बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे, अनिल देशमुखांचा खुलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Anil Deshmukh

बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे, अनिल देशमुखांचा खुलासा

मुंबई - राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब (Anil Parab) आपल्याकडे देत होते, असा धक्कादायक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांनी केला आहे. देशमुख यांनी दिलेला जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. अनिल परब यांनी दिलेली यादीच आपण अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचे देशमुख यांनी जबाबात म्हटले आहे. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra Police Transfer Issue)

याबाबत एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या काही बदल्या झालेल्या आहेत त्यासाठीची यादी आपल्याला एका कॅबिनेट मंत्र्याने दिल्याचे चार्जशीटमध्ये म्हटले आहे. याबाबत ज्यावेळी अनिल देशमुख यांना प्रश्ऩ विचारण्यात आले त्यावेळी त्यांनी अनिल परब यांनी ही यादी दिल्याचा खुलासा केला आहे. मला कुठल्याही व्यक्तीने यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती आणि हीच यादी आपण अतिरिक्त मुख्य सचिवांना दिल्याचे अनिल देशमुख यांनी दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

तसेच या यादीमध्ये जी काही नावे आहेत त्यांची त्यांना हव्या त्या ठिकाणी बदली करावी असे सांगण्यात आले होते. अनिल परब ही यादी कुठून आणायचे याबाबत ईडीने विचारले असता, देशमुख यांनी सांगितले की, परब कदाचित शिवसेनेच्या आमदारांकडून ही यादी घ्यायचे आणि त्यानंतर ही यादी मला पाठवायचे असे देशमुख यांनी म्हटले आहे. या यादीमध्ये आमदार त्यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांची नावे अनिल परब यांच्याकडे देत, त्यानंतर ही यादी परब माझ्याकडे द्यायचे, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.