, कट रचणे आणि लाच ऑफर करणे या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनिक्षा 16 महिन्यांहून अधिक काळ अमृता फडणवीस यांच्या संपर्कात होती आणि तिने फडणवीस यांच्या निवासस्थानी अनेकवेळा भेट दिली होती.एका गुन्ह्यात मदत करण्याची मागणी करत बुकींची माहिती देऊन तब्बल 1 कोटी तुम्हाला देऊ अशी ऑफर अमृता फडणवीस यांना आरोपी महिलेने आणि तिच्या वडिलांनी केली होती.