हिंगणघाट प्रकरण : आनंद महिंद्रा पीडिता आणि कुटुंबीयांच्या पाठीशी; सर्वोतोपरी मदतीची तयारी दर्शवली!

टीम ई-सकाळ
Friday, 7 February 2020

आरोपी नगराळे विवाहित असून त्याला एक मुलगीही आहे. तरीही तो पीडितेला वारंवार फोन करून त्रास देत होता.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र हादरून गेला. एकतर्फी प्रेमातून एका माथेफिरुने प्राध्यापिकेवर पेट्रोल टाकत तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या क्रूर घटनेनंतर राज्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि महिला संघटना आक्रमक झाल्या आहेत. संबंधित माथेफिरूला तत्काळ कडक शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे. त्या पीडितेच्या कुटुंबीयांप्रति देशभरातून सहानुभूती व्यक्त केली जात असताना आता प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्राही या कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. 

पीडितेच्या कुटुंबीयांना सर्वोतोपरी मदत करण्याबाबत त्यांनी तयारी दर्शविली आहे. यासंबंधीचे ट्विट त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून करत ही माहिती दिली. महिंद्रा यांच्या या कृतीचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. 

- Video: श्वानाने दिली भजन गायनाला साथ...

ट्विटमध्ये महिंद्रा यांनी म्हटले आहे की, हे क्रूर कृत्य अविश्वसनीय आहे. आयुष्य उद्ध्वस्त करणारी ही घटना आहे. जर पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना कुणी ओळखत असेल तर मला कळवा, मी सर्वोतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करेन, असे आश्वासनही त्यांनी दिले. बातमीचे पान उलटून गप्प राहणाऱ्यातला मी नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी यावेळी दिले आहे. 

दरम्यान, वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांनी शुक्रवारी (ता.7) नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीच्या तब्येतीची चौकशी केली. संसदेत सुरू असलेल्या अधिवेशनात या क्रूर घटनेची माहिती दिल्यानंतर सभागृह शांत झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनाही या घटनेची माहिती दिली असून पीडित तरूणी आणि तिच्या कुटुंबीयांसाठी केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळेल, यासाठी प्रयत्न करत आहे. तसेच माझे एक महिन्याचे मानधनही पीडितेला देणार आहे, अशी माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. 

- राम मंदिर ट्रस्टमधील एकमेव दलित सदस्य आहेत तरी कोण?

नेमके प्रकरण काय आहे?

तत्पूर्वी, प्राध्यापिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न करणारा माथेफिरू विक्की नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीने तिला वारंवार लग्नासाठी मागणी घातली होती. मात्र, त्याला प्राध्यापिक तरुणीने नकार दिला होता. याचा राग मनात धरत त्याने हे क्रूर कृत्य केल्याची माहिती पोलिस तपासातून पुढे आली आहे. 

आरोपी नगराळे विवाहित असून त्याला एक मुलगीही आहे. तरीही तो पीडितेला वारंवार फोन करून त्रास देत होता. 24 जानेवारीला दोघांची भेट झाल्यानंतर पीडितेने पाठलाग आणि फोन करू नको, अशी समज त्याला दिली. मात्र, राग अनावर झालेल्या नगराळेने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी 6 साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवून घेतले आहेत.

- पंकजा मुंडे यांच्यावर भाजप सोपवणार 'ही' मोठी जबाबदारी, मोठं प्रमोशन?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anand Mahindra assured to utmost help to Hinganghat victim and her family