अखेर राज्याला मिळाला पूर्णवेळ सहकार आयुक्‍त!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

गेल्या दोन वर्षांपासून सहकार खात्याला पूर्णवेळ आयुक्‍त नव्हता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सतिश सोनी यांच्याकडे सहकार आयुक्‍तपदाचा प्रभारी कार्यभार होता. 

पुणे : अखेर काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर राज्याला पूर्णवेळ सहकार आयुक्‍त मिळाला आहे. नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची सहकार आयुक्‍तपदी बदली करण्यात आली आहे. तर नोंदणी महानिरीक्षकपदाचा कार्यभार अतिरिक्‍त जमाबंदी आयुक्‍त ओमप्रकाश देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उदय जाधव यांची अकोला जिल्हा परिषदेच्या सीईओपदी बदली करण्यात आली आहे. तर अकोला जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद हे पुणे जिल्हा परिषदेत सीईओ म्हणून काम पाहतील. 

- देशात मोडी नाही, 'मोदी' लिपी दिसते; राज यांचा पंतप्रधानांना टोला!​

गेल्या दोन वर्षांपासून सहकार खात्याला पूर्णवेळ आयुक्‍त नव्हता. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक सतिश सोनी यांच्याकडे सहकार आयुक्‍तपदाचा प्रभारी कार्यभार होता. 
पुण्याचे अतिरिक्‍त विभागीय आयुक्‍त एस.एस. डुंबरे यांची 'महाऊर्जा'च्या संचालकपदी बदली करण्यात आली आहे. 'महाऊर्जा'चे संचालक कांतीलाल उमाप यांची राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्‍तपदी बदली करण्यात आली आहे. तर, राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्‍त प्राजक्‍ता वर्मा मुंबईत मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून काम पाहतील. 

- 15 वर्षांत तेरापेक्षा जास्त बदल्या, तडफदार तुकाराम मुंढे आता नागपूर महापालिकेत

आनंद रायते यांची अतिरिक्‍त जमाबंदी आयुक्‍तपदी, संपदा मेहता यांची मुंबई येथे विक्री कर सहआयुक्‍तपदी, मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव आर.डी. निवतकर यांची मुंबई शहर येथे जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. कृषी विभागाचे उपसचिव किरण पाटील सामान्य प्रशासन विभागात उपसचिव म्हणून काम पाहतील. मत्स्यविकास आयुक्‍त आर.आर. जाधव यांना मंत्रालयात उपमुख्यमंत्री कार्यालयात सचिव म्हणून जबाबदारी मिळाली आहे.

- पुण्यात आयुक्त आणि साखर आयुक्तांची आदलाबदल

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष रणजितसिंह देओल यांची मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पराग जैन यांची सामाजिक न्याय विभागाच्या सचिवपदी, एमपीसीएलचे व्यवस्थापकीय संचालक अरविंद कुमार यांची ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव, तर सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डी.टी. वाघमारे यांची महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anil Kawade has been transferred as cooperative Commissioner of Maharashtra