देशात मोडी नाही, 'मोदी' लिपी दिसते; राज यांचा पंतप्रधानांना टोला!

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 January 2020

डॉक्टरांनीही औषधे लिहून देताना चांगलं अक्षर काढण्याचा प्रयत्न करावा. कारण आपण कोणती औषधं गिळणार आहोत, हे पेशंटला कळत नाही, असे म्हणताच पुन्हा एकदा उपस्थितांना आपले हसू आवरता आले नाही. 

मुंबई : ''सध्या देशात मोडी लिपी नाही, तर मोदी लिपी दिसत आहे,'' अशी मिश्किल टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. सुलेखनकार अच्युत पालव यांच्या पुस्तकाचं प्रकाशन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अच्युत पालव यांच्या कामगिरीवर प्रकाश टाकताना राज यांनी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच पालव यांचं कौतुकही केलं. राज म्हणाले, अच्युत यांचं काम हे दिसायला सोपं असलं तरी त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. 26 जुलैला मुंबईत झालेल्या पावसात त्यांचं साहित्य भिजलं होतं. तरीही त्यांनी आपले काम पुढे चालू ठेवले. त्यांची ही मेहनत मी सुरवातीपासून पाहतोय. 

- फडणवीस यांचे लाडके तुकाराम मुंढे नागपूर महापालिकेत

मोडी लिपीविषयी बोलताना राज म्हणाले, अगोदरच्या काळात मोडी लिपी लिहली वाचली जात होती. मात्र, सध्या देशात फक्त मोदी लिपीच दिसत आहे. असं म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले, माझं अक्षर चांगलं असण्याचं महत्त्वाचं कारण बाळासाहेब आणि माझे वडील आहेत. माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे मोडी लिपीत सही करायचे, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. 

- शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा फोटो लावल्याने भडकले संभाजीराजे, म्हणाले...

सुंदर अक्षर असणं यासारखं समाधान दुसरं कोणतं नाही. तुम्ही शाळा-कॉलेजमध्ये असताना लिहलेले लिखाण पन्नाशी-साठीत गेल्यावर एकदा उघडून पाहा, ते पाहून तुम्हाला विलक्षण आनंद होईल. डॉक्टरांनीही औषधे लिहून देताना चांगलं अक्षर काढण्याचा प्रयत्न करावा. कारण आपण कोणती औषधं गिळणार आहोत, हे पेशंटला कळत नाही, असे म्हणताच पुन्हा एकदा उपस्थितांना आपले हसू आवरता आले नाही. 

- पुण्यात आयुक्त आणि साखर आयुक्तांची आदलाबदल 

दरम्यान, भाजप-मनसे युतीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. तसेच राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीगाठीही झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर येत्या 23 जानेवारीला होणाऱ्या मनसेच्या राज्यव्यापी अधिवेशनात राज ठाकरे काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचं लक्ष्य लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MNS president Raj Thackeray criticized PM Narendra Modi on Modi Lipi